पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ग्राम पंचायत ने गावातील रस्ते , नाल्यांची साफसफाई करून घेणे आवश्यक होते. कारण पावसाळ्यात पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे व त्यावर बसणाऱ्या डासांमुळे अनेक आजारांची लागण होत असते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. याची खबरदारी ग्राम पंचायत ने वेळीच घेणे आवश्यक आहे.
आजघडीला गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्यांच्या बाजूने असलेल्या नाल्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. दोनवर्षांपूर्वी येथे सव्वाकोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली , त्यावेळी पाईपलाईन करण्यासाठी संबंधित ठेकरदाराने गावातील चांगल्या सिमेंट रस्त्यांना फोडून त्यातून पाईपलाईन केली त्यावेळी रस्त्याची झालेली दुरावस्था आता पावसाळ्यात त्याचे गावकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत .
तर काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूने असलेल्या नाल्या निकामी झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी बाहेर पडायलाच तयार नाही तर काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग चे काम करण्यासाठी खोदलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेले अंतर्गत रस्ते खोल पडल्याने त्या रस्त्यावरचे पाणी कुठेच निघायला तयार नाही . परिणामी गावातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून दिवसाढवळ्या नीट चालण्यायोग्य राहिले नसलेल्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी कसे जावे असा प्रश्न गावकऱ्यातून व्यक्त केला जात आहे