कंधार ; दिगांबर वाघमारे
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांकरिता कंधार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील २७५ शाळेतील १ लाख ९५ हजार पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७२ हजार ५९ पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली होती.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील २७५ शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. संबंधित केंद्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही. याची खबरदारी घेण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारे स्वागत करण्यात येणार आहे.
बालभारतीकडून मे महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या व जून महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात एकूण तीन टप्प्यात १ लाख ६५ हजार ५१० पाठयपुस्तके कंधार पंचायत समितीच्या शिक्षण विभागास उपलब्ध करून देण्यात आले. कंधार गटसाधन केंद्रातून जून मध्ये कंधार, पानभोसी, बहाद्दरपुरा, शेकापूर, फुलवळ, आंबुलगा, रुई, गोणार, कौठा, बारुळ, मंगलसांगवी, उस्मानगर, शिराढोण, चिखली, कुरुळा, बोळका, दिग्रस (बु) आदी एकूण १७ केंद्रांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणविस्तार अधिकारी राजेश्वर पांडे, शिक्षणविस्तार अधिकारी वसंत मेटकर, पाठ्यपुस्तक विभाग प्रमुख प्रशांत नरहरे, केंद्रप्रमुख कंधार माधव कांबळे ,आनंद तपासे आदींसह सर्व केंद्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, विषय तज्ञ, विशेष शिक्षण तज्ञ, विशेष शिक्षक आदींनी परिश्रम घेतले .