सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांच्या तत्परतेमुळे लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ते गांधीनगरला जोडणारा रस्ता मार्गी लागणार

नांदेड,19- लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर ठाकूर तांडा आणि शिवाजीनगर ह्या तीन वस्त्या जोडलेल्या आहेत. यापैकी गांधीनगर व ठाकूर तांडा या वस्त्यांना जाताना वाटेमध्ये नाला आहे. या नाल्याला सतत पाणी असते. या वस्त्यांतील लोकांना धानोरा मक्ता येथे येऊनच लोह्याकडे व इतरत्र जावे लागते. दुसरीकडून कुठेच रस्ता नाही. शाळेत विद्यार्थ्यांना देखील नाला ओलांडून शाळेत जावे लागते. ही बाब जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या निदर्शनात आली. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला ही माहिती दिली असून लवकरच शासनाला रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे.


मागच्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, घरे आणि शाळा तसेच अंगणवाडी ईमारतीचे नुकसान झाले आहे काय? याची माहिती मागवली होती. यामध्ये लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता येतील गांधीनगर व ठाकूर तांडा या वस्त्यां अंतर्गत असलेला नाला ग्रामस्थांना व शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणी ठरत आहे, अशी माहिती त्यांना समाज माध्यमातू, ग्रामस्थांकडून व मीडियातून मिळाली होती. यावर तात्काळ कारवाई करत सीईओ यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, लोहा येथील गट विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना तात्काळ या गावची पाहणी करावयास पाठवले.


हे सर्व अधिकारी नाला ओलांडून गावात गेले. त्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेतले. गांधीनगर येथील मुलांना नाला ओलांडून शाळेत जावे लागत होते. परंतु नाल्याला सतत पाणी असल्यामुळे विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नव्हते. त्यासाठी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी गांधीनगर इथेच बंद पडलेली वस्तीशाळा पूर्वरस सुरू करून त्या ठिकाणी दोन शिक्षक दिले आहेत. त्यामुळे येथील 23 विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे.


तसे नाला ओलांडून मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे. कोणी मयत झाला तर ओढ्यातून जावे लागत असल्याची समस्या ग्रामस्थांनी यावेळी सांगितली. धानोरा मक्ता येथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांच्या कडून सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून सदरची माहिती दिली. या रस्त्याला पूर्वीच नंबर मिळाला आहे. परंतु रस्ता तयार झाला नाही. जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच रस्त्यासाठी प्रस्ताव शासनास पाठवण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तत्परतेमुळेच गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी असलेल्या रस्ता आता ग्रामस्थांना मिळणार आहे. सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी लागलीच दखल घेऊन रस्त्यासाठी पाठपुरावा केला, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *