भारत या पृथ्वीतलावर जेवढी प्राचीन देश आहेत त्यापैकी एक देश आहे. हा देश संस्कार जपणारा, संस्कार घडविणारा व इतरांनवर संस्कार करणारा देश आहे. येथे चांगल्या रूढी परंपरेचं जतन केले जाते. येथे वाईट रुढी परंपरेला गाढले जाते.आजही गाढण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज सुदृढ होण्यासाठी हे गरजेचंही आहे. चांगल्या रूढी परंपरेचं जतन व वाईटचं मर्दन होणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी येथे अनेक संत विद्वान जन्माला आले. त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी काम ही केले. आधुनिक काळात आजही सुधारणेची प्रक्रीया चालू आहे.सुधारणेची प्रक्रीया सतत चालू राहणार आहे. वाईट प्रथेचे निर्मूलन व चांगल्या मुल्यांचे वर्धन करायचं असेल तर सर्वांनाच शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
गुरु पौर्णिमा पौर्णिमा का साजरी केली जाते? या दिवशी महाभारतकर्ते व्यास मुनीचा जन्म झाला असे मानले जाते. त्यांनी वेदाचे वर्गीकरण केले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणून ही ओळखले जाते. त्याचा जन्म दिन म्हणून गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच आजच्या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले व याच दिवशी त्यांनी आपल्या पाच शिष्यास पहिले प्रवचन दिले म्हणून आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो.
भारतात प्राचीन काळापासून शिक्षण देण्याची पद्धत आहे. प्राचीनकाळी विद्यार्थी कधी गुरुच्या घरी, कधी गुरुकुलात तर कधी ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन शिक्षण घेत.
प्राचीन काळी गुरुला फारचं आदराचे स्थान होते. गुरुला राज्यसभेत ही मानाचे स्थान होते. गुरु विद्यार्थीसोबतच राजालाही मार्गदर्शन करत व सल्ला देत असत. गुरु राज दरबारात आल्यानंतर राजा स्वतः उठून गुरुचे आदर सत्कार करत. त्यांना त्यांच्या असनावर बसवत. राजदबारातील मंडळी गुरु बसल्याशिवाय ते बसत नसत. राजा ही गुरु असनावर बसल्यानंतरच बसत.
गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. गुरु म्हणजे वाटाड्या. जीवनाचा योग्य पथ दाखविणारा तो गुरु. गुरु म्हणजे स्वतःच्या जीवन जगण्यातून मार्ग दाखविणारा. गुरु म्हणजे शिष्यांना नेहमीच यशाच्या दिप स्तंभाकडे घेवून जाणारा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जीवनाचा अवघड चढ, शिखर सहज चढाई करण्यास शिकवणारा तो गुरुजी.
प्राचीनकाळी अनेक गुरु शिष्यांचा जोड्या आपण ऐकल्या आहेत. वाचल्या आहेत. आगदी रामायण महाभारत पासूनच्या गुरु शिष्य या विषयी आपण वाचलेलो आहोत. त्यात रामायणातील गुरु वशिष्ठ यांनी श्रीरामाला योग्य शिक्षण व शिकवण देऊन त्यांना एकवचणी एकबाणी बनविलं. एक आदर्श राजा बनविले. तसेच श्रीराम हे एक पत्नीवृत होते. या मुळे श्रीरामचे आजही भारतीय समाजांत नाव अमर आहे. त्याच प्रमाणे विश्वामित्र व श्रीराम ही गुरुशिष्यांची जोडी ही अजरामर आहे. वास्तविक पहाता वशिष्ठ ऋषी व विश्वामित्र याचं एकमेकात वितुष्ठ होतं. एकमेकांचा जमत नव्हतं तरी विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला धनुर्विद्या शिकवली. वास्तविक पहाता विश्वामित्र हे मुळचे क्षत्रिय होते पण ते स्वतःच्या तपोबलावर ब्रम्हर्षी बनले. गायत्री मंत्राचे कर्ते बनले.
महाभारतात महर्षी व्यास व त्यांचे शिष्य शुक व वैशंपायन हे प्रसिद्ध आहेत. सुरुवातीस शुकलाच व्यास मुनिनी प्रथम महाभारत शिकवले असे म्हटले जाते. गुरुशिष्याच्या जोडीत भगवान परशुराम व पितामह भीष्म व द्रोणाचार्च यांची जोडीही अमर आहे. यांच्या जोडीला कर्ण ही परशुरामचे शिष्य होते. भगवान परशुराम हे चिरंजीवी मधिल एक आहेत. त्यामुळे ते रामायणा पासून महाभारतापर्यंत आपणास दिसून येतात. परशुरामाशिवाय अश्वत्थामा, बळी, महर्षी व्यास, हनुमान , बिभिषण आणि कृपाचार्य हे ही चिरंजीवी समजले जातात. यात अश्वत्थामाला त्याच्या क्रुर कार्यामुळे (शाप मिळाल्यामुळे) अमरत्व प्राप्त झाले असे समजले जाते. असे एकून सात जण चिरंजीवी आहेत.
गुरु द्रोणाचार्य व कौरव पांडव या गुरु शिष्यांची जोडी प्रसिद्ध आहे. यात विशेष करून द्रोणाचार्य व अर्जुनची जोडी. गुरु द्रोणाच्यार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली. अर्जुनला कोणीही प्रतिस्पर्धी असु नये अशी त्यांची इच्छा होती; पण त्याच राज्यात एकलव्य नावाचा आदिवासी वनवासी मुलगा त्यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी आला तेव्हा त्याला ते नाकरण्यात आले. विद्या नाकाणारे कदाचीत हे पहिले गुरु असतील.
एकलव्य जंगलात जावून गुरु द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्या शिकला. त्यात तो पारंगत ही झाला. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य व त्यांची शिष्यमंडळी जंगलात भटकत होती. त्यांच्या सोबत एक कुत्राही होता. त्या कुत्र्याला कशाची तरी चाहूल लागली व तो कुत्रा भुंकला. त्याचवेळी भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात क्षणात पाच सात बाण अलगद आडकले. कुत्र्याचे भुंकणे बंद झाले. हे गुरु द्रोणाचार्य यांनी पाहिलं असं बाण मारण्याचं काम फक्त अर्जुनच करू शकतो. अर्जुन तर जवळच आहे मग बाण मारलं कोण? त्यांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना वनवासी एकलव्य दिसला. गुरु द्रोणाचार्यांनी विचारल्या नंतर एकलव्यांनी बाण मारून कुत्र्याचे तोंड बंद केल्याचे सांगितले. गुरु द्रोणाचार्याना ही गोष्ट पचणी पडली नाही. त्यांना धनुर्धर म्हणुन फक्त अर्जुनच पाहीजे होता.
गुरु द्रोणाचार्यांने एकलव्याला विचारले ही धनुर्विद्या तुला कोणी शिकवली तेव्हा त्याने संगितले, "तुम्हीच माझे गुरु आहात. मी तुमच्याकडूनच ही विद्या शिकली आहे." एकलव्याने गुरुला त्यांचा पुतळा दाखविला. गुरुला अर्जुनापेक्षा कोणीही श्रेष्ठ धनुर्धर नको होता. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्यांचा उजव्या हाताचा अंगठा कापून घेतला व एका वनवासी मुलास विद्याभ्यासापासून दुर ठेवले. कदाचीत त्याच दिवसापासून निरक्षर अज्ञानी लोकांचा डाव्या हाताचा अंगठा उमठवत असावे. कदाचीत त्या घटनेपासून बहुजनांचा शैक्षणिक हक्क हिरावून घेतले असावे व निशाणी डावा अंगठा पुढे आला असावा.
आणखी एक गुरु शिष्यांची जोडी म्हणजे आर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य यांची आहे. आर्य चाणक्याला आपण कौटील्य/विष्णुगुप्ता या नावानेही ओळखतो यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात राजनिती/दंडनिती, अर्थ या विषयी सांगितलेले आहे. आर्य चाणक्याने नंद घराण्याचा नायनाट केला व चंद्रगुप्त यानां राजा बनविले. आजही राजकारणात चाणक्यनिति/कौटील्यनितीचा वापर केल्या जाते .
हळूहळू काळ बदलत गेला. बदलत जाणे व बदल होणे हा निसर्गाचाच नियम आहे. यास कोणीही रोखू शकत नाही.पुरातन काळाचे आचार्य बदलले. नंतर कालांतराने गुरुजी झाले. गुरुजीचं रुपांतर मास्तरात झालं पुढे मास्तरांच रुपांतर सर मध्ये झाले. नाव बदलले. थोडं शिक्षणांच कालानुरूप तंत्र मंत्र साधनं यात बदल झालं; पण माझा विद्यार्थी सुजान झाला पाहिजे. तो तत्वनिष्ठ झाला पाहिजे, त्याच्या कार्यात निपुन झाला पाहिजे. कुटुम्ब, समाज व देश हितासाठी तो झटला पाहिजे. अशी शिकवण गुरुजी त्यावेळी ही देत होते आजही देतात.
विद्यार्थी कोण? जो विद्यार्थी गुरुची शिकवण प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणतो, कुटूंब, समाज, गाव व देश यांच्या भल्यासाठीच गुरुच्या विद्याचं उपयोग करतो तोच खरा विद्यार्थी. विद्यार्थ्यांमुळेच गुरुजीची किर्ती होते. ज्या गुरुचे शिष्यगण चांगले ते गुरुजी सर्वोत्तम. आपण प्लेटो,सॉक्रेटीस ऑरिस्टॉटल व अलेक्झडर या गुरु शिष्यांच्या जोडी विषयी वाचलं असेल ऐकलं ही असेल.
प्राचीन काळातील व आधुनिक युगातील गुरुजीची आपण तुलना करू शकत नाही व तुलना होवू शकत नाही. कोणी तुलना करण्याचा भानगडीत पडूही नये असे मला वाटते. देश समाज यांच्या गरजानुसार जे शिक्षण देतात ते आजचे खरे गुरुजी. गुरुची शिकवण प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनात उतरवून देशाच्या समाजाच्या कल्यांनासाठी काम करतात ते विद्यार्थी. मग त्यासाठी विद्यार्थी उचपदस्थ असावा असे काही नाही.
आज काल गुरुजीचा समाजातील मान थोडसं कमी होताना दिसते? पूर्वी गुरुजीवर कोणी ही आरोप करत नसत. समाजात गुरुजी मान राखून होते. आज थोडसं त्यात उन्हेपणा आल्याचं जानवते. याचं कारण गुरुजी गावत राहात नाहीत. गावातील पालांकशी जीव्हाळ्याचे नाते जोपासत नाहीत. पालकांना व त्यांच्या पाल्यांना जादा वेळ देत नाहीत. काही शिक्षक विद्यार्थांच्या आडी आडचणी, त्यांची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती समजुन घेत नाहीत. यामुळे गुरुजी नकळत समाजापासून थोडंसं दूर गेल्याचं जाणवते.
काहीही असो गुरुजी गुरुजीच आहेत. ते देश घडविण्याचं देशांच भविष्य घडविण्याचं काम करत आहेत. ज्या समाजात गुरुजीला मान मिळणार नाही त्या देशाचं भविष्य निश्चितच अंधकारमय होईल. म्हणून आपण सर्वांनी गुरुंचा मान राखू या. देश घडवू या.
माझ्या ज्ञात अज्ञात सर्व गुरूंना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
©राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपुरी, नांदेड-६
९९२२६५२४०७.