साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना ‘भारतरत्न ‘ देण्यास सत्ताधिस का तयार नाहीत ?

थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से म्हणाले, “ज्या देशात जवाहरलाल नेहरू,लाल बहादुर शास्त्री, अण्णाभाऊ साठे व राज कपूर सारखी देवमाणसं जन्मली आहेत तो देश गरीब कसा होऊ शकतो ? एकट्या राज कपूरच्या बदल्यात रशियातील

सर्व वैभव आम्ही भारताला देण्यासाठी तयार आहोत.आणि हे सारे देव माणसं जर मिळाली तर आमच्याकडे देण्यासाठी काहीच राहिलं नाही तरी चालेल!

अण्णा भाऊ साठे ….. source

“थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से यांनी खुप महत्वाचा संदेश दिला आहे.परंतू अजूनही आमच्या सत्ताधिशांना अण्णा भाऊ साठे पुर्णत: समजलेच नाहीत असे वाटते.म्हणूनच हे सत्ताधिश  ‘अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार ‘ देण्यास तयार नाहीत का ?

असा प्रश पडतोय….
गिरणीमध्ये साचावर काम करत असताना,एक एक धागा मिळून जसे कापड बनते तसे एक एक अक्षर मिळून एकेक ओळ बनत होती.आणि एक एक ओळ मिळून एक एक पोवाडा जन्मत होता.यातूनच क्रांतिकारी “स्टॅलिनग्राडचा पोवाडा “

कामगार नेते अण्णा भाऊ साठे यांच्या हातून जन्माला आला.कॉ.अण्णा भाऊ साठे हे हा पोवाडा गायचे व त्यांचे लहान भाऊ शंकर भाऊ साठे हे झिलकारीची साथ द्यायचे.मोठमोठे नेते जे एका तासाच्या भाषणात सांगत तेच अण्णा भाऊ साठे एका पोवाड्यात सांगत.

शब्द सुरांच्या त्या मजबूत साखळीचा खळाळता आवाज कामगार वर्गाला झपाटून टाकत असे.अण्णा भाऊ साठेंच्या उडत्या चालीच्या खणखणीत गीतांनी कामगारांना वेड लावले होते.तो आवाज पार रशिया पर्यंत जाऊन पोहचला होता.


तर साहित्य विश्वात अण्णा भाऊ साठेंनी हिमालया पेक्षा ही उंचावर प्रतिभाशाली साहित्याची झेप घेतली होती. अण्णा भाऊंनी साहित्य क्षेत्रातही प्रचंड भरारी मारली. त्यांच्या अनेक साहित्यकृती चौदा भारतीय भाषेत प्रसिद्ध झाल्या;तर याशिवाय झेक,पोलीश,जर्मन,फ्रेंच,स्लोव्हॉक आणि रशियन भाषेतही रूपांतरित झाल्या.

त्यांच्या अजरामर अशा फकिरा,चित्रा,डोंगरची मैना,वैजयंता, वारणेचा वाघ,टिळा लावते मी रक्ताचा,अशी ही साताऱ्याची तऱ्हा,मुरळी मल्हारी रायाची व चंदन या कथा आणि कादंबऱ्यांवर नऊ चित्रपट निघाले.अण्णा भाऊंच्या चित्रपट क्षेत्रातला प्रवासही मोठा दिमाखदार आहे.

फकिरा व अन्य काही चित्रपटात त्यांनी अभिनय ही केला व अनेक चित्रपटांतील काही सीनचे दिग्दर्शनही अण्णा भाऊंनी केले.अण्णा भाऊंचे बहुतेक चित्रपट अतिशय चांगले चालले.या क्षेत्रातही अण्णा भाऊंनीआपली प्रतिभा दाखविली.

अण्णा भाऊ साठे ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात त्यांनी त्यांचे नाव अक्षरश: सुवर्णाक्षरांनी कोरुन ठेवले आहे.अण्णा भाऊ साठेंच्या अफलातून व्यक्तिमत्त्वामुळे चित्रपट क्षेत्रातही त्यांना चांगले मित्र मिळाले.

जसे की,शंकर,शैलेंद्र,कैफी आजमी,बलराज सहानी,राज कपूर,नर्गिस दत्त,डेव्हीड,नाना पळशीकर, गुरुदत्त,ए.के.हंगल,के.ए.अब्बास,उत्पल दत्त,रमेश देव, राजशेखर,चंद्रकांत,सुलोचना,दादा साळवी,दत्ता माने, अनंत माने,रत्नमाला,अरुण सरनाईक,भालजी पेंढारकर.

तर राज कपूर आणि भालजी पेंढारकर यांना सिनेमा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व सर्वात मोठा मानाचा असलेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन राष्ट्रपतींनी गौरविले आहे.अशी अफाट कर्तुत्ववान माणसे अण्णा भाऊंच्या सहवासात आली होती.

अण्णा भाऊंची मित्र बनली होती.यांच्या सहवासामुळे अण्णा भाऊ साठे यांना मराठी व्यतिरिक्त इतर भाषा ही चांगली समजत होती व ते अस्सल हिंदीत ही मित्रांना बोलायचे.


एक कामगार नेता,शाहीर,कलावंत आणि उच्च प्रतिभेचे साहित्यीक या रुपाने अण्णा भाऊ साठे या नावाचं थोर व्यक्तीमत्व भारताच्या सिमा ओलांडून साता समुद्रापार पोहचले होते.यामुळेच तर १९४८ साली अण्णा भाऊंना परदेशगमनाचा योग आला होता.

युरोपातील फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस या ठिकाणी भरणाऱ्या शांतता परिषदेसाठी अण्णा भाऊंना रितसर निमंत्रण आले होते. अण्णा भाऊंचे परममित्र आणि त्या काळातील एक सुप्रसिद्ध सिने अभिनेते बलराज साहनी यांनी अण्णा भाऊ साठेंची पॅरिसपर्यंतची तिकिटेही काढली होती.

परंतू यावेळी अण्णा भाऊ साठेंना पॅरिसला जाता आले नाही. कारण तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठेंच्या परदेशगमनावर आडकाठी आणली होती.अण्णा भाऊ साठेंनी रितसर दोनवेळा पासपोर्ट काढला होता.

परंतू त्यात ही त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या हस्तकांकरवी काही त्रुट्या काढून कायदेशीर अडथळा निर्माण केला. यामुळे त्यांना जाता आले नाही.म्हणून मित्र बलराज साहनी हे अण्णा भाऊ साठे यांच्या विनाच गेले.याची खंत त्यांनी तेथील व्यासपीठावर व्यक्त केली.

पुढे सन १९६१ मध्ये अण्णा भाऊ साठेंच्या अजरामर ‘फकिरास’ राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि भारत-रशिया या दोन मित्र राष्ट्रांत सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होण्यासाठी एक संमेलन रशियात आयाेजित करण्यात आले असल्याने “इंडो सोव्हिएट कल्चरल सोसायटीने” अण्णा भाऊ साठेंना या संमेलनासाठी सन्मानपुर्वक रशियाला बोलावले.

अण्णा भाऊ साठे हे सन्मानाने रशियाला गेले. या प्रवासाबाबद त्यांनी “माझा रशियाचा प्रवास” यात सविस्तर वर्णन केले आहे.
रशियन लोकांच्या मनात कलावंत आणि कामगारांविषयी अतिशय जिव्हाळा आहे.कलावंत म्हणजे देव व कामगार म्हणजे सृष्टीचा चालक अशी येथील लोकांची पवित्र भावना आहे.अशा देशात अण्णा भाऊ साठे जेव्हा आपला परिचय देतात तेंव्हा ते म्हणतात…मी ज्या पवित्र भूमीतून आलो आहे,त्या भूमीत पराक्रमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे.

अण्णा भाऊ साठे यांनी स्व परिचया पेक्षा भारतभूमी ही नररत्नांची खान आहे हे जागतिक व्यासपीठावर ठणकाऊन सांगीतल्याच दिसत आहे.याची महती पुढे पहावयास मिळाली.प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते,अभिनेते राज कपूर यांना जागतिक चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने रशियात जाण्याचा योग आला.

रशियन संस्कृती व कला,भारतीय संस्कृती व कला यात साम्य असलेल्या त्या महोत्सवाच्या प्रारंभी निवेदकाने राज कपूर यांना कॉम्रेड म्हणून संबोधले.यावेळी कॉ.राज कपूर बोलतांना म्हणाले की,”आम्ही गरीब देशातील माणसं असलो तरी कलेनं समृद्ध आहोत !

“यावर तेथे उपस्थित असलेले थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से म्हणाले की, “ज्या देशात जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री,अण्णा भाऊ साठे व राज कपूर सारखी देवमाणसं जन्मली आहेत तो देश गरीब कसा होऊ शकतो ?

एकट्या राज कपूरच्या बदल्यात रशियातील सर्व वैभव आम्ही भारताला देण्यासाठी तयार आहोत.आणि हे सारे देव माणसं जर मिळाली तर आमच्याकडे देण्यासाठी काहीच राहिलं नाही तरी चालेल!” मॅगव्हेन्सेच्या या वक्तव्याने रशियाच्या त्या संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.अर्थातच अण्णा भाऊ साठे हे व्यक्तीमत्व किती मोठे आहे हे जागतिक व्यासपीठावरुन सांगीतल्या गेले आहे.

अण्णा भाऊ साठे यांची थोरवी रशियास समजली आहे.परंतू दुर्दैव असे की,रशियात गेलेल्या भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांना अण्णा भाऊ साठे यांची थोरवी समजली नव्हती.आणि आजही भारताच्या मुख्य सत्ताधिशांची तिच आवस्था आहे.


भारतरत्न पुरस्काराच्या मुल्यांकनासाठी जे काही लागते, त्या पेक्षाही अधिकचे कर्तुत्व अण्णा भाऊ साठे या प्रतिभेच्या हिमालयाचे आहे.जागतिक दर्जाचे ते साहित्यीक आहेत.भारताचं नाव जागतिक साहित्य विश्वात त्यांनी निर्माण केलं आहे.

जागतिक किर्तीच्या या प्रतिभावंताच्या जयंतीचे १ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२० हे जन्मशताब्दी वर्ष आहे.या औचित्याने विश्व साहित्यीक साहित्यरत्न सत्यशोधक स्वातंत्र्य सेनानी अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ” भारतरत्न पुरस्काराने ” सन्मानित तरण्यात यावे अशी मागणी समाज बांधव, विचार अनुयायी,साहित्य प्रेमी,सामाजिक नेते,संघटना, विविध पक्षाचे आजी माजी नामदार,खासदार,आमदार व आदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वजी ठाकरे,पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना शिफारस पत्र,विनंतीपर निवेदने दिली आहेत.

अद्याप तरी या सत्ताधिशांनी यावर विचार केला नसल्याचे निदर्शनास येत आहे.थोर रशियन चित्रपट निर्माते मॅगव्हेन्से यांनी म्हटल्या प्रमाणे रशियन लोकांना व तेथील सत्ताधिशांना जर आजही अण्णा भाऊ साठे यांना सन्मानित करावे अशी मागणी केली असती तर त्यांनी तो सन्मान केंव्हाच दिला असता.परंतू येथे मात्र उपेक्षीताच्या या महानायकास उपेक्षीतच ठेवण्याचा घाट या सत्ताधिशांचा दिसतो आहे.

आपल्या मुख्यमंत्री महोदयांना त्यांचे आजोबा वंदनिय प्रबोधनकार ठाकरे हे थोर स्वातंत्र्य सेनानी संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार अण्णा भाऊ साठे यांचे सहकारी होते याचा विसर पडल्याचे ही दिसत आहे.तसे नसते तर त्यांनी केंव्हाच कॅबिनेटमध्ये हा ठराव घेतला असता व तो केंद्रास पाठविला असता.

तर गुजरात वाल्यांचा ही अप्रत्यक्ष राग जाणवतोय… अण्णा भाऊ साठे यांनी मुंबई ही गुजरातला जोडू दिली नाही. म्हणूनच यदाकदाचित या मागेही काही गुपीत आहे का ? हा प्रश्न ही पडत आहे.तसे नसते तर अनेक खासदारांनी शिफारस पत्र लिहल्यामुळे माननिय पंतप्रधान महोदयांनी हा निर्णय घेतला असताच ना ?

घ्यायला पाहिजे होता हेच अपेक्षीत आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षीय जयंती सोहळ्याची ३१ ऑगस्ट २०२० रोजी सांगता होत आहे.परंतू त्यांना ” भारतरत्न पुरस्काराने ” सन्मानित करण्याची घोषणा अद्याप तरी करण्यात आली नाही.

त्यामुळे… एकूणच आमच्या देशाचे सत्ताधिश ‘अण्णा भाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार ‘ देण्यास तयार नाहीत ? असे समजावे का ? हा प्रश्न प्रश्नार्थकच राहील असे वाटते!


“वाटले ते लिहले !” आणि उपरोक्त पुरस्कार वंदनिय अण्णा भाऊ साठे यांना मिळे पर्यंत लिहतच राहणार!!

uttam bable

उत्तम बाबळे,
संपादक ,पत्रकार

तथा साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *