दिनांक : 8 जून 2022
आपल्याकडे दहावी वा बारावीचे, एवढेच काय अगदी कोणत्याही परीक्षेचे निकाल घोषित करण्यात येणार हे समजले रे समजले की पालकांची जणू अघोषित आणीबाणी जाहीर होते. शाळा, महाविद्यालये, शिकवणी घेणारा वर्ग हे सर्वच सरसावतात… कशासाठी, अहो पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि गुणवंतांचे अभिनंदन करण्यासाठी! आज महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, आणि सगळीकडेच धामधूम सुरू झाली आहे. मी निकालाच्या आकडेवारीत सद्या घुसणार नाही. अभिनंदन तर सुरू झाले आहे पण कोणाचे हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं की हे अभिनंदन गुणवंतांचे नसून त्यांच्या गुणांचे म्हणजे टक्केवारीचे आहे. काय म्हणता, हे कसे? काही सन्माननीय अपवाद वगळता पालकांच्या चेहर्यावर मला केवळ आणि केवळ टक्केवारीच दिसते आहे.
मुलांना किती गुण प्राप्त झाले आणि किती टक्केवारी मिळाली यावरच तर आपल्या समाजात त्या शिक्षार्थ्याने काय करावे हे ठरत असते. प्रथमतः तर बारावीच्या टक्केवारीवर पुढचे काहीच अवलंबून नसल्याने त्यांना अजून नीट, जेईई आणि सीईटीचे गड सर करायचे आहेत! यासाठी विद्यार्थी वर्गावर प्रचंड दबाव आणला जातो, सर्व संबधित घटक याला कमी अधिक प्रमाणात का होईना जबाबदार असतात. यासाठी ते दिवसरात्र कष्ट करत असतात, नाही म्हणायला कोरोनामुळे या दोन वर्षात सर्वच मुलांची अभ्यासातून बर्यापैकी सुटकाच म्हणा ना हव तर, झाली होती! अगदी बालवाडीच्या गोड गोजिरवाण्या लेकरांपासून ते बारावीपर्यंत आणि पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी सुद्धा अभ्यासापासून विन्मुख झाले अशी पालक, शिक्षक आणि एकंदर समाजव्यवस्थेचीच प्रचंड मोठी तक्रार आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 येऊ घातले आहेच, त्यासाठी वादातीत पूर्वतयारी करावी लागणार आहे, सुरू आहे तरीही आपण एक समाज म्हणून अपयशी ठरत आहोत हे सत्य आहे, आणि हे बदलण्यासाठी प्रामुख्याने पालकांची मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे. बारावीत घेतलेले हे गुणांचे फुगे फुटणे आवश्यक आहेच… हे गुणांचे फुगे फुटून विद्यार्थांना अंगीभूत कौशल्य विकसित करण्यासाठी पालकांनी रासायनिक अभिक्रियेतील उत्प्रेरकाची भूमिका निभावणे अगदीच आवश्यक झाले आहे.
मुलांना जर कोरोना नंतर शाळा महाविद्यालयांमध्ये पाउल ठेवावे वाटतं नसेल तर हे पालक, शिक्षक आणि आपल्या समाजाचे अपयश आहे… या सर्वांमध्ये मोबाईल, तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमे यांचा लहाना पासून ते थोरांपर्यंत अतिरेकी वापर कारणीभूत आहे. जे पालक, शिक्षक आणि समाजधुरीण स्वतःच मोबाईल, तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांच्या व्यसनात डुंबून गेले आहेत त्यांनी आपले पाल्य आणि विद्यार्थी यांच्याकडे कशी बोटे दाखवावीत? त्या लेकरांना जन्माला आल्यापासून मोबाईलच्या सानिध्यात ठेवले तर मग का बरे मूल बारावीपर्यंत मोबाईलच्या आहारी जाणार नाही? आणि अशा विद्यार्थ्यांकडून अपेक्षा तरी कशा ठेवाव्या? पालकांनी संवेदनशीलपणे आणि धीरोदत्तपणे वागून मुलांच्या यश – अपयशाचे स्वागत केले पाहिजे. मुलांना सतत पालकांचा मानसिक आधार वाटला पाहिजे. त्या गुणी जीवांना “मैं हूँ ना…” असे पाठीशी असणारे पालक हवे असतात, हे लक्षात असू द्यावे. मार्क्स, मार्क्स आणि केवळ मार्क्स हे जीवनातील एकमेव अंतिम सत्य असू नये… बारावीचे जे काही निकाल आले असतील त्याचे औदार्याने स्वागत आणि स्विकार केला पाहिजे. आपल्या पाल्यांना पटवून देण्यासाठी आधी आपण समजून घेतले पाहिजे की बारावी, नीट जेईई, सीईटी ही जीवनाची अंतिम ध्येय नाहीतच मुळी. प्रथम आपल्या पाल्यांना माणूस बनवूया, नंतर ते काहीतरी आपोआप बनतील आणि सनदशीर मार्गाने अर्थार्जन करतील.
आपले अहंकार, घमेंड, दिवास्वप्न सर्व काही आपल्या स्वतःजवळच ठेवायला हवे. मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडण्यासाठी हातभार लावावा. मुले आपली प्रतिमा नाहीत, त्यांची स्वतःची स्वतंत्र प्रतिमा आणि प्रतिभा आहे तिला खुलू द्यावे… पालक म्हणून तुमची चाणाक्ष नजर त्यांच्यावर असू द्यावी, पण त्यापेक्षाही जास्त “मैं हूँ ना” हा विश्वास त्यांच्यावर असू द्यावा. पालक जसे वागतील, मुले तशीच घडतील, शिक्षक आणि प्राध्यापक जसे वागतील, मुले तशीच घडतील. समाजात काय घडामोडी घडत आहेत मुले त्या आपसूक करायला लागतील, म्हणून पालक, शिक्षक आणि समाज म्हणून आपण आपल्या भूमिकांची पुनर्बांधणी करणे आजच्या आधुनिक युगात अपरिहार्यता आहे. “शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” हे तुकारामांचे शब्द आपण मनात कोरले पाहिजेत… काही दिवसांपूर्वी यूपीएससी चे निकाल जाहीर झाले, त्यात अशा काही घटना घडल्या की मन विदीर्ण झाले. सारखे नाव आहे अर्थात नावात साधर्म्य आहे म्हणून संपूर्ण माहिती खात्रीशीररीत्या पडताळून न पाहता काही जणांनी स्वतःलाच यशवंत घोषित केले, स्वतःचा गवगवा करून घेतला आणि सत्य समजताच यांच्यापैकी कोणाला हार्टअटॅक आला तर कोणी आजारी पडले. एकतर एवढी उच्च दर्जाची परीक्षा देत असताना अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे निषेधार्हच आहे, पण तुम्ही अभ्यास सोडून शारीरिक, भावनिक आणि मानसिक पातळ्यांवर किती कमकुवत आहात याचे केविलवाणे दर्शन घडवणारे आहे.
जाता जाता एवढेच सांगायचे आहे की बारावीच्या यश, अपयशाने हुरळून जाऊ नका अथवा स्वतःचे खच्चीकरण देखील होऊ देऊ नका! Slow and steady wins the race हे तत्त्व मनावर बिंबवण्याचा यशस्वी प्रयत्न करा आणि चालत रहा… मार्ग निश्चित करा, पण तो करताना पर्यायी मार्ग सुद्धा जवळ असू द्या. आपले प्लॅन A, प्लॅन B आणि प्लॅन C हे तीन मार्ग निवडून ठेवा आणि मोबाईल, तंत्रज्ञान व समाजमाध्यमे यांचा अतिशय अल्प, गरजेपुरता व अभ्यासापुरताच वापर करा, कारण आपले आरोग्य आणि दृष्टी ही अगाध सृष्टी भरभरून पाहण्यासाठी सक्षम राहिली पाहिजे… मोबाईलमुळे पाठीला बाक, मणक्याचे, मानेचे विकार मोठ्या प्रमाणावर जडत आहेत, तुम्ही सर्व अजून खुपच लहान आहात, अख्खे आयुष्य तुमच्या पुढ्यात आहे, आयुष्याचे मोल मोबाईल, तंत्रज्ञान आणि समाजामध्यमांपेक्षा कैकपटीने अनमोल आहे हे लक्षात घेऊन आनंदी जीवन जगत, आनंद वाटत आनंदाचे मळे फुलवत राहा…आणि आपापल्या जाती, धर्म, पंथांच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्याचे भेदाभेदावर आधारित पायंडे कृपया बंद करा… राष्ट्रीय एकात्मता शिकवायची आणि प्रत्येक ठिकाणी जाती, धर्म आणि पंथ यांचाच आधार घ्यायच्या दुटप्पी धोरणाचा अनुनय बंद करा… शिकवणीवाल्यांनी जरा सबुरीने घ्या, कमी गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना न्यूनगंड पछाड़णार नाही एवढ्याच मात्रेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या जाहिराती करा, अवास्तव, प्रसिद्धीचा मोह टाळा, मान्य आहे आपली रोजी रोटी या विश्वाशी निगडित आहे, पण हजारो, लाखो कोवळ्या जीवांचा हा प्रश्न आहे, किंचित तारतम्याने गुणवंत आणि अपयशी यांच्याशी संपर्क आणि संवाद करा. सर्वांच्याच पाल्यांना, सर्व पालकांना आणि शैक्षणिक संस्थांना उदंड हार्दिक शुभेच्छा! “सितारों के आगे जहाँ और भी है” हे आपल्या पाल्यांच्या हाताला धरून समजून सांगा आणि समजून घ्या…
धन्यवाद!!
आपली स्नेहांकित,
डॉ. संगीता गोविंदराव आवचार,
उपप्राचार्य तथा इंग्रजी विभाग प्रमुख,
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी – 431 401
चल भाष : 9767323290
Email : [email protected]