नांदेड- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने २०२१मध्ये प्रकाशित झालेल्या दीपावली अंकांसाठीचे पुरस्कार जाहीर केले असून संकीर्ण विभागातून दैनिक ‘सत्यप्रभा’च्या ‘दीपोत्सव’ या दीपावली अंकास उत्कृष्ट दीपावली अंकाचा बहुमान देत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केला आहे.
अभ्यासकांसाठी आणि साहित्यप्रेमींसाठी हा एक अनमोल खजिना आहे. त्याचबरोबर ख्यातनाम साहित्यिक ना. धों. महानोर व कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या मुलाखती वाङ्मयीन क्षेत्रात भर घालणाऱ्या आहेत. ‘स्त्रियांच्या पंखावर वाढते ओझे… वाहणार कोण व कसे?’ हा ‘स्त्रीप्रभा’ परिसंवादही महत्त्वपूर्ण ठरला. यात अनुराधा दि. ढालकरी, डॉ. सुचिता पाटेकर व स्नेहलता स्वामी यांनी सहभाग घेत लेखांमधून आपली सुधारणावादी मते मांडली. मराठी साहित्यात नव्यानेच कथा लिहू लागलेल्यांसाठी कथास्पर्धा आयोजित केली होती. यातील पारितोषिक विजेत्या कथा दीपावली अंकातून प्रकाशित करण्यात आल्या. व्यंकटेश चौधरी व उर्मिला चाकूरकर यांचे ललित हेही या अंकाचे वैशिष्ट्य होय. तसेच विकास विभागात ‘जालना-नांदेड द्रूतगति मार्ग मराठवाड्याचा समृद्धीचा महामार्ग, महासमृद्धीची चित्रकथा याशिवाय ज्ञान आणि मनोरंजनपर अनेक लेख या दीपावली अंकात आहेत. तसेच बालविभागात रा. रं. बोराडे यांची ‘अर्धा कोयता’ ही किशोर कादंबरी तर लीला शिंदे व भगवान अंजनीकर यांच्या बालकथा त्याचबरोबर अनेक मान्यवर कवी-कवयित्रींच्या कवितांनी ‘सत्यप्रभा’ दीपावली अंक बागेतील सुगंधी फुलांप्रमाणे बहरलेला आहे.
‘सत्यप्रभा’चे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, दीपावली अंकाचे अतिथी संपादक दत्ता डांगे व अंकाची सजावट करणारे शिवानंद सुरकुटवार यांचे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.