गांधी घराण्याशिवाय काँग्रेस!

काँग्रेसला आता गांधी या नावाखेरीज नेतृत्वाची गरज भासू लागली आहे. ती का भासू लागली असेल हे एखादं शेंबडं पोरगंही सांगू शकेल. आजच्या काळात सोनिया गांधी आणि राहुल गांधी (प्रियंका गांधी यांचा तर विषयच नाही) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात सत्ता आणू शकत नाही हे सर्वानाच कळून चुकले आहे. गांधी घराण्याचे देशासाठी बलिदान आणि जे काही अतुलनीय कार्य आहे ते आ गांधी कार्ड चालणे आता कठीण आहे. २०१४ च्या निवडणुकीपासून मोदी नावाची जादू जोरात चालू आहे. माँ बेटो की घराणेवाली सरकार आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देण्याच्या आश्वासनाच्या तसेच इतर मुद्द्यांवर देशात नरेंद्र मोदी नेतृत्व करणाऱ्या भाजप पक्षाची सत्ता आली. सुरुवातीला दलित आणि मुस्लिम विरोधी सरकार म्हणून हिंदूंच्या भावना एकवटल्या. देशात अनेक राज्यांत भाजपची सरकारे आली. जगप्रवास, नोटबंदी, कर्जबुडवे, खोटे बोलणे, जीएसटी, माॅब लिंचींग, खाजगीकरण, एनपीआर, सीएए, अशा कोणत्याही मुद्यांमुळे मोदीची लोकप्रियता कमी झालेली नाही. ऊलट, गोवंश हत्या बंदी, गोमांस विक्री बंदी, तीन तलाक, सर्जीकल स्ट्राईक, कलम ३७०, राम मंदिर अशा मुद्यांमुळे मोदीची लोकप्रियता आणखीनच वाढली. कारण मोदींना तोडीस तोड नेतृत्व असलेलं व्यक्तिमत्व कोणत्याही पक्षाकडे नाही. परंतु काँग्रेस नेतृत्व सातत्याने सगळीकडेच अपयशी ठरत असतांना आता काँग्रेसच्याच काही नेत्यांना गांधी या घराण्याच्या बाहेर काँग्रेसचे नेतृत्व हवे आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना तर याचे काहीच सोयरसुतक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्माचे मूळ कारण म्हणून शरद पवारांनी उकरुन काढलेल्या सोनिया गांधीच्या विदेशीच्या मुद्याखेरीज महाराष्ट्राने दिल्लीच्या तख्तावर आपला काही दावा दाखल केलेला नाही. गांधी घराण्याच्या पलीकडे विचार करण्याची कुवत महाराष्ट्राच्या काँग्रेस राजकारणात नाही हेच सिद्ध होते. 

sorce

              ‘काँग्रेस लक्ष्यहीन व दिशाहीन पक्ष’ही लोकभावना दूर करण्याची गरज आता आहे.‌ काँग्रेस एक निश्चित लक्ष्य नसलेला दिशाहीन पक्ष आहे, अशी देशातील लोकांमध्ये निर्माण झालेली भावना संपुष्टात आणण्याच्या हेतुने पक्षासाठी   पूर्णवेळ अध्यक्ष शोधण्याची आवश्यकता आहे व त्यासाठीची शोध मोहिम गतिमान केली पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले होते. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी पूर्ण झाला असून त्यानिमित्त शशी थरूर यांनी पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याचा विचार व्यक्त केला. काँग्रेस हा लक्ष्यहीन व  दिशाहीन पक्ष आहे ही भावना लोकांत निर्माण झाली आहे. विश्वसनीय विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडण्यात  काँग्रेस असमर्थ ठरला आहे, ही लोकांच्या मनातील भावना दूर करण्यासाठी एक पूर्णवेळ अध्यक्ष निवडला जाणे अत्यावश्यक बनले आहे. त्यासाठी अध्यक्षाची शोधप्रकिया गतिमान करायला हवी आहे’, असेही थरूर म्हणाले आहेत. काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळत नसल्याबद्दल दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी वरिष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं होतं. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडला जावा, असं ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर संजय निरूपम हे भडकले आहेत. राहुल गांधी हेच काँग्रेस पक्षाला वाचवू शकतात, असे त्यांना वाटते.

काँग्रेसला उभारी देण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीनं निवडला पाहिजे या माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपम यांनी संताप व्यक्त केला. गांधी कुटुंबाशिवाय बाहेरील कुणीही नेता सध्याच्या घडीला काँग्रेसचं नेतृत्व करू शकत नाही. राहुल गांधी हेच पक्षाचे नेतृत्व करणारे आणि काँग्रेसला वाचवू शकतील असे एकमेव नेते आहेत, असं ते म्हणाले. गांधी कुटुंबाबाहेरील कुणीही नेता सध्या काँग्रेसचं नेतृत्व करू शकत नाही. राहुल गांधी हेच काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात आणि पक्षाला वाचवू शकतात. आमचे नेते फक्त गटाचे नेते आहेत आणि असे नेते फक्त गटबाजीला खतपाणी घालतील, असं निरुपम यांना वाटतं. यावरून मुंबई काँग्रेसची भूमिका लक्षात येईल. पक्षात सहा ते आठ जण असे आहेत जे नेतृत्त्व करण्यासाठी सक्षम आहेत. पण अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकायची याची भीती वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.   लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

अमरिंदर सिंह, अशोक गहलोत, कमलनाथ, पी. चिदंबरम, अहमद पटेल यांच्यासारखे राज्यसभेतील अनेक नेते, काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काही केले आहे. पण राजकारणात आता त्यांच्यापाशी वेळ कमी उरलेला आहे. अशा स्थितीत त्यांनी पक्षाला पुढे नेण्यासाठी किमान बौद्धिक स्वरूपात योगदान दिले पाहिजे’ असे मत काँग्रेसचे अनेक नेते खासगीत व्यक्त करतात. त्यातील अनेक जण महत्त्वाची पदे भूषवित आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कार्यकर्ते आणि मतदारांना प्रेरित करण्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी असे थरुर यांचे म्हणणे आहे. गांधी कुटुंबियांच्या बाहेरचा अध्यक्ष निवडला तर अडचण आणि राहुल गांधींकडे पुन्हा अध्यक्षपद सोपविले तरीही अडचण अशी स्थिती असल्यामुळे नवा अध्यक्ष नियुक्त करण्यावरून काँग्रेस पक्षात विलंब होत आहे. स्वतःहून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळेही काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवून पक्ष आलेला दिवस ढकलण्यावर भर देत आहे.
काँग्रेसचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले असतानाच, ‘काँग्रेसने नियुक्ती पद्धत बंद करून, निवडणुकांच्या माध्यमाने कार्यकारिणी निवडावी, तरच चांगले नेते पुढे येतील’, अशी अपेक्षा काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू असून, गेल्या वर्षभरापासून पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेल्या सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची घोषणा केली आहे. आपला अध्यक्षपदावरील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण आता अध्यक्षपद सोडावे आणि सर्वांनी मिळून पक्षनेतृत्व निवडावे असही दस्तुरखुद्द  सोनिया गांधी यांनी वाटतं

 काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक आजच होत असून यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी अध्यक्ष पदावरून दूर होण्याबाबतचा प्रस्ताव ठेवू शकतात. सोनिया गांधी यांनी आपल्या मनाची तयारी केली असून, निवडक नेत्यांना याबाबत माहिती दिली आहे की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्ती अध्यक्षपदावर येण्यासाठी त्या या पदावरुन दूर होऊ शकतात.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली होती; पण काँग्रेसच्या कार्यसमितीने ती फेटाळून लावत सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, हा प्रयोगही अयशस्वी राहिला आणि आता सोनिया गांधी हे पद सोडण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. अर्थात, हंगामी अध्यक्षपदाचे आणखी एक वर्ष त्यांच्याकडे आहे. मात्र, नाराज असलेल्या सोनिया गांधी हे पद सोडण्याबाबत प्रस्ताव मांडू शकतात, हे निश्चित आहे. याबाबत कुणीही बोलायला तयार नाही.  कार्यसमितीचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र माध्यमांना  सांगितले की, या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये आपण सहभागी होणार आहोत.

 काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेला अनुसरुनच हा निर्णय सोनिया गांधी घेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पद सोडले होते. त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की, या पदासाठी गांधी कुटुंबाशिवाय अन्य नेत्याची निवड केली जावी. काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर अस्वस्थता व मतभेद आहेत आणि याचमुळे काँग्रेसची शनिवारी होणारी कार्य समितीची बैठक होऊ शकली नाही. ही विस्तृत बैठक बोलवावी, असे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे मत होते, तर विस्तृत बैठक होऊ नये, असे उर्वरित बड्या नेत्यांचे मत होते. त्यामुळे अखेर ही बैठक रद्द करण्यात आली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. राहुल गांधी यांनी एक तर पुढे येऊन अध्यक्षपद सांभाळावे किंवा पक्षाच्या निर्णयांना प्रभावित करणे सोडावे, असे नेत्यांच्या एका गटाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना स्पष्टपणे सांगितलेले आहे.राहुल गांधी यांना अध्यक्षपद देण्याबाबत नेत्यांत कोणतेही मतभेद नाहीत; परंतु त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी समोर यावे व थेट सर्व जबाबदारी स्वीकारावी. नेतृत्वाअभावी पक्ष आपले अस्तित्व गमावत आहे व केवळ फेसबुक- ट्विटरवर ते टिकून आहे.
फेसबुक-ट्विटरच्या आधारे राजकारण शक्य नाही. पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ठोस कार्यक्रम घेऊन मैदानात उतरावे लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. अहमद पटेल, पी. चिदम्बरम, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह, कमलनाथ, अमरिंदर सिंह, शशी थरूर, मनीष तिवारी आदी नेत्यांचे वरीलप्रमाणे मत आहे. १५ ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीला पक्षातील अस्वस्थतेला जोडले जात आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी राजी करावे. ते तयार होत नसतील, तर पक्षात सामूहिक नेतृत्वाची व्यवस्था करावी. राजकारणात अद्याप परिपक्व नसणाऱ्या लोकांचा सल्ला राहुल गांधी घेतात, यावरून नेत्यांचा मोठा गट नाराज आहे. यात रणदीप सुरजेवाला, के.सी. वेणुगोपाल, शेरगिल, अशा युवा नेत्यांचे नाव आहे. सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या प्रकारची पावले उचलली, त्यासाठीही राहुल गांधी यांच्या आजूबाजूच्या नेत्यांना जबाबदार मानले जाते.
             आजची काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होण्यापूर्वीच पक्षात अंतर्गत घडामोडी सुरू झाल्या  आहेत. विद्यमान खासदार आणि माजी मंत्र्यांच्या एका घटनेने सामूहिक नेतृत्वाची मागणी केली आहे. तर आणखी एका गटाकडून राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात येत आहे. काही माजी मंत्र्यांसह दोन अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे, तर राहुल गांधी यांच्या जवळच्या काही नेत्यांनी सीडब्ल्यूसीला पक्षाच्या अध्यक्षपदावर परत येण्यासाठी पत्र लिहिले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून पक्ष सध्या दोन गटांत विभागला गेला आहे. यातच राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरतात. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनविण्याचेबाबतचे मत आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांचे आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचे सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळे गांधी या नावाशिवाय काँग्रेसचे नेतृत्व या विचारधारेने जोर पकडला असून मोदी नावाच्या वादळाला टक्कर देण्यासाठी एक दमदार शक्तीशाली नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे. 

Gangadhar DHAVALE
गंगाधर ढवळे,नांदेड
Gangadhar DHAVALE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *