पुस्तक परिचय ;नव्या जगाची मुले
उद्याच्या जगात या पहिल्या कवितेत कल्पनेच्या बळावर कविने बालकांना आजचे वास्तव आणि उद्या होऊ घातलेले साहजिक बदल सोप्या भाषेत लक्षात आणून दिले आहेत. शिवाय, माणूस केंद्रस्थानी ठेऊन, या बदलत्या कोलाहलात तो नेमका कुठे असेल ? हा प्रश्न उपस्थित केला आहे. तो असा..
नसले पंख तरी
उंच उडता येईल वर
माणसांनी भरलेलं पण,
असेल का घर ?
तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होणार आहे, होऊ शकते. हे ऐकून गुळगुळीत झालेलें वाक्य कविने जितक्या कलात्मक तीतक्याच सोप्या पद्धतीने मांडले आहे. किंबहुना वेड्यावाडीचे वेडे या कवितेच्या शेवटी बालकांना पाणी बचतीचा महामंत्र देण्यात कवी यशस्वी झाला आहे. तो असा…
सोने, नाणे फेकून देती,
बचत करतात पाणी !
वेड्यावाडीचे वेडे सारे,
तिथे ना शहाणे कोणी !
उत्तरे खरे द्या ही जसी बालकविता आहे, तशीच ती एक – दोन डझनभर प्रश्नांची एक सुंदर प्रश्नावलीच आहे. असंही म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. उत्तरे खरे देण्याचा इथे जसा अर्जव आहे तसा इथे शाळा शिकून मोठा साहेब होण्याचा बालकांना सल्ला पण आहे. तो असा….
उत्तरे खरे दिलीत,
दिली नाहीत खोटे,
खूप खूप शाळा शिकून,
व्हा साहेब मोठे !
ठोंब्या नावाच्या कवितेची खासियत अशी की जसं गोष्ट सांगायला सुरुवात करतात, तसं ह्या कवितेची सुरुवात आहे. ती अशी….
ठोंब्याला स्वप्न रोज पडायचे,
स्वप्नात रोज असे घडायचे.
फुकटपूर या कवितेत बालकांच्या मनोरंजना सोबतच संस्कृतीची धागा आला आहे. तो म्हणजे शनिशिंगणापूरच्या अख्यायिकेचा. शिवाय, बालकांचे जीवन कसे तणावमुक्त असते ,ह्याचा उल्लेख आला आहे.
म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हणून ठेवले असावे, ‘ लहानपण देगा देवा…’कवितेतील तो उल्लेख येणेप्रमाणे येतो….
नाही धनी, नाही कोणी,
दुकाने सदाच खुली
केक, पाव, खेळण्या घेती,
तिथे सदा मुले, मुली.
मौजमस्ती, नाचगाणे,
चिंता ना हुरहूर !
एक गाव दुरदूर,
नाव त्याचे फुकटपूर !
शिक्षणात आणि लेखनात अनुस्वाराचे महत्त्व खूप महत्त्व आहे. त्या अभावी वाक्याच्या अर्थाचा अनर्थ होतो. संदर्भ बदलतो. संदेशवहन आणि दळणवळण निट होत नाही.हे ओळखून … टिंब या कवितेत कविने अगदी हसतखेळत अनुस्वाराचे महत्त्व बालकांच्या पुढ्यात मांडले आहे. कवितेच्या शेवटी आलेली उपमा, आलेले प्रतीक, ‘ जणू तपस्वी ऋषी कुठला ! ‘कविच्या सखोल अभ्यासाची साक्ष देऊन जाते.
नवलाईचं गाणं या कवितेत आपल्या अवतीभवतीचे प्रश्न, विशेषतः काही भौगोलिक तर काही अवकाशातील व खगोलशास्त्रीय प्रश्न बालकांच्या तोंडून कवी थेट विज्ञानाला विचारातो आहे.ते प्रश्न असे आहेत…..
पंख नसूनी ढगात
कसे उडतो आपण ?
ही घडे कशी जादू
सांगेल का विज्ञान ?
मुलांच्या निख्खळ मनोरंजना सोबतच कविने जणू एक,” शुगर कोटेड ” आणि तेवढाच लडिवाळ सल्ला बालकांना देण्याचा जणू विडाच उचललेला सबंध कविता संग्रहात दिसतो आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जादूगार या कवितेत तो विडा असा रंगला आहे.
जातांनी तो सांगून गेला,
जादू असते खोटी,
हवेहवे ते मिळवून देई,
फक्त पुस्तक पाटी !
नव्या जगाची मुले ही शिर्षक बालकविता आकर्षक तर आहेच पण थोडी भावखाऊ पण आहे. या येथे जणू,’ सुपरमॅन ‘ ची कल्पना पुढे आली आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे जग अत्यंत जवळ आले आहे. मुलांच्या निरिक्षण शक्तीबरोबर ग्रास्पींग पावर पण वाढली आहे. सर्वच क्षेत्रात ती आघाडीवर असल्याचा ही बालकविताजणू एक पुरावा आहे.ती जितकी कष्टकरी तितकेच संकटांना धीराने तोंड देणारी आहेत. त्यांनी तर चक्क चंद्रावरंच, चांदोबाच्या गावात झुला ,झोका बांदण्याचे योजिले आहे.ते असे….
या युगाची, नव्या जगाची,
ज्ञानी आम्ही मुले,
चांदोबाच्या नगरीमध्ये,
बांधू आम्ही झुले !
Not failure but low aim is crime. असे मिसाईल मँन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितले आहे.वरील सुविचाराची आठवण करून देणारे संग्रहातील एक काव्यपुष्प म्हणजे पोरा….. ही बालकविता होय.संकटातून मार्ग काढायचा असतो हे सांगताना कवी म्हणतो…..
अभाव खूप असले तरी,
अडकून नसते पडायचे.
ध्येय असावे मोठे पोरा,
आभाळाला भिडायचे !
बालकांच्या अनुशंगाने पालकांचे मोबाईल वेड एका कवितेत आले आहे. आपण एकाच छताखाली राहतो पण आपापला मोबाईल पाहतो. यातून दूरचे जवळ येत असतीलही पण काही वेळा या उलटही होत असते. हे एक जळजळीत वास्तव आहे. हे मुलांच्या नजरेतून सुटलेले नाही. तेंव्हा मुलं पालकांना विनंती या कवितेत अर्जव करतात…..
मोबाईल बघणे पप्पा
आजतरी सोडा.
खेळ, खेळू आज सारे,
वेळ काढा थोडा !
सुजाण पालकत्वाचा एक वास्तूपाठ कविने एका कवितेतून घालून दिला आहे. तो वास्तूपाठ म्हणजे पाल्याची तुलना इतरांशी करायची नाही. ती करू पण नये. कारण म्हणजे प्रत्येक जण येथे जन्मजातंच आगळावेगळा आहे. हे सांगताना चंद्र तारे आम्ही या बालकवितेत कवी म्हणतो,
अंधाराला उजळे पणती,
दिनदुबळ्याच्या घरी,
जरी तिने ना केली कधीही,
सुर्याची बराबरी,
हरूकाचे महत्त्व वेगळे,
कोणी इथे ना कमी.
एकाहून एक भारी सारी,
चंद्र तारे आम्ही.
एका कवितेत काव्यसंग्रहाचा सहनायक ठोंब्या युक्ती वापरून आलेल्या संकटावर मात करतो. डोके हे मनगटापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिध्द करतो. तेंव्हा युक्ती ही शक्तीहून मोठी आहे. हे सांगताना कवी म्हणतो,
शक्तीहून युक्ती मोठी,
नाही मुळींच खोटे,
छोटी युक्ती उलथून टाकी,
डोंगर मोठे, मोठे !!
निर्विवादपणे शेवटच्या दोन्ही बालकविता अप्रतिम आहेत. त्यातील आपण सारे भाऊ ही बालकांत सर्वधर्म समभावाची भावना निर्माण करते. तर माऊलींच्या पसायदानाप्रमाणे संग्रहाच्या शेवटी प्रार्थना आली आहे. ही प्रार्थना कविच्या सर्वव्यापक मागणीची साक्ष देत आहे. ती प्रार्थना अशी…..
अम्रताच्या धारा दे,
चोचीसाठी चारा दे,
श्वासाला वारा दे,
दे निवारा मानवा,
इतकीच भावना !
गुरुमाऊली प्रकाशन उदगीरने हा,’ नव्या जगाची मुले ‘ बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात एकूण ३७ बालकविता आहेत. प्रत्येक कवितेच्या शेजारी कवितेच्या आशयाचे सुंदर आणि कल्पक रेखाचित्रे रेखाटली आहेत. मुखपृष्ठ दिग्दर्शक महेश ढाकणे सर यांनी साकारले आहे. ६४ पानांच्या या संग्रहाची पाठराखण सुप्रसिद्ध बालसाहित्यीक एकनाथ आव्हाड यांनी केली आहे. ९७८ – ९३ – ९३९९४ – ०८ – ० या आय एस बी एन क्रमांकाने प्रकाशित झालेल्या वाचणीय बालकविता संग्रहाची किंमत फक्त ६० : ०० रुपये आहे.
प्रा भगवान कि आमलापुरे.
द्वारे शं गु महाविद्यालय ,
धर्मापुरी.ता परळी वै.
मो ९६८९०३१३२८.