मुखेड:आपण संगणक साक्षर नसेल तर जगाचा नकाशा वाचू शकत नाही. हे टच स्क्रीनचे युग आहे, प्रत्येकाला संगणक येणे अत्यंत आवश्यक आहे. जोशी इन्फोटेक हे स्वयंरोजगार निर्माण करण्याचे केंद्र असून संगणकाने मानवी जीवन समृद्ध केले आहे असे प्रतिपादन मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी केले.
जोशी इन्फोटेक येथे एमएससीआयटी स्कॉलर विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वाटप व निरोप समारंभाच्या वेळी अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमणे, सेवानिवृत्त भारतीय सैनिक गोविंद कवटीकवार, आयोजक तथा जोशी इन्फोटेक चे संचालक प्रा.जय जोशी, दादाराव आगलावे, वैजनाथ दमकोंडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दिलीपराव पुंडे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने संगणक साक्षर होणे ही काळाची गरज आहे. मुलं आणि मुली सध्या संगणकाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसून येत आहे. संगणकाचे ज्ञान घेऊन आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मातीला विसरता कामा नये. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो, त्या देशाचे माझं काही देणं घेणं लागते याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. प्रा. जय जोशी यांच्या जोशी इन्फोटेकच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी राजे छत्रपती अकॅडमीचे ज्ञानेश्वर डूमणे म्हणाले की, संगणकामध्ये आपण जास्तीची मेहनत केली तर आपणास यश निश्चित येईल. येथील काही विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. रोजगार व स्वयंरोजगार याचे आमच्या अकॅडमी मध्ये प्रशिक्षण दिले जाते, सर्व विद्यार्थ्यांनी एकदा येऊन मोफत सल्ला घेऊन जावा असेही त्यांनी सांगितले. कार्याक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रा. जय जोशी यांनी केले. यावेळी गोविंद कवटीकवार, दादाराव आगलावे यांचेही भाषणे झाली.
यावेळी ज्ञानेश्वर डूमणे, गोविंद कवटीकवार यांचा जोशी इन्फोटेकच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सरस्वती चिंतनवाड, अश्विनी कामघंटे, बालाजी इंगोले, बालाजी तोटरे, वैष्णवी कबीर, गोणेवाड, शुभांगी गायकवाड, रोहिणी सिद्धेश्वरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती चिंतनवार व अश्विनी कामघंटे यांनी केले तर आभार आरती घारगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश जोशी, शगुप्ता शेख, आरती घारगे, कुसुम वाघमारे, यांनी विशेष परिश्रम घेतले.