फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग , राज्य महामार्ग बरोबरच अंतर्गत रस्ते व तांडावस्ती च्या रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून सरकारी तिजोरीतून नवीन रस्ते बनवणे , दुरुस्ती करणे यासाठी कोटीने पैसा येतो परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठांच्या डोळेझाकपणामुळे नाकर्तेपणाचा कळस गाठत टक्केवारी चे धनी ठरलेले संबंधित ठेकेदार व अधिकारी मात्र मनमानी कारभार करत असल्यामुळे या भागातील रस्त्यांची अवस्था बकाल झाली असून अधिकारी , ठेकेदार मात्र मालामाल झाले अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नांदेड ते उदगीर राष्ट्रीय महामार्ग बरोबरच फुलवळ ते मुंडेवाडी , फुलवळ ते जंगमवाडी , फुलवळ ते सोमासवाडी , फुलवळ महादेव मंदिर ते कंधारेवाडी-पानशेवडी , बिजेवाडी ते शेकापूर राज्य महामार्ग , पट्टाचा तांडा ते पोखर्णी , पानशेवडी ते नेहरूनगर , फुलवळ ते मुंडेवाडी , आंबूलगा ते वाखरड , सोमठाण ते कुरुळा आदींसह परिसरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . येणाऱ्या पावसाळ्यात याचे गंभीर परिणाम जणमाणसाला नक्कीच भोगावे लागतील तेंव्हा वेळीच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन सदर प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

नांदेड ते उस्माननगर , फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० चे काम गेली दोन ते अडीच वर्षांपूर्वी चालू झाले खरे परंतु अद्यापही त्याचा परिपूर्ण शेवट झालाच नाही . सदर रस्त्याचे काम चालू झाले तेंव्हा या भागातील जनतेच्या अपेक्षांना आकाश ठेंगणे झाले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या सुरुवातीला या भागातील जनतेने व शेतकऱ्यांनी अधिग्रहित शेत जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी आंदोलने केली , रास्ता रोको केला , पण शेवटी ते सर्व निष्फळ गेले आणि निराशाच पदरी पडली. त्यामुळे आजही काही ठिकाणी या माहामार्गाचे काम अपूर्णच असल्याने प्रवासी व वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून त्याचे परिणाम येणाऱ्या पावसाळ्यात पाहायला मिळतील.

मानसपुरी येथील महादेव मंदिरापासून अर्धवट राहिलेला राष्ट्रीय माहामार्ग खडतर जीवघेणा बनला आहे तर बहाद्दरपुरा येथील नेहरू उद्यान शांतिघाट येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. तसेच मन्याड नदीवर असलेल्या पुलावरील रस्त्याची सुद्धा अशीच खड्याने चाळणी झाली असून पुलाच्या बाजूने असलेले संरक्षण पाईप गायब झाले आहेत तर पथदिवे कित्येक दिवसांपासून बंद पडले असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. याकडेही लक्ष द्यायला कुणाला वेळच नसल्याने जणमाणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर राष्ट्रीय महामार्ग चा मन्याड नदीवर मंजूर नवीन पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने हा प्रश्न प्रलंबितच आहे.

फुलवळ येथेही याच राष्ट्रीय माहामार्गाचे काम अर्धवट सोडून संबंधित ठेकेदार गायब झाला असून नेमके वळणाच्या ठिकाणीच एका बाजूने सर्व्हिस रोडला अनेक वेळा मोजमाप टाकूनही अद्याप मुहूर्त सापडला नसल्याने भविष्यात हे अपघाताचे प्रमुख ठिकाण बनेल अशी भीती जनतेतून व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकारी सुद्धा या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसून केवळ वेळमारुपणा करत तारीख पे तारीख देत असल्याने नक्कीच येथे कोणाचातरी जीव गेल्याशिवाय यांचे डोळे उघडत नाहीत आणि हे या रस्त्याचे काम पूर्ण करत नाहीत अशीच चर्चा जनतेतून ऐकायला मिळत आहे. तर याच महामार्गावर काही ठिकाणी चुकीचे किलोमीटर चे दिशादर्शक फलक लावण्यात आल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबद प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

फुलवळ ते मुंडेवाडी-वाखरड जाणाऱ्या प्रमुख रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा पडला असून जागोजागी खड्डे व दोन्ही बाजूंनी झाड-झुडपांचे काटेरी कुंपण हळूहळू आपले पाय पसरत आहे. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याने नाविलाजने गावातील अंतर्गत रस्त्यावरून त्यांची वाहतूक चालू आहे. तर मुंडेवाडी कडुन काही अंतरावर अर्धवट असलेले रस्त्याचे काम कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा होऊन बसला आहे.

एवढेच काय तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत अनेक वाड्या – तांडेवस्तीना रस्ताच मिळाला नसल्याने तेथील जनतेचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन बसले असून सरकारी तिजोरीतून तांडावस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो तो नेमका कुठे खर्च होतोय याचाच थांगपत्ता लागत नसल्याने जर मूलभूत गरजा पैकी रस्ता हा एक असतानाही तो आम्हाला स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत मिळाला नाही.

अशीच स्थिती फुलवळ अंतर्गत असलेल्या महादेव तांडा येथे पाहायला मिळते , उन्हाळ्यातच धड पायी चालन्यायोग्य रस्ता नसून पावसाळ्यात एखादा रुग्ण असो का प्रसूती ची महिला त्यांना बाजेवर टाकून दवाखान्यात पोहचावे लागते , निवडणूक कोणतीही असो मतदानाची भीक मागायला आलेला प्रत्येक नेता , कार्यकर्ता म्हणतो यावेळी आम्हाला मतदान करा नक्कीच तुमचा रस्त्याचा प्रश्न सोडवू . पण असेच वर्षानुवर्षे गेली पण अद्याप आम्हाला साधा रस्ता मिळाला नाही त्यामुळे आजही आम्ही स्वातंत्र्यात जगतोय का पारतंत्र्यात हेच कळेनासे झाल्याच्या भावना येथील तांडावासीय बोलून दाखवत असून अशीच परिस्थिती कित्येक तांडावस्तीत असल्याचे दिसून येते.
_________________________
प्रतिक्रिया

आनंदा अच्युतराव पवार
सामाजिक कार्यकर्ते फुलवळ..
“शासनाच्या तिजोरीतून शहरीसह ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी करोडो रुपये चा निधी उपलब्ध होतो परंतु स्थानिक गुत्तेदार व संबंधित अधिकारी साटेलोटे करत रस्त्यांची दर्जाहीन कामे करून अधिकारी टक्केवारी चे तर गुत्तेदार निव्वळ नफ्याचे बघतो म्हणून तर दरवर्षी तेच तेच रस्त्यांची पुन्हा पुन्हा करूनही रस्त्यांची अवस्था आहे तशीच आहे. असाच प्रकार राष्ट्रीय महामार्गाचा झाला असून कित्येक वेळा लेखी निवेदने देऊनही काम प्रलंबित पडले आहे. यासाठी जसे मोठमोठ्या रस्त्यांच्या कामांना क्वालिटी कंट्रोल कडून कालमर्यादा ठरवून दिलेल्या असतात तसेच आता ग्रामीण व ग्रामपंचायत स्थरावरही एकदा केलेल्या रस्त्याला कालमर्यादा ठरवून देऊन तेवढ्या कालावधीत जर तो रस्ता खराब झाला तर त्या गुत्तेदाराने व संबंधित अधिकाऱ्याने स्वखर्चाने तो रस्ता दुरुस्ती करून देणे बंधनकारक केले तर नक्कीच हा भ्रष्टाचार थांबेल आणि कामेही चांगल्या दर्जाची होतील“

_____________
प्रतिक्रिया -२

भगवान राठोड
भाजपा कंधार तालुका अध्यक्ष
“ मतदार संघाला कोणी वालीच नसल्यागत परिस्थिती निर्माण झाली असून भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे. गेली कित्येक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग चे काम चालू आहे परंतु आजही ते पूर्ण झाले नसून अनेक ठिकाणी अर्धवट कामे प्रलंबित असल्याने सामान्य माणसाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एवढेच नाही तर पांगरा ते कंधार – माळाकोळी चा रस्ता , पाताळगंगा ते उमरज-दगडसांगवी , पानशेवडी ते नेहरूनगर असे अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून आमच्या मतदार संघात अनेक तांडावस्ती , वाड्या-खेडे आहेत ते तर अद्यापही रस्त्यांपासून वंचित आहेत. तांडावस्ती साठी कोणीही कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देत नाही ही शोकांतिका आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी ची वचक नसल्याने ठेकेदार व अधिकारी साटेलोटे करून निकृष्ट दर्जाचे कामे करत निधी हडप करत असल्याने मतदार संघात या तीन वर्षात कुठेच विकासात्मक कामे दिसत नसून भ्रष्टाचार ची लागलेली कीड जोपर्यंत नष्ट होणार नाही आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत मतदार संघातील जनतेला विकास दिसणार नाही असे आपले स्पष्ट मत आहे.“
