यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशवंत महाविद्यालयाच्या ‘यशोदीप’ला कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते नियतकालिक पारितोषिक प्रदान.

महाविद्यालयीन नियतकालिकांमधून सृजनशील
मोठ मोठे लेखक साहित्यीक तयार होतात
लिहते व्हा !
कवी साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांचे भावोद्गार

नांदेड ;यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा (२०२०-२१) पारितोषिक वितरण सोहळा काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या भाषा प्रयोगशाळा, सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या ‘यशोदीप’ ह्या नियतकालिकेला चव्हाण सेंटरचा प्रथम पारितोषिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार स्वरूपात यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिचिन्ह तथा सन्मानपत्र यावेळी देण्यात आले.

प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना साहित्य, लेखनकला यांचे महत्व समजावून सांगत नियतकालिकेतूनच लेखन करीत अनेक नामवंत साहित्यिक या महाराष्ट्रात घडले असून दलित साहित्याची निर्मितीही नियतकालिकेच्या माध्यमातून झाली आहे असे विविध दाखले देऊन स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून साहित्य निर्मिती संदर्भात विचारण्यात आलेल्या अनेक उपजत प्रश्नांची उत्तरे देऊन साहित्य लिखाणासंदर्भात प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्य, राबविण्यात येणारे उपक्रम आणि नियतकालिका स्पर्धा यासंदर्भात नांदेड जिल्हा केंद्राचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ श्रीराम गव्हाणे यांनी प्रास्ताविक पर मांडणी केली तर चव्हाण सेंटरचे राज्य युवा विभाग प्रमुख संतोष मेकाले यांनी युवा विभागाच्या वतीने चालविण्यात येणारे उपक्रम याविषयी विस्तृत माहिती दिली. यशवंत महाविद्यालयाच्या ‘यशोदीप’चे संपादक प्रमुख प्रा. डॉ विश्वाधार देशमुख यांनी आपल्या ‘यशोदीप’ या नियतकालिकेच्या निर्मितीतील साधनेचा धांडोळा घेत पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे यांनीही यावेळी नियतकालिकेचे महत्व विषद करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी असलेले शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेती व शेतकऱ्यांच्या समस्ये विषयी साहित्य निर्मितीवर भर द्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

यावेळी मंचावर शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव ऍड उदय निंबाळकर, चव्हाण सेंटरच्या नांदेड जिल्हा केंद्राचे सदस्य बापू दासरी उपस्थित होते. तसेच मराठवाड्यातील ख्यातनाम साहित्यिक स्वर्गीय बी रघुनाथ यांच्या कन्या सुधाताई यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा सेंटरचे सचिव शिवाजी गावंडे, सदस्य शिवाजी अंबूलगेकर, आरोग्य समन्वयक डॉ अनिल देवसरकर, सदाभाऊ वडजे, विकास कदम यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरसिंग आठवले यांनी केले तर आभार प्रा. संदीपकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *