पाऊस खुप दिवसांनी परत आला आणि तोही भेटला.. पुन्हा त्या आठवणी जाग्या केल्या पुन्हा टेकड्या त्यांच्या ठश्यानी सजल्या..
तिचं नाव काचेवर लिहायला तो नव्याने सरसावला आणि तिच्या नव्या नावाने तो पुन्हा तिच्यात गुंतला..
कारमधे फॉग करुन त्याने पुन्हा प्रेमाची कबुली दिली आणि तितक्याच पावसानेही हजेरी लावली..
खरं तर दोघे सोबत येउन वेड लावतात .. मागुन धावत येवुन अलगद मिठीत घेतात.. एक भिजवतो आणि दुसरा शहारा आणतो.. त्याचं पन्नाशीतही धावत येउन मिठीत घेणं तिला तीशीत घेउन जातं आणि पावसाच्या सरी दोघांना एका छ्त्रीत नेतात..
एका छत्रीत गेल्यावर तो हळुच तिच्या कानात कुजबुजतो .. लबाड पाऊस तेही ऐकतो आणि जोरात कोसळुन त्या दोघांना बिलगायला मदत करतो..
पावसासारखा सखा या दुनियेत दुसरा कोणीच नसेल कारण त्याच्या उबदार चाहुलीने तीही प्रफुल्लित होते आणि तोही होतो कारण छत्री हाच त्यांचा सहारा असतो..

त्याना एकत्र पाहुन एक पुणेरी काका पुटपुटतात.. काय यांची ही थेरं .. काकाना काय माहीत यातच प्रेम दडलय…
तिने त्याला विचारलं, मी तुला आवडते ना ?? . .. तो म्हणाला मला माहीत नाही पण माझं हृदय आणि मन तुझ्याकडेच धावतं आणि पाऊस आपल्या दोघांकडे..
त्या दोघांच्या संवादात मला मात्र पाऊस व्हावं वाटलं कारण त्यांना भिजवताना मलाही प्रेमात पडावं वाटलं.. टेकडीवरील फुले पाने आज पुन्हा टवटवीत झाली कारण त्यांनाही स्पर्धा आली..
सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री