मी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलो तेव्हा चं. ज. भारदे नावाचे गुरुजी आम्हाला शिकवायला होते. ते अतिशय छान शिकवायचे. त्यांचा गळाही गोड होतं. छान, गोड चालीवर ते गाणे गायचे. त्या काळी ते एक गाणे गायचे 'भिमा आम्हा बांधून दे बंगला, त्या बंगल्याला दारे अन खिडक्या'....
तेव्हा आम्हाला भिम म्हणजे महाभारतातील वाटायचं. तो शक्तीशाली, महाबली होता. तो गरिबांना घरे बांधून देत असावा अशी माझी तरी कल्पना होती. पुढे मी तिसऱ्या वर्गात आलो तेथे 'थोरांची ओळख' नावाचे पुस्तक होते. बहुधा त्यात चौदावा धडा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयी होता. धड्याचे नाव होते 'दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पण तेथे जे कोणी आम्हाला तो धडा शिकवला त्यात महामानव आंबेडकर आम्हाला कळालेच नाही. दलित शब्दाचा उलगडाही झाला नाही.
पुढे हळूहळू डॉ बाबासाहेब कळत गेले. पण कळण्याचं प्रमाणही अत्याल्पचं होतं. सुरुवातीला एवढचं कळालं की बाबासाहेब खुप शिकलेले होते. त्यांच्याकडे अनेक विषयाच्या पदव्या होत्या. त्याकाळी तेवढ्या पदव्या कोणाकडेच नव्हत्या.
पूर्वी बाबासाहेबांच्या विषयी चर्चा फक्त विशिष्ठ समाजाताच चालायची. आज अनेक जाती स्वतःला दलित समजतात. दलित समाजाच्या सर्व सवलती लाटतात. पण या सवलती कोणी दिल्या? का दिल्या? या विषयी कोणास ही माहित नव्हते. ज्या व्यक्तीने या सवलती एसी, एसटी, ओबीसी लोकांना मिळवून दिल्या त्या व्यक्तीचे नाव घेताना या लोकांनां लाज वाटत होती. बाबासाहेबांचं नाव घेणं यांना कमी पणाचं वाटत होतं. एसी मध्ये फक्त महार जातीचे (क्षमा असावी ) लोक सोडले की इतर कोणीही या महामनावचं नाव घ्यायला तयार नव्हते. ते म्हणायचे ते खालच्या जातीचे आहेत. यांची जात कुठे वर होती हे मला त्यावेळीं तर कळत नव्हते.
आम्ही मागासवर्गीय म्हणून सवलती लाटण्याला सगळ्यात पुढे व श्रेय देण्यासाठी मागे. आसं आज ही पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र दलित समाजला दिला. भारतातील तमाम दलित जाती या मध्ये आल्या ;पण येथे ही सगळे दलित असून तू मोठा मी मोठा म्हणून बाबासाहेबांच्या विचांराला तिलांजली दिली जाते. माझं स्पष्ट मत आहे जे लोकं बाबासाहेबांनी घटनेनुसार दिलेल्या सवलती घेवून मोठे झाले मग येथे तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांनी बाबासाहेबाचे विचार अंगिकारले पाहिजे. त्यांच्या महानतेला दाद दिलीच पाहिजे.
'शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे ते जो पियील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही'. हे बाबासाहेबांनी सांगितले. येथे दलित समाजातील लोकांनी शिक्षण घेतले. पण महामानवाचे विचार अंगिकारले नाहीत. गुरगुरणं आलं पण आवाज मांजरचं झालं. बाबासाहेबांनी घटनेत दिलेल्या सवलती घेवून पुढे आलेला समाज एकत्र राहू इच्छितो पण आज सत्तेसाठी या दलित समाजातील तथाकथीत पुढारी बाबासाहेबांचे चेले आहोत असे भासवून सत्तेसाठी लाचार आहेत. काही पुढारी जिकडे सत्ता तिकडे मीच म्हणून सत्ताधिशांच्या पुढे गुलामासारखे वागत आहे. मागासवर्गीय समाज ही एकत्र दिसत नाही . शे पाचशेत व एका बाटलीत हाही विकला जातो . नेत्यांना मागास समाजाविषयी काही पर्वा नाही यांना फक्त सत्ता पाहिजे.
मग दलित समाजाला महामानव डॉ बाबासाहेब यांचे विचार कळालेले आहेत का? सत्तेसाठी लाचार झालेल्या पुढाऱ्यांना आपण का लाथाडत नाही. घटनेनुसार जे मागसवर्गीय सवलती घेतात ते किमान एकत्र का येत नाहीत? यांच कारण आहे यांनी कधीच या महामानवाच्या कार्याला समजून घेतले नाही. समजून घेण्याचं प्रयत्न होत नाही व प्रयत्न ही केलाला नाही. आंबेडकर जयंती, पुण्यतिथी मध्ये फक्त एकाच जातीने भाग घ्यावा. दुसऱ्या दलित जातीनां फारसं याचं देणंघेणं दिसत नाही.
जे स्वतःला आंबेडकरवादी समजतात त्यांनाही डॉ. आंबेडकर पूर्ण कळालेलं नाही. नविन पिढी तर यापूसून कोसो दूर जाताना दिसत आहे. यांना महामानवाची जयंती म्हणजे एक आनंदाची ,मौज मजेची पर्वणी ठरते आहे. जयंतीच्या नावाखाली वर्गणी गोळा करायची. जयंतीच्या दिवशी फुल्ल ढोसायची. डिजे लावयचा व त्यावर ताल धरायचं यवढचं अधुनिक पिढीतील बहुसंख्य तरुणाला माहित आहे.
जयंती निमित्याने बाबासाहेबांचे विचार जगभर कसे पोहचतील याचं विचार फारसे कोणी करताना दिसत नाही. आजच्या तरुणांनी शिक्षणात लांबी, रुंदी वाढवली पण खोली वाढवताना दिसत नाही. जयंती निमित्याने जमा होणारी वर्गणी जर योग्य कामाला आली किंवा वापरली तर किती चांगले होईल? जर वर्गणी गरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी वापरली, गावोगावी वाचनालय सुरु केली, तालूका, जिल्ह्याच्या ठिकाणी गरिब होतकरू मुलामुलींसाठी वसतीगृह सुरु केले. एमपीएसी, युपीएसीचे क्लासेससाठी सोईसुविधा निर्माण केल्या तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण अमलात आणल्या सारखे होईल. समाजातील मुलेमुली अधिकारी होतील.
बाबासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, जलविषयक, शेती विषयक, राजकीय, धार्मिक जे काही विचार मांडलेले आहेत ते सर्व समाजात पेरले गेले पाहिजेत. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाही तर पुढील पिढीला कोणी विचारतील बाबासाहेब कोण होते? त्यांचे विचार काय व कसे होते? जयंती साजरी का करतोत तर ते म्हणतील आमचे आईबाबा, आजी आजोबा करत होते म्हणून आम्ही करतोत. अशी म्हणण्याची पाळी येणार नाही यांची काळजी घेणे आवशक आहे. मला तर सतत प्रश्न पडतो खरचं भारतातील सर्वच दलित इतर मागास जातीच्या लोकांना बाबासाहेब समजले का? त्यांच्या विचारांचे प्रचार व प्रसार झाला पाहिजे . महापुरुषांना कुठलही जात नसते . त्यांनां कोणीही जातीत आडकवण्याचा प्रयत्न करू नये .
जयभीम.
भीम जयंतीचा सर्व मानवजातीला हार्दिक शुभेच्छा.
©राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड-६
९९२२६५२४०७.