काय करालाव ? ऊन काढालाव !


साऱ्या पोरायला परीक्षा कधी संपतात अन् शाळंला सुट्टी कधी लागंल याची उत्सुकता असायची. मार्च महिना सरला रे सरला की एप्रिलच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात वार्षिक परीक्षा पार पडायच्या. परीक्षा देता देताच पोरांच्या डोळ्यापुढं सुट्टीचा बेताचे आराखडे तरळायला लागायचे. कोणी म्हणायचा, ‘माझ्या मामाच्या लग्नाला जायचं आहे.’ दुसरा म्हणायचा, ‘माझ्या आत्याच्या घरी लग्न आहे.

तिकडे जाणार हाव.’ बहुतांश जण गावातंच उन्हाळाभर हुंदडाचे. मस्त मजा करायचे. रानात जाऊन ‘डफ खेळू’, ‘कन कन कती’ खेळू असं म्हणतानाच सुट्ट्या कधी सुरु व्हयाच्या तेच कळायचं नाही. पाडव्याच्या मुहूर्तावर शेतीची कामं सुरू व्हयाची. कुणाला बापाची भाकरी घेऊन शेताकडं जावावं लागायचं. उन्हाळ्यातली शेताकडची कामं एक पारगी म्हणजे सकाळपासून दुपारवरंच असायची.

दिवस कासराभर वर चढलाकी इंगा दावायला सुरू करायचा. न्याहारीच्या येळंपस्तोर मस्त काम व्हयाचं . त्याच्या पुढं गेलं की जीव पाणी पाणी व्हयाचा. दुपारच्या येळंला औतं सुटायची. बैलायला कोंढणात नाही तर झाडाला गुतवून वैरण टाकली की, मोठी माणसं घराकडे सटकायची. कोणी तिथंच थांबायची. न्याहारीच्या भाकरीतली उरलेली भाकरी पिठलं आंब्याचं मिर्चू खाऊन बिंदग्यातलं कोंडलंभर पाणी ढोसलं की मस्त डर्रकून ढेकर देवून तिथल्याच मोकळ्या रानावर अंग टाकून द्यायची. कोणी आंबाड्याची एट काढून दावं वळीत बसायचा. मधेच विरंगुळा म्हणून त्यच्या खिशातली चंची बाहीर काढून चिमूटभर तंबाखू डाव्या हाताच्या तळव्यावर घ्यायचा.

चुनाळ्यातून उजव्या तर्जनीच्या नखानं थोडासा चुना घेऊन मस्त उजव्या अंगठ्यानं तंबाखू अन् चुना एकजीव करून घ्यायचा. डाव्या तळव्यावरच्या तंबाखू मिश्रणावर उजव्या हाताच्या चारी बोटानं थापटून अंगठा, तर्जनी आणि मध्यमेच्या चिमटीत बसंल इतकं मिश्रण उचलून डाव्या हातावरची भुकटी बेदरकार हिबाळून द्यायचा. डाव्या हाताने खालचा ओठ ओढून धरीत दाता-व्हाटाच्या मध्ये उजव्या चिमटीतलं मिश्रण ठेवून द्यायचा. अंबाड्याच्या बटीला बट जोडीत दोन्ही हातांमध्ये बट फिरवीत दावं पुढं पुढं सरकत जायचं. मध्येच उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा दोन्ही व्हटावर ठेवून तोंडाचा चंबू करीत दोन्हीच्या फटीतून दूर पिचकारी मारायचा. ‘दोरी वळणं अन् तंबाखू मळणं’ नवशिक्या पोरायनं इथंच तर शिकून घेतलेलं.


पोरं चकल्या देऊन शिवारातल्या आंब्याच्या झाडाकडं सटकायची. ठरल्याप्रमाणे पोराच्या सरकाळ्या, चंपुलं , गोट्या, विटी-दांडू नाहीतर डफाचा डाव सुरू व्हयाचा. डफ खेळायला आंब्याची थोरली झाडं लय भारी असायची. डाव घेणारं पोरगं खालून वर येईस्तोवर खडोळ्या पळाल्यावनी वरची पोरं फाट्याफाट्यानं पुढं सरकत जायची. फाट्याला धरून लोंबकळत वरून खाली उड्या मारायची. डाव घेणारा घायकुतीला यायचा. झाडाखाली झोपलेलं म्हातारं पोरायच्या गरद्यानं उठायचं. ‘तुम्हाला इकडं का गारीत घातलंय रं. जा तिकडं दूर खेळा कुठं तर….’ म्हणून गर्दा करायचं. आडबाजूला जाऊन पुन्हा अंग टाकून द्यायचं. त्याला पोरं एखाद-दुसरा पाडबी खायाला द्यायची.

त्याच्यामुळं त्यचा रागबी थंड व्हयाचा. पोरं तहान-भूक विसरून खेळात रमून जायची. कुहू$$कुहू$$ गाणे म्हणणारा कोकिळ पोरायच्या गरद्यापुढं अंग चोरून गप्प बसून राहायचा. नसता दुसऱ्या झाडावर बसून आपल्या सुराचा ठेका धरायचा.


बघता बघता दुपार कलायची. उन्हाचा तोरा काही उतरायचा नाही. तहान लागली की पोरं हळूहळू झाडाखाली उतरायची. घराकडे जायला निघायची. कोणाच्या पायाला पायतन असायचं तर कोणी अनवाणीच अालेलं. कोणाच्या डोस्क्याला दस्ती असायची, तर कोणी तसेच बोडकं आलेलं. आता नरड्याला कोरड पडते कायकी वाटलं की झाडाखालची टोळी फुटायची. एकेक करीत घराकडे निघायची. नांगरल्या ,पाळी घातल्या वावरातून जाताना पायतणं नसलेली पोरं पायाला चटके बसू लागले की डिस्को डान्स केल्यावनी करीत गावात घुसायची.

उन्हाच्या हाया मी म्हणायच्या. एकाद दुसऱ्याला उन्हाच्या हायीची चांगलीच फटकार बसायची. घरी माय वाकळ, गोधडं शिवत बसलेली असायची. हे दबकत दबकत पांढरंशिप्पट तोंड घेऊन आग पडलेल्या पायावर पाणी टाकायसटी न्हाणीत घुसायचं. रांजनातलं थंडगार पाणी पायावर पडलं की त्याच्या अंगभर गुदगुल्या व्हयाच्या. अंगावर काटवन उठायचं. सपासपा तोंडावर पाणी मारून ते भर उन्हात काकडी भरल्यासारखं “हूहूहू$$’ करीत मायीजवळ जायचं. त्याचं चलींततर बघून ‘काय झालं रं? कुठे दिवे लावायला गेलतास एवढ्या उन्हात.’ म्हणून रागं भरायची, त्याच्या अंगाला हात लावताच तव्याचा चटका बसल्यावनी झटकन हात बाजूला घेऊन ‘कुठं गेलतास माय?’ म्हणून चौकशी करीत जवळ घेवून त्यच्या कानात फुंकर मारायची. ‘त्या झाडाकडं कशाला गेलतास? तिथं मसोबा हाय.’ म्हणायची. मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत दोन्ही हात जोडायची.

आजी गडबडीने पुढं होवून त्याला धीर द्यायची. ‘ह्यला ऊन लागलंय की गं !’ दोन बतासे खायाला दे म्हणायची. दोन बतासे थंड पाण्यात भिजवून ते पाणी पाजायला सांगायची. बताशे खावून अन् पाणी पिऊन पोरगं शाहुरीवर यायचं. अंगातला ताप मात्र झटकून निघायचा नाही. तवा म्हतारी दुधाण्या खालची रानशिन्या गवरीची राख रांजनातल्या पाण्यात बुडवून पोराच्या हातापायाला लावायची. त्या थंडगार मलमानं अंगातली ताप हळूहळू कमी होऊन छू$$ मंतर व्हयाची. एखाद दुसर्‍याची आजी कैऱ्या भाजून थंड पाण्यात कोळून घेऊन गुळाचा खडा घातलेलं पन्हं (आमलेट) तापीतल्या पोराला पाजायची. कोणाची माय ताप आलेल्या पोराला चंदनाचा नसता गोपीचंदनाचा थंड लेप अंगभर लावायची. लईच अंगाची भगभग होऊ लागली तर गल्लीतलं या सालात महादेवाला कोण गेल्तं? ते आठवून त्याच्या घरून दवना आणायची. तो पाण्यात मळून ऊन लागलेल्याच्या अंगाला लावायची. कोणाची घरची बर्‍यापैकी परिस्थिती असंल त्ययनं ‘गुलकोज डी’चा पुडा आणून ते पाजीत.


ऊन काढण्याचा आणखी एक जालीम उपाय म्हणजे, दिवस मावळायला जायच्यापुढं अंगणात बाजंवर अंथरण न टाकता ऊन लागलेल्या व्यक्तीला उताणे झोपवून त्यच्या बेंबीवर मिठाचा खडा ठेवून रांजनातल्या गार पाण्याची धार त्यच्यावर धरायची. शेजारी उभं असलेल्यानं विचारायचं ‘काय करालाव?’ अन् पाण्याची धार टाकणारी बाई म्हणायची ‘ऊन काढालाव.’ किती साधा सोपा घरेलू इलाज करून उन्हाचे हल्ले परतवून लावायची त्यावेळची माणसं ! इतक्या वरही एखाद्याचा ताप एक दोन दिवस घुमलाच तर आजीमायचं पोचम्माला पाणी घालणं.

थंडबोणं करणं आलंच . हे थंडबोणं म्हणजे काय? तर रातच्याला शिजवलेला भात सकाळी त्यात दही खडीसाखर घालून पोचम्माला निवद करणं. तेच परत अाणलेलं थंडबोणं ऊन लागलेल्या व्यक्तीला दिलेला थंडावा ! पोचम्मा ही किती साधी भोळी देवता ! गाव देवायवनी ताजं अन्न न मागता शिळ्यावर तृप्त होऊन प्रसन्नतेचा ढेकर देणारी रानातली देवता आजीमायची जीवाभावाची दोस्तीणंच नव्हं का…!


-एकनाथ मा. डुमणे
सावरगाव ता.मुखेड
📱९०९६७१४३१७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *