मन्याडखोरी समाजशील उभरते युवा नेतृत्व डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे

देशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा होत असताना हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार, विधानसभेतील मुलुख मैदानी तोफ, संसदरत्न आदरणीय भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा वसा आणि वारसा जपणारे मन्याड खोरी समाजशील युवा नेतृत्व म्हणजे प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे होय.

मन्याड खोऱ्यातील अतिशय दुर्गम व मागासलेल्या ग्रामीण भागातील एका छोट्या गावातून ते देशाच्या संसदेपर्यंत ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून व नेतृत्वातून राजकीय इतिहास घडविला. त्यांच्या कार्याची परंपरा जपत सामाजिक भान ठेवून अनेक उपक्रमातून समाज सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांचा आज ४२ वा वाढदिवस आहे. आदरणीय भाई डॉ. भाई केशवरावजी धोंडगे व सौ. चंद्रप्रभावती केशवराव धोंडगे यांच्या पोटी दिनांक 27 मे 1980 रोजी क्रांतीभुवन बहादरपुरा येथे भाऊंचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा हतईपुरा येथे झाले. त्यांचे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे झाले. त्यांना खेळाची आवड असल्याने त्यांनी पदव्युत्तर शिक्षण व पीएच. डी. ही पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून संपादित केली.

लोहा येथील शिवाजी चौकात गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आदरणीय भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांनी उभारला. या प्रसंगी अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या व अनेकांचा विरोध असताना विरोधी पक्षात असलेले आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब यांनी आदरणीय भाईना पाठिंबा दिला. उपोषणाला बसलेल्या आदरणीय भाईना भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. या ऐतिहासिक प्रसंगामुळे दोन राजकीय दिग्गज एकत्र आले. पुढे मैत्रीत रूपांतर होऊन दोन राजकीय घराण्याचे नाते संबंध जुळले. त्यांची कन्या सौ. मनीषा रोहिदास चव्हाण व आदरणीय भाईंचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांचा विवाह दि. 30 एप्रिल 2008 रोजी थाटामाटात संपन्न झाला.

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, ता. कंधार ने त्यांची श्री शिवाजी कॉलेज कंधार च्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी 2007 ला निवड केली. तेव्हापासून महाविद्यालयाची शैक्षणिक भरभराट सुरू आहे. महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय छात्र सेना या विभागांना कार्यरत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या या कारकिर्दीत महाविद्यालयाने विद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके संपादित केली आहेत. महाविद्यालयात राबवलेल्या विविध उपक्रमामुळे NAAC च्या पुनर्मूल्यांकनातून महाविद्यालयास बी प्लस दर्जा मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामगिरीमुळे संस्थेने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे.

श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबर कुटुंबात असणारा सामाजिक व राजकीय वारसा जपत राजकीय कार्याची सुरुवात केली. बहादरपुरा जि.प. गटातून मोठ्या मताधिक्क्याने जि.प. सदस्य म्हणून 2012 साली निवडून आले. त्यांनी या गटातील सामाजिक, शैक्षणिक, प्रश्नांची नोंद घेऊन जिल्हा परिषद नांदेड येथे विविध सभेमध्ये मांडणी करून सातत्याने समाजाचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला. नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद होईल असे कार्य म्हणजे डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहाची सुरुवात वंदे मातरम गीताने करण्याचा ठराव पारित करून घेतला. त्यांचा हा ठराव म्हणजे ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे घडवून आणली.

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या अनेक शाळा व महाविद्यालय कंधार व लोहा परिसरात आहेत. परंतु जागतिकीकरणाच्या आजच्या काळात इंग्रजीचे महत्त्व जाणून इंग्रजी माध्यमाची छत्रपती शंभुराजे इंग्लिश स्कूलची स्थापना 2017 मध्ये केली. या शाळेच्या अध्यक्षा डॉ. सौ. मनिषाताई पुरूषोत्तम धोंडगे या आहेत. त्यादेखील आदरणीय भाऊंच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रातील कार्यात सहभागी असतात. कंधार तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून दर्जेदार शिक्षण व सर्वांगीण विकासाचे कार्य आजतागायत सुरु आहे.

कोविड 19 च्या विषाणूने जगावर महामारीचे संकट लादले. या काळात भारतातीलच नव्हे जगभरातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. रुग्णांना बेड व आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत होती. या जागतिक महामारीच्या संकटात कंधार व लोहा या दोन तालुक्यात सामाजिक जाणिवेतून भाऊचा डबा हा उपक्रम राबवला. या उपक्रमाअंतर्गत कंधार ग्रामीण रुग्णालय व लोहा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व नातेवाईकांना दररोज सरासरी तीनशे ते साडेतीनशे जेवणाचे डबे पोहोचविण्यात आले व ते कार्य आजतागायत चालुच आहे. १ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून 1 मे 2021 पासून हा अन्नदानयज्ञ सुरू झाला तो आजतागायत सुरु आहे. जागतिक महामारी चा काळ संपला तरी ग्रामीण रुग्णांना भाऊचा डबा अखंडित मिळाला पाहिजे असा निर्धार आदरणीय पुरुषोत्तम भाऊंचा आहे. त्यामुळे आज देखील लोहा व कंधार येथील ग्रामीण रुग्णालय येथे भाऊंचा डब्बा रुग्णांना व नातेवाईकांना आधार देतो. अलीकडील काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी जो लढा दिला त्या संपकरी कर्मचाऱ्यांना भाऊच्या डब्याने फार मोठा आधार दिला. भाऊने अन्नदाना बरोबरच महाराष्ट्रात सर्वप्रथम वैयक्तिक स्वखर्चातून लोहा कंधार येथील डॉक्टराना पीपीई किट चे वाटप केले. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीतील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींना कोरोना महामारीच्या काळात स्वतः फोन करून दिलासा दिला, आधार दिला. मुख्यमंत्री सहायता निधीला स्वखर्चातून एक लाखाची मदत केली.

श्री शिवाजी विधी महाविद्यालयातील दिव्यांग खेळाडू कु. भाग्यश्री जाधव ने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून आदरणीय भाऊंनी एक लाखाची मदत केली. भाऊ स्वतः क्रीडाप्रेमी असल्याकारणाने कंधार लोहा तालुक्यातील जे कोणी विद्यार्थी त्यांच्याकडे खेळाच्या साहित्याची मागणी करतात ते साहित्य त्यांना भाऊ कडून नेहमी मिळाले आहे. किवळा येतील अत्यंत गरीब विद्यार्थिनीला असलेली शिक्षणाची आवड लक्षात घेऊन आदरणीय भाऊनी त्या मुलीला दत्तक घेतलेले आहे. मौजे चिखलभोसी येथील उमाकांत वरपडे या कार्यकर्त्याला अर्धांगवायूचा झटका येऊन अपंगत्व आले. या कार्यकर्त्याला व्यवसाय करण्यासाठी पन्नास हजाराची मदत करून व्यवसाय उभा करून दिला. सोनखेड येथे अत्याचार झालेल्या पीडित मुलीच्या वडिलांना आधार देत श्री शिवाजी मोफत.

एज्युकेशन सोसायटीत कर्मचारी म्हणून घेण्यात आले. भाऊने स्वाभिमानाने नोकरी देऊन मानवताधर्म जपला.

महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कंधार लोहा परिसरातील मन्याड खोऱ्याचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेत बुलंद करणाऱ्या आदरणीय भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचा शैक्षणिक, राजकीय व सामाजिक वारसा आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबवत आहात. हा वारसा व त्यांच्या कार्याची प्रेरणा आपणास अविरत बळ देवो. मन्याड खोऱ्याचा हा आवाज आपल्या कार्यकर्तृत्वाने पुन्हा बुलंद होवो. हीच आज आपल्या जन्मदिनी हार्दिक हार्दिक सदिच्छा….. सप्रेम जय क्रांती…!

प्रा. डॉ. उमेश भ. पुजारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *