मराठवाडा हा एकेकाळी डाव्या पक्षाचा बालेकिल्ला होता, डाव्या पक्षाने राज्याला अनेक दिग्गज नेते दिले, त्यांनी राज्यात अनेक नवोदित नेते निर्माण केले, संघर्ष केला व समाजाला न्याय मिळवून दिला. लढलेली माणसे घडतात व पुन्हा समाजासाठी लढाईला तयार होतात, असा डाव्यांचा सामाजिक इतिहास आहे. सामाजिक चळवळ जीवंत ठेवून पीडितांसाठी अन्यायाच्या विरोधात आपल्या नेतृत्वाची ओंजळ नेहमी रिकामी करतात.
मराठवाड्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची एक मोठी फळी कॉ. गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या अथक प्रयत्नातून मराठवाड्यात निर्माण झाली. मुळात समाजवाद हा लोकशाहीचा मध्यबिंदू असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात हा मध्यबिंदू ओलावा निर्माण करतो व त्याचे लवकर विस्मरण होत नाही, दीर्घकाळ टिकतो हे विविध लेखकांच्या लेखातून प्रकर्षाने जाणवते. समाज परिवर्तनामध्ये मूलभूत मानवी गरजांची पूर्तता होण्यासाठी पोषक समाजव्यवस्था व ती निर्माण करण्यासाठी परिवर्तनाची गरज असते. यासाठी राजकीय स्थित्यंतराची सुद्धा तितकीच गरज असते, हे स्थित्यंतर घडवून आणण्याचे काम राज्यामध्ये तसेच देशपातळीवर डाव्या, लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष शक्तींनी मोठ्या प्रमाणात केलेले आहे.
जनताभिमुख विकास करावयाचा असेल तर जनआंदोलन हेच प्रमुख हत्यार आहे व ते वापरल्याशिवाय गत्यंतर नाही किंबहुना आज ती काळाची गरज आहे, हे सर्वांच्या मांडणीतून दिसून येते. या पुस्तकातील एकूण २८ लेखांमधून परिवर्तनवादी चळवळीमुळे काही काळ जरी कौटुंबिक हानी झाली असेल तरी व्यक्तिगत जीवनाची व व्यक्तिमत्त्वाची नक्कीच जडणघडण होते किंबहुना डाव्या चळवळीमुळे जीवनाला आकार आला, याचे अनेक रंजक किस्से व ओघवते अनुभव लेखकांनी आपल्या लेखात नमूद केले आहेत.
महाराष्ट्राचा आजचा चेहरा डाव्या व परिवर्तनवादी चळवळीमुळे जरी पुरोगामी वाटत असला तरी तसा तो आज राहिलेला नाही, हे काही विचारवंतांच्या हत्येमुळे मान्यच करावे लागेल. आज डाव्या चळवळीचे अनेक वेगवेगळ्या विचारधारेमध्ये विभागणी झाल्यामुळे चळवळीची धार काहीशी बोथट झाली आहे, भांडवलवादी मूल्य कल्पनेमुळे माणसाचं मूल्य दिवसेंदिवस कमी होत आहे, भौतिक चंगळवाद वाढत आहे. त्यामुळे माणसाचं मूल्य समाजामध्ये राबवणे ही खऱ्या अर्थाने आज डाव्या संघटनांसमोर एक आव्हान आहे. यासाठी दीर्घकाळ परिवर्तनाचे लढे कार्यरत ठेवावे लागतील. चळवळीमध्ये शिक्षक-प्राध्यापक हे घटक अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. चळवळी चालवतांना काही वैचारिक मतभेदांना सुद्धा सामोरे जावे लागते याचेही अनुभव लेखकांनी या पुस्तकात प्रकर्षाने नमूद केलेले आहेत. औटघटकेला बळी पडणाऱ्या सुशिक्षित समाजाचे प्रबोधन करून त्यांना एकत्र करणे व लढा उभा करणे हे या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर एक मोठे आव्हान होते व ते कसे पेलले याबाबत सुंदर अनुभव पदोपदी जाणवतात. विषमता रहित समाज हे मार्क्सवादाचे उद्दिष्ट समोर ठेवून अनेक कार्यकर्ते विद्यार्थीदशेपासूनच घडल्याचे या प्रत्येकाच्या लेखनातून समोर येते. चळवळींतील कार्यकर्त्यांचा जन्म हा प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्यातून होत असतो.
सर्वच लेखांचे लेखक हे विद्यार्थी, कामगार, शेतमजुर, शेतकरी आंदोलनातून घडलेले आहेत, सर्वांचे अनुभव वाचनीय आहेत. दिवंगत कॉ. डॉ. विठ्ठल मोरे व दिवंगत कॉ. उद्धव भवलकर हे कामगार नेते आज आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांची जडणघडण ही प्रबोधनाच्या व संघर्षाच्या लढाईतून झालेली आहे, त्यांचे हे अनुभव नवीन पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील याबाबत माझ्या मनात कसलाही किंतु नाही. आदिवासी पाड्यांमध्ये जावून वैद्यकीय सेवा दिली पाहिजे, आपणही समाजाचे एक घटक आहोत व न्यायपूर्ण समाजासाठी संघर्ष केला पाहिजे व ते माझे कर्तव्यच आहे अशी डॉ. डी एल कराड यांनी व्यक्त केलेली भावना आजच्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिशा देणारी आहे. कॉ. अण्णा सावंत व कॉ. रामकृष्ण शेरे यांचे कामगार, शेतमजूर, शेतकऱ्यांसाठी केलेला संघर्ष व त्यांना न्याय मिळवून देताना जे अनुभव आले, त्रास झाला व त्यातून त्यांची जी जडणघडण झाली, ती मनाला वेदना देणारी आहे.
आज अशी उदाहरणे दुर्मिळच! शोषणमुक्त शिक्षण व्यवस्था व प्राध्यापकांच्या समस्यांना न्याय देणारे नेतृत्व सुद्धा डाव्या चळवळीने नुसते मराठवाड्यातच नव्हे तर राज्य पातळीवर निर्माण केले, त्याचे एक चांगले उदाहरण म्हणजे प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले हे होय. विद्यापीठ नामांतर लढ्यापासून ते प्राध्यापकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भातील आंदोलनांमध्ये त्यांच्या हाताखाली अनेक कार्यकर्ते तयार झाले. या पुस्तकातील सर्व लेखक हे एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेच्या मुशीतून तयार झालेले आहे. एस.एफ.आय. ही देशातील आज अग्रगण्य विद्यार्थी संघटना म्हणून प्रसिद्ध आहे. राज्य घटनेला स्मरून एस.एफ.आय. आपले कार्य करते. एस.एफ.आय. ने न्याय मागण्यांसाठी सतत चळवळी, आंदोलने उभे केल्यामुळे आज अनेक उदोयन्मुख नेते राज्यात निर्माण झाले आहेत.
त्यातील काही नावे जसे की कॉ. विजय गाभणे, श्री. राजानंद सुरडकर, कॉ. डॉ. उमाकांत राठोड, कॉ. शिवाजी कुरे, कॉ. डॉ. मारुती तेगमपुरे, कॉ. योगेश खोसरे, कॉ. डॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. डॉ. दत्ता रणखांब, श्री. दीपक लिपने हे विविध क्षेत्रातील डाव्या संघटनांचे नेतृत्व करतांना आपला ठसा उमटवत आहेत. या सर्वांच्या जडणघडणीचा गाभा म्हणजे विद्यार्थीदशेत त्यांना मिळालेले मार्क्सवादाचे बाळकडू!. अन्यायाच्या विरोधात कसा लढा उभारावा व कसा न्याय मिळवून द्यावा, याचे कसब या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आलेले आहे. सर्व चळवळी, लढे व आंदोलने हे जसे प्रामाणिकपणाच्या पायरीवर उभे राहून जिंकले जातात तसेच या लढाईमध्ये चारित्र्याला सुद्धा खूप मोठी किंमत असते. डाव्या चळवळीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते हे चारित्र्यवान असल्यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अदबशीर असतो.
आजच्या धंदेवाईक राजकीय पक्षांमध्ये ही मोठीच उणीव दिसून येते. अलीकडच्या काही घटनांवरून आजच्या राजकीय पुढाऱ्यांना मार्क्सवादी चळवळींची शिकवण दिली पाहिजे, जेणेकरून या क्षेत्रात काम करतांना चारित्र्य जपले जाईल. डाव्या चळवळीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते चारित्र्या ने बलवान असल्यामुळे त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा प्राप्त झालेली आहे, ही बाब जरी अव्यक्त असली ती समोर विविध लेखांतून आल्याशिवाय राहत नाही. “आम्ही लढलो-आम्ही घडलो” या पुस्तकामध्ये अनेक लेखकांनी आपण विद्यार्थी संघटनेमधून घडलो, संघर्ष केला व आज वेगवेगळ्या डाव्या संघटनांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, याविषयीचे सर्व अनुभव नवोदितांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील याबाबत कसलाही संशय नाही. प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे आणि प्रा. डॉ. अतुल चौरपगार यांनी या पुस्तकाचे संपादक करतांना पुस्तकाची भाषा अतिशय सोप्या व बोलक्या शब्दात संपादित केल्यामुळे वाचताना कुठेही बोजड वाटत नाही. पुस्तकाच्या शेवटी विद्यार्थी दशेतील महत्वाच्या आंदोलनांच्या विविध क्षणांचे फोटो संग्रह देवून पुस्तकाला बोलके ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपादकांनी डाव्या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांचे अनुभव उगवत्या विद्यार्थी नेत्यांसमोर मांडून त्यांची संघर्षमय असलेली वाट सुलभ केली आहे, याबद्दल डॉ. मारोती तेगमपुरे आणि डॉ. अतुल चौरपगार हे अभिनंदनास पात्र आहेत.
पुस्तक परिचय-डॉ. विक्रम खिल्लारे
आम्ही लढलो-आम्ही घडलो
प्रकाशक: शब्दवेध बुक हाऊस, औरंगाबाद
संपादक: डॉ. मारोती तेगमपुरे आणि डॉ. अतुल चौरपगार
पृष्ठसंख्या : २१६, किंमत : रु. १६०/-