बहुआयामी नेतृत्व : मा.खा. प्रतापरावजी पाटील चिखलीकर

( आज दि.०२ ऑगस्ट २०२२ रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस.त्यानिमित्य त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा शब्द प्रकाश)


 मानवी जीवनात विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.तो विकास चांगल्या मार्गाने व्हावा ही अपेक्षा तर आहेच. माणसाचा विकास घडविण्यात अनेक माध्यमे काम करतात.त्यात लोकशाहीत विकासाला सर्वाधिक गती ही राजकीय क्षेत्रामुळे मिळते हे आपण मागील ७५ वर्षापासून पाहत आहोत. ज्या नेतृत्वाला दृष्टी असते व सर्वसामान्यां बद्दलचा कळवळा असतो ते नेते मग विकासासाठी वेळोवेळी धडपड करताना दिसतात. केवळ राजकीय माध्यमातूनच नाहीतर शैक्षणिक सहकार या माध्यमातूनही विकासाला प्राधान्य देतात.अशा नेतृत्वाला आपण बहुआयामी नेतृत्व म्हणतो असेच बहुआयामी  नेतृत्व म्हणजे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर होत.






    कै.गोविंदराव पाटील चिखलीकरां सारख्या निष्पृह व वंचितांसाठी जीवन समर्पित करणाऱ्या वडिलांचा वारसा प्रतापरावजींना लहानपणापासूनच लाभला. त्यातही त्यात राजकारणातील हेडमास्टर म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो त्या कै. शंकररावजी चव्हाण साहेबांचे आचार व विचार जवळुन पाहण्याचा व त्यांचा सोबत काही काळ काम करण्याचा योगही त्यांना आला. प्रतापरावजींनी चिखली सारख्या छोट्याशा गावात जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाने दिल्लीपर्यंत मजल मारली आहे.त्यांनी विविध क्षेत्रात कार्य केले. संघटन कौशल्याचे बाळकडू हे त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाले होते म्हणून त्यांनी विद्यार्थी दशेत यशवंत महाविद्यालय नांदेड येथे शिक्षण घेताना महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद सचिव पदाची धुरा सांभाळली. या काळात त्यांनी वक्तृत्व, क्रीडा, वादविवाद यासारख्या विविध स्पर्धेचे आयोजन केले. ग्रामीण युवकांचे संघटन या काळापासून ते करत राहिले. १९८९ मध्ये आपल्या जन्मगावी चिखली येथे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इंदिरा गांधी जिनिंग संस्था स्थापन करण्यात आली व अध्यक्षपदी त्यांची निवड झाली व शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी इथून पुढे ते सतत कार्यरत असल्याचे दिसून येते. १९९२ ला ता.कंधार मधील बारूळ जि.प. गटातून ते जि. प.सदस्य म्हणून सर्वाधिक मतांनी निवडून आले व जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी त्यांची  निवड झाली. या काळात या पदाचा फायदा त्यांनी कृषी क्षेत्रासाठी व पशुसंवर्धनासाठी केला. १९९३ ला तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्य पदी त्यांची निवड झाली. या ठिकाणी काम करताना जो अनुभव आला त्याला प्रत्यक्ष उतरण्यासाठी त्यांनी भविष्यात प्रयत्न केले.१९९७ ला पेटवडज सर्कल मधून ते पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी लोहा येथे जे युवक महोत्सवाचे आयोजन केले होते ते नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद होते. त्याची दखल काँग्रेस पक्षाने घेऊन युवक महोत्सव स्थापण्यास निमंत्रित केले.तदनंतर ते जि. प.उपाध्यक्षपदी ही विराजमान झाले. या काळात जिल्ह्यातील वंचित,गरीब,आदिवासी महिला यांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबविल्या. २००१-२००२ ते या काळातील नांदेड जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती म्हणून ही कार्यरत होते.२००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कंधार - लोहा विधानसभा परिक्षेत्रातून अपक्ष आमदार म्हणून निवडून येऊन आपल्या कामाची चुणुक दाखविली. कै.विलासराव देशमुख यांच्या मदतीने मतदार संघात विकास खेचून आणला. ५०० कोटी रुपयाचा अप्पर मनार धरणा साठीचा केंद्र शासनाचा ए. आय. बी. पी. चा निधी प्राप्त करून प्रकल्प पुर्णत्वास नेला.२००५ साली कंधार नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मार्च २००७ मध्ये जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीत कंधार व लोहा या दोन्ही पंचायत समितीवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवून अपक्ष उमेदवार विजयी केले. २००८ ला लोहा नगरपरिषदेवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. २००९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मते घेऊनही थोडक्यात निसटता पराभव झाला. तरी परंतु त्यामुळे ते खचले नाहीत.नंतर ही जनसेवा त्यांनी निरंतर सुरू ठेवली. २०१३ मध्ये लोहा येथील कृषी उत्पन्न बाजार  समितीवर १८ पैकी १८ उमेदवारांना विजयी केले. 



२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही ते विजयी झाले २०१८ साली लोहा नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणला.२०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचा पराभव करून ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन केंद्र शासनातील अनेक योजना मतदारसंघात राबविताना दिसत आहेत. रेल्वे प्रश्नांबध्दल ते सतत प्रयत्नशील असल्याचे दिसतात. केंद्र शासनाच्या विविध योजना मतदारसंघात आणण्यासाठी त्यांची सतत धडपड दिसते.
राजकीय क्षेत्राबरोबरच त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याचे जाणवते.ज्याची सुरुवात त्यांनी आपल्या जन्मगावी चिखली येथून इंदिरा गांधी जिनिंग संस्थेपासून सुरू केली.१९९३ ते १९९७ या काळात कलंबर ता. लोहा येथे ते संचालक म्हणून कार्यरत होते.तर २००१ ते २००३ या कालावधीत या कारखान्याचे चेअरमन म्हणूनही  कार्य केले.महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आजारी कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. सन २००३ मध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत कंधार मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले आणि बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले. सन २०१६ मध्ये शेतकरी व कष्टकरी जनतेच्या विकासाची धमणी असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले. या प्रकारे त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून लाभार्थी घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
    




 शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. वडील कै. गोविंदरावजी पाटील चिखलीकर यांचे शैक्षणिक कार्याचे  स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य ते विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून पूर्ण करताना दिसतात. त्यांच्या विविध शैक्षणिक शाखांमधून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून या शैक्षणिक संस्थेने अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. साहित्य विषयाची आवड त्यांच्या ठिकाणी दिसते. म्हणून ते वेळोवेळी विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करताना व अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसतात.अनेक साहित्यीकांवरती त्यांचे जिवापाड प्रेम आहे.परवाच बाबुरावजी केंद्रे उमरगेकर व आम्ही आळंदी येथे 'गीतामृताचा प्रवाह, रामकृष्ण महाराज आणि वारकरी संप्रदाय'हा ग्रंथ संपादित केलेला  त्याच्या प्रकाशनसाठी ते नांदेडहून आळंदी येथे आवर्जून उपस्थित राहिले व आमच्या कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक ही केले.




   खेळाविषयीची आवड त्यांच्या ठिकाणी दिसते. नांदेड जिल्हा खो-,खो असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे तर महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, आयोजकांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी आर्थिक मदत करणे, खेळाडूंचे सत्कार घडवून आणणे हे ही कार्य ते सतत करत असतात.
    धार्मिक क्षेत्राच्या बाबतीत ही ते अग्रगण्य दिसतात.बोरी ता. कंधार येथील महादेव मंदिर व परिसराचा काय पालट त्यांनी भरघोस निधी द्वारे केला आहे. ते दरवर्षी  मोठ्या प्रमाणावर भागवतकथा,रामकथा व अन्नदान घडवून आणतात.साईबाबा संस्थान साईनगर धनगरवाडी नांदेड येथिल ते अध्यक्ष असून याचा विकासही त्यांनी केला आहे.ते विविध धार्मिक कार्यक्रम घेत असतात.विविध कार्यक्रम प्रसंगी किर्तनांचे आयोजन, भजनसंध्या व अन्य अध्यात्मिक कार्यक्रम ते नेहमीच घेत असतात. मी एका वर्षी त्यांच्यासोबत नांदेड जिल्हा महाराष्ट्र वृद्ध कलावंत मानधन वाटप समितीवर शासनाचा सदस्य म्हणून होतो.ते ही या समितीवर होते.त्यावेळी आमच्या बैठका झाल्या तेंव्हा ते खऱ्या कलाकाराला मानधन मिळवून देण्यासाठी किती धडपडत होते हे मी स्वतः अनुभवले आहे.
त्यांना पर्यटनाची आवड असून देश व विदेशात अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून जावुन आले आहेत.ज्यात ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड, सिंगापूर, दुबई व अन्य देशांचा समावेश होतो.त्यातून काही योजना त्यांनी आपल्या भागासाठी राबविण्याचा प्रयत्न केला आहे.याशिवाय विविध राष्ट्रीय संकट काळात जसे महापुर,भूकंप,कोरोना महामारी व अन्य आपत्तीवेळी ते सतत धावून येताना दिसतात.मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार प्रसंगी जिल्ह्यात सर्वत्र मेळावे घेऊन भेटी घेऊन जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन, वृक्ष लागवड व संगोपन, पालक मिळावे, महिला मिळावे, सामूहिक विवाह मिळावे, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळे,साहित्य संमेलने, शेतकरी मेळावे, कुटुंब कल्याण शिबीरे, सुशिक्षित बेरोजगारांचे मेळावे असे कितीतरी समाज उपयोगी कार्यक्रम ते घेताना दिसतात. कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे हे साहेबांकडून शिकावे असे अनेक जण सांगतात. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. ते कुठल्याही पक्षात असो तिथे तिथे सर्वोच्च व्यक्तीचा विश्वास संपादन करताना दिसले मग काँग्रेसमध्ये कै. शंकरराव चव्हाण साहेब, कै. विलासराव देशमुख साहेब असो की माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब असोत. राष्ट्रवादीत अजीत दादा पवार असोत की भाजपात नरेंद्र मोदी जी साहेबांपासून देवेंद्र फडणवीस असोत.माझे श्रध्दास्थान कै.आ.गोविंदरावजी राठोड साहेबांचे व त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.  प्रतापरावजीना ही गोविंदरावजी राठोड साहेबांबद्दल अतिव आस्था होती. त्यांना गोविंद मामा म्हणूनच ते संबोधत असायचे.
 अशा या बहुआयामी नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व माझा शब्द प्रपंच थांबवतो.

              प्रा.डॉ. रामकृष्ण बदने
     ग्रामीण महाविद्यालय, वसंतनगर 
          ता.मुखेड जि. नांदेड
      भ्रमणध्वनी- ९४२३४३७२१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *