फुलवळ च्या शैक्षणिक वैभवात योगेश्वर पटणे च्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा..

कंधार ; धोंडीबा बोरगावे

    कंधार तालुक्यातील फुलवळ हे गाव व गावकरी सज्ञान असून पहिले पासूनच शिक्षणाला महत्त्व देणार पालक असल्याने येथील अनेक विद्यार्थ्यांनी जन्मभूमीत प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक व उच्च शिक्षण बाहेरगावी घेऊन अनेकांनी उच्यविभूषित पद ग्रहण करून फुलवळ गावाचे नाव लौकिक केले असून आता योगेश्वर नामदेव पटणे हा विद्यार्थी एम.एस. म्हणजेच मास्टर ऑफ सायन्स ची पदवी घेण्यासाठी येत्या ९ सप्टेंबर रोजी लंडन येथील कॅन्टबरी येथे जात असल्याने फुलवळ च्या शैक्षणिक वैभवात योगेश्वर पटणे च्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा गोवल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

 

 

      फुलवळ गाव तस चांगलं पण सोयी-सुविधा आभावी यंगल म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण येथे सुपीक असे बुद्धिजीवी विद्यार्थी मुळात भरपूर आहेत परंतु त्यांना पोषक असे शैक्षणिक वातावरण , अभ्यासिका वर्ग , वेळोवेळी मार्गदर्शनपर शिबिर अथवा मेळावे , व्यायाम शाळा सह आवश्यक त्या सोयी-सुविधा जर वेळेत मिळत राहिल्या तर नक्कीच त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल आणि प्रत्येक क्षेत्रात फुलवळ चे तारे चमकतील..

     यापूर्वी फुलवळ मधून पहिल्यांदा एम बी बी एस ची पदवी घेऊन डॉक्टर होण्याचा मान डॉ. राजाराम जयराम बसवंते यांनी मिळवला. त्यानंतर बरेच विद्यार्थी एमबीबीएस तर काही बीएएमएस , बिडीएस ची पदवी घेऊन उत्तीर्ण झाले तर काही सध्या त्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. गावातून पहिले तालुका कृषी अधिकारी होण्याचा मान विश्वांभर निळकंठराव मंगनाळे यांनी मिळवला. तसे महसूल क्षेत्रात अनेकजण विविध पदावर आजही कार्यरत आहेत. गावातून पहिले वकील होण्याचा मान ऍड भगवान भुजंगराव मंगनाळे यांना जातो त्यानंतर आज अनेकजण कायद्याचे शिक्षण घेऊन वकील झाले आहेत तर काही होत आहेत.  देशसेवेसाठी ही प्राधान्याने येथील विद्यार्थी सहभागी होतात , पोचिराम वाघमारे , मारोतराव मंगनाळे यांच्यासह बरेच जण भारतीय सैनिक म्हणून कार्य पारपाडून सेवानिवृत्त झाले तर आजही अनेक तरुण भारताच्या सीमेवर भारतीय जवान म्हणून कार्यरत आहेत. तसेच भारतीय नौसेना दल म्हणजेच इंडियन नेव्हीत पहिल्यांदा दाखल होण्याचा मान सुरज रामराव होणराव चा असून त्यानंतर गुंडप्पा मंगनाळे , साईनाथ मंगनाळे हे सुद्धा इंडियन नेव्हीत दाखल होऊन कार्यरत आहेत. एवढेच नाही तर येथीलच रुपेश रविकांत कुलकर्णी याने इंजिनिअरिंग ची पदवी प्राप्त करून सध्या ते जर्मनी येथे नोकरीत कार्यरत आहेत तर अंकुश इरवंतराव शेंबाळे याने वैद्यकीय शिक्षण घेऊन कॅनडा येथे नोकरी करत आहेत.

     असेच मेडिकल , इंजिनिअरिंग सह अनेक क्षेत्रात आपापलं करिअर घडवत येथील अनेक विद्यार्थी नशीब अजमावण्यासाठी आपल्या जन्मभूमीपासून दूर शिक्षणासाठी गेले आहेत. तसेच आता ता. ९ सप्टेंबर रोजी योगेश्वर पटणे हा विद्यार्थी लंडन ला जाणार असल्याने सार्वजनिक गणेश मंडळ फुलवळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने योगेश्वर पटणे व रुपेश कुलकर्णी यांचा नुकताच सत्कार करून गौरव केला व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

       यावेळी रुपेश कुलकर्णी चे आई-वडील व योगेश्वर पटणे चे आई-वडील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्याने उपस्थितांत नवचैतन्य निर्माण होऊन शालेय विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. तर एकंदरीत त्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांबरोबरच त्या त्या पालकांची ही छाती गौरवाने फुलल्याचे ऐकायला मिळत होते.

     यांच्या सारखे ज्या ज्या क्षेत्रात जे जे विद्यार्थी आपल्यातील कस पणाला लावून मेहनत घेत आहेत त्यांनीही असाच नावलौकिक मिळवावा व गावाचे नाव उज्वल करावे आशा शुभेच्छा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष अंकेत मंगनाळे , उपाध्यक्ष ओमकार डांगे , सचिव धोंडीबा ऊर्फ विक्की मंगनाळे , सह सचिव अनिल मंगनाळे व त्यांचे सर्व सहकारी तसेच उपस्थित ग्रामस्थांनी या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *