काल नांदेडच्या ‘कुसुम’ सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे निवृत्त सांस्कृतिक सचिव अजय अंबेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला विख्यात समीक्षक नरहर कुरुंदकर गुरुजींवरचा ‘नरहर कुरूंदकर:एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हा साभिनय अभिवाचनाचा नाट्यप्रयोग पाहिला.हा प्रयोग याआधी पहिल्यांदा जेव्हा पाहिला होता त्याच्यापेक्षा खूप सरस आणि अधिक उंचीवर घेऊन जाणारा वाटला. अजय अंबेकर हे आमचे समकालीन मित्र. ते मूळचे नांदेडचे.त्यांचे वडील गं.ना.अंबेकर हे पत्रकार तर होतेच;शिवाय नांदेडच्या नाट्य आणि सांस्कृतिक चळवळीतही अग्रेसर होते.कुरुंदकर गुरुजींची त्यांच्याकडे बैठक असायची.मराठीतील मान्यवर साहित्यिकांच्या चर्चा अंबेकरांच्या ‘प्रतोद’साप्ताहिकाच्या कार्यालयात घडत.अशा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबात अजयजी यांची घडण झाल्यामुळे आणि कुरुंदकर कुटुंबियांशी आत्मीय संबंध असल्यामुळे नरहर कुरूंदकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नेमका वेध घेणारी संहिता तयार करताना त्यांना फारसे प्रयास पडले नसावेत.असे असले तरी नरहर कुरूंदकर या अफाट प्रतिभा आणि प्रज्ञा असलेल्या व्यक्तिमत्त्वाला प्रयोगातून उभं करणं एक प्रकारचं आव्हान होतं.ते अजय अंबेकर यांनी लीलया पेललं.त्यासाठी त्यांना गुरुजींची ग्रंथसंपदा आणि व्याख्यानं नव्या नजरेनं पुनः पुन्हा चाळावी लागली. याकामी प्रा.दत्ता भगत,डॉ. श्रीनिवास पांडे,दीपनाथ आणि श्यामल पत्की यांचं सहकार्य जरूर मिळालं. हे सगळं नीटपणे केल्यानंतर
गुरुजींच्या अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यातील नेमक्या जागा हेरून त्यांचं व्यक्तिमत्त्व उभं केलं.दोन तासात कसल्याही प्रकारचा बोजडपणा येऊ न देता अत्यंत गतिशीलपणे गुरुजींच्या आयुष्याचा पट उलगडत नेला.एक बहुआयामी आणि बिन्नीचा विचारवंत म्हणून गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू एकानंतर एक अधोरेखित केले.हा नाट्यप्रयोग पाहताना प्रेक्षक इतका गुंतून जातो की आपण खरोखरच गुरुजींचं व्याख्यान,विचार ऐकत आहोत असं वाटत जातं.इतका हा प्रयोग प्रत्ययकारी झालेला आहे.
मी गुरुजींच्या वर्गातील त्यांचा थेट विद्यार्थी. त्यामुळे त्यांच्या वर्गातील अध्यापनाची पध्दत आजही डोळ्यासमोर लख्खपणे उभी रहाते. कसलीही चिठ्ठी-चपाटी हातात न घेता वाड़मयाच्या इतिहासातील इसवीसन आणि ग्रंथांची पात्रनिहाय जंत्री ते इतक्या सहजपणे मांडत असत की कोणीही चकीत व्हावं.विषयाचं स्वच्छ आकलन आणि प्रचंड स्मरणशक्ती हा गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचा विलोभनीय विशेष होता. त्यामुळे वर्गातील अध्यापनाचा एखादा प्रसंग घातला असता तर व्यक्तीशः मला अधिक आनंद वाटला असता.अर्थात दोन तासाच्या मर्यादेत हे सगळे शक्य नाही, याची मला जाणीव आहे.रणजित देसाई, आनंद साधले,नारायण सुर्वे इ.साहित्यिकांचे संदर्भ याच कारणामुळे आले नाहीत, हे ही खरेच.
या नाट्यप्रयोगात मध्यंतरापूर्वी आलेला आणीबाणीचा संदर्भ नंतर आला असता तर घटनानुक्रमाला साजेसा ठरला असता असे मला वाटते.
अत्यंत प्रभावी आणि दोन तास खिळवून ठेवणारा हा प्रयोग म्हणजे अजय अंबेकर यांच्या कल्पकतेचं आणि उत्तम आकलनशक्तीचं निदर्शक म्हणावं लागेल.
दिलीप पाध्ये या मित्राने कुरुंदकर गुरुजी साक्षात केले.त्यांनी उभी केलेली गुरुजींची व्यक्तिरेखा पाहून ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांनी प्रयोग संपल्यावर रंगमंचावर चिंब डोळ्यांनी दिलीपच्या पायांला स्पर्श केला.
गणेश पांडे यांचं निवेदन आखीव,रेखीव.राजीव किवळेकर,रवि श्यामराज,ज्योती पाध्ये,स्वाती देशपांडे या गुणी रंगकर्मींचा अभिनय कुठल्याही कसलेल्या कलावंतापेक्षा कमी नव्हता. ही सगळी टीम म्हणजे नांदेडच्या रंगभूमीचं वैभव आहे.
उत्तम नेपथ्य,वेशभूषा, संगीत आणि प्रकाश योजना हे सारं तंतोतंत.शब्दांचा अचूक वापर कसा करावा याची जाण असलेल्या ज्योती अंबेकर यांच्या निवेदनाची दमदार साथ.त्यामुळे हा साभिनय अभिवाचनाचा कार्यक्रम केवळ दर्जेदारच झाला नाही तर दीर्घकाळ मनात रेंगाळत रहावा इतका देखणा झाला आहे.
गुरुवर्य नरहर कुरूंदकर यांच्या वरील हा प्रयोग केवळ महाराष्ट्रात च नव्हे तर जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे व्हावा, या शुभेच्छेसह!