संमेलनाध्यक्ष रुपाताई कुलकर्णी बोधी यांनी आॅनलाईन साधला संवाद
नांदेड – भारतीय समाजव्यवस्थेने सतत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे. यासंबंधी अनेकवेळा जनजागृतीचे कार्यक्रम झाले आहेत. विविध आंदोलने झाली आहेत. स्रिवादी चळवळीनी पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील सुद्धा पुरुषी मानसिकता बदलविण्याकरीता अटोकाट प्रयत्न केले आहेत. परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदते आहे. समकाळात कार्यरत असलेल्या परंपरावादी संस्कृती नाकारून नव्या प्रतिसंस्कृतीची निर्मिती केली पाहिजे आणि ती आंबेडकरी महिलाच मोठ्या जबाबदारीने करु शकते असे आश्वासक प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर यांनी केले. यावेळी तिबेटच्या सेरींग डोल्मा, वृंदा साखरकर (अमेरिका), अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे, अशोक बुरबुरे, छायाताई खोब्रागडे, स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा थोरात, प्रशांत वंजारे यांची उपस्थिती होती. संमेलनाध्यक्ष रूपाताई कुलकर्णी बोधी या आॅनलाईन पद्धतीने आणि ध्वनिचित्रफीतीच्या माध्यमातून सहभागी झाल्या. त्यांनी सहभागी रसिकांशी संवाद साधला.
आशय या संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीमटेकडी परीसरात अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या तिसऱ्या अखिल भारतीय महिला आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन हेमलता महिश्वर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, माणसाच्या भावनिकतेला फुंकर घालून निर्माण होणारी धार्मिक तेढ ही राजसत्तेला खतपाणी घालीत आहे. ते भाषा आणि संस्कृतीवर हल्ले चढवून त्यांना त्यांची संस्कृती आपल्यावर लादायची आहे. त्यामुळे आपणही त्याचा प्रतिकार करीत बालकांना आणि महिलांना तयार केले पाहिजे. बालकांमध्ये अनुकरण आणि अनुसरण प्रवृत्ती असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी बाल साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. पाली भाषा देशातील सर्व विद्यापीठांमध्ये शिकवायला हवा. संविधानाच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या अध्यक्षा सीमा मेश्राम यांनी भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. तसेच प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सेरींग डोल्मा, वृंदा साखरकर, अशोक बुरबुरे, बी.आर.वाघमारे, प्रशांत वंजारे यांनी आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय वानखेडे यांनी केले तर आभार सुमेधा खडसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय मोखडे, सुमेधा खडसे, माया वासनिक, रक्षणा सरदार, सुनंदा बोदिले, वर्षा गरुड, त्रिवेणी मकेश्वर, देविका मेश्राम, मीना काळे, अर्चना बुरबुरे, वनिता मोरे, प्रियंका वासेकर, प्रज्ञा सवई, अंजू सरदार, अंजली ढेंबरे, दीक्षा वासनिक, रुपाली भगत, भाविका सवई, पुजा गरुड, विशाखा खडसे, निलिमा लोहकरे, प्रमिला भगत, रंजना खडसे, शितल गरुड, तेजस्विनी ढेंबरे, रमा ब्राह्मणे, उषा रामटेके, रमा नाईक, मानवी थोरात, संबोधी गायकवाड, जनार्दन मोहिते आदींनी सहकार्य केले.
पुरुषांच्या मानसिकतेत बदल हवा - सेरींग डोल्मा
तिसऱ्या अखिल भारतीय महिला आंबेडकरी साहित्य संमेलनात बोलताना तिबेटी महिला असोसिएशनच्या प्रवक्त्या सेरींग डोल्मा म्हणाल्या की भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना ठेवण्यासाठी त्यांच्या मानसिकतेत मूलगामी बदल होणे गरजेचे आहे. आपण स्री आणि पुरुषांनी वेगळा विचार करणे धोक्याचे आहे. आमच्या तिबेटमध्ये जगणे कठीण झाले आहे. अनेकांची सरेआम कत्तल झाली आहे. आमच्या तिबेटमधील स्वातंत्र्याची चळवळ आम्ही भारतात राहून चालवित आहोत. आमच्या महिलांना साथ देण्यासाठी इथल्या आंबेडकरी महिलांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.