विकासदिप कर्मवीर कै. गणपतरावजी मोरे ; ३९ वा स्मृतिदिन!

 

समर्पिले रक्त, अश्रू आणि घाम
राहिले तरी अपुरेच काम
कराया समाजाची जडणघडण
दिधले संपुर्ण जीवन आपण

कै. गणपतरावजी मोरे
म्हणजे ग्रामीण उपेक्षित मनांचा प्रक्षोभक आणि क्रियाशिल अविष्कार जीवन एक समर्पित जीवन होते. सामान्यशिक्षण असुनही अलौकिक बुद्धिची देणगी त्यांना लाभली होती. स्वतः उपाशी राहणाऱ्याने इतर भुकेल्याच्या पोटाची व्यवस्था करावं तसे गणपतराव मोरे हे स्वतः शिक्षणापासून वंचीत राहिले व शेकडोंच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केली. त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या कर्तृत्वाचे पंख लाभले होते. म्हणूनच त्यांनी नेतृत्वाची भरारी मारली आणि आकाशातील नक्षत्रे खुडून आणावीत तशा अनेक योजना आणल्या आणि उपेक्षितांना त्यांचा लाभ मिळवून दिला. त्यांनी उपेक्षित, दिन, दलित, मजूर, कामगार व शेतकरी या समाजाची सेवा केली. त्याचे समाजावर जे ऋण आहे, त्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी. म्हणून हा छोटासा प्रपंच आखला आहे. त्यांच्या अनेक आठवणींचा उजाळा आपणा सर्वांना वर्षानुवर्षे मार्गदर्शक व उर्जा देणारा आहे.

कर्मवीर कै. गणपतरावजी मोरे यांचा थोडक्यात जीवन प्रवास

आदर्श व्यक्तीमत्व लाभलेले कै. मोरे साहेबांचा जन्म पानशेवडी ता. कंधार जि.नांदेड या गावी श्री भाऊरावजी माली पाटील यांच्या घरात झाला. बालवयातच मोरे साहेबांच्या अंगावर अनेक जबाबदाऱ्या पडल्या. त्यांचे पीतृछत्र बालवयातच हरवले. लहान वयातच त्यांच्या पायाला शारिरीक व्याधी ‘गुडघी’ हा आजार झाला व ते एका पायाने अधू झाले. शेती कर्जात असल्यामुळे आई सोबत त्यांना मजुरीही करावी लागली. त्यांचे प्राथमिक शिक्षण पानशेवडी, गऊळ व कंधार या ठिकाणी झाले. त्यांनी बालवयापासूनच (स्वातंत्र्य काळापासूनच) राजकारणाचे धडे गिरवले. त्यांची व भाई डॉ. माजी आ. खा. केशवराव धोंडगे यांची बालवयापासूनच मैत्री होती. या दोन मित्रांनी कंधारला शेकापची स्थापना केली. त्यांचा श्री शिवाजी कॉलेज स्थापनेत सहभाग तसेच श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटी आणि तीचे सर्व हायस्कुल स्थापण्यात पुढाकार होते

पाण्याच्या प्रश्नासाठी मन्याड धरणाची पुर्तता व्हावी यासाठी तुरुंगवास झाला. त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. तालुका खरेदी विक्री संघ व सुपरवायझरींग युनियनच्या चेअरमन पदी विराजमान झाले. कुरुळा विभागातून जिल्हा परिषद नांदेडवर जनतेतून बहूमताने निवड झाली. पदावर असतांनाच कुरुळा विभागाच्या रस्त्यासाठी त्यांनी अन्नसत्यागृह केला. कुरुळा विभागातील १९ गावांना संयुक्त नळ योजना मिळवून दिली. त्यांनी जिल्हा परिषद नांदेडच्या कृषि विभागाच्या सभापती पदी आपले कार्य जबाबदरीने जनसेवेसाठी अर्पण केले.

१९७८ साली त्यांनी कंधार तालुक्यात इंदिरा कॉग्रेसची स्थापना केली. जनता सरकारने इंदिरा गांधीच्या अटकेच्या निषेर्धात केलेल्या जेलभरो आंदोलनामुळे साहेबांना तुरुंगात जावे लागले.

कर्मवीर साहेबांची महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग सदस्य सचीव म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील अनेकांना साहेबांनी जमेल तीतकी जास्तीत जास्त मदत केली. शेकापुर या ठिकाणी मराठवाड्यातील रेशीम केंद्राची स्थापना केली.

दिवसामागून दिवस जात होते. विकासाचा भगीरथ दिवसें-दिवस समोर समोरच जात होता. सहकार क्षेत्राला मुर्त रुप देणारे ते सहकार मुनीच होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात ग्रामीण जीवनाला समृद्धी प्रधान करण्यासाठी ते ग्रामीण नेतृत्व होते. ग्रामीण जीवनाचा कायापालट झाला पाहिजे या ध्येयाने झपाटलेल्या नेतृत्वाची एक पिढीच त्यांच्याकडून घडत होती. त्यांच्या कर्तृत्वाचे अनेक पैलू होते. डोंगराळ भागात विकासाची गंगा नेणारे आधुनिक भगीरथ होते. क्रांतीवीर नाना पाटलांचे ते खंदे समर्थक होते. ते निर्भीड होते, त्यांनी निष्कलंक राहून सत्यासाठी लढा दिला. व गरजवंताचे कैवारी बनले होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचा हिरीरीने सहभाग होता. मोरारजी सरकार विरुध्द धडक मोर्च्यात सामील होते. मन्याड धरणासाठी लढा दिला तसेच तुरुंगात गेले आणि नंतर मा. कै. शंकरराव चव्हाणांचे नेतृत्व मान्य करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गांधी टोपीच्या संरक्षणासाठी सत्यागृह झाला, त्यात त्यांना २१ दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला. जनता सरकारच्या निषेर्धात #जेलभरो_सत्यागृह चालवला. त्यांनी भारतीय सैनिक सहाय्यक दलाची स्थापना केली. अशा अनेक एकामागुन एक शेकडो कामे यशस्वी करत असतांनाच कै. मोरे साहेब शेकापुर येथील रेशीम उद्योग कारखाण्याच्या उद्घाटनाची तारीख घेवून येत असतांनाच.

एक अविस्मरणीय संध्याकाळ आणि त्यानंतर उठलेल वादळ

अवघा तालुकाच काय जिल्हा व राज्यातील सर्व कार्यकर्ते, गोरगरीब जनता अथांग दुःख सागरात बुडून गेली. तीन दिवस सर्व रस्त्यांना ये-जा करणारी वाहने व लाखों कार्यकर्ते. ती काळरात्र कंधारचं वैभव हिसकावून नेणारी ठरली. तेंव्हापासून कायम कंधार हे आजतागत अंधारातच आहे असा भास होतो.

‘महालक्ष्मी’ या सणाच्या रात्री १३ सप्टेंबर १९८३ ला जिंतूर मार्गे कंधारला येत असतांना त्यांच्या जीपला भयानक अपघात झाला आणि त्यातच पीता-पुत्र जागीच ठार झाले. गरीब जनतेचा नेता गेला ! हजारो लोकांनी हंबरडा फोडला ! मोरे साहेब याच दिवशी अनंतात विलीन झाले.

दिनांक १३ सप्टेंबर ही त्यांची पुण्यतिथी आहे. नुसती पुण्यस्थिती साजरी करुन उपयोगाचे नाही तर त्यांनी दिलेल्या विधायक कार्याला आपण सगळे एक होऊन हातभार लावल्यास खऱ्या अर्थाने त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्यासारखे होईल. राजकीय क्षितीजावरील शुक्रतारा पुन्हा उगवेल अशी आस ठेवूया !

असे कंधारचे दिपस्तंभ, कर्मवीर कै. गणपतरावजी मोरे साहेब यांच्या पुण्यपावन स्मृतीस कोटी-कोटी विनम्र अभिवादन!

 

संकलन
श्री सोळंके पी.जी.
सह शिक्षक
श्री गणपतराव मोरे विद्यालय कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *