2010 पासून सेवामुक्त केलेल्या राज्यातील माजी होमगार्ड यांना पुन्हा सेवेत घेणार पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली दिवाळीची भेट

 

 

नांदेड – वेगवेगळ्या कारणांमुळे सन 2010 पासून सेवा समाप्त केलेल्या माजी होमगार्ड यांना पूर्ववत सेवेत घेण्याचे आदेश पोलीस महासंचालक तथा होमगार्डचे महासमादेशक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहेत.

‘दिवाळी गिफ्ट’ च्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो होमगार्डची दिवाळी आता गोड होणार आहे.
साप्ताहिक कवायत बंदोबस्ताची अनिमित उपस्थिती व अन्य कारणांमुळे राज्यातील हजारो होमगार्ड यांना अपात्र ठरवून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य असलेल्या होमगार्ड संघटनेत अपात्र ठरलेल्या सर्व होमगार्ड यांना पुन्हा सेवेची संधी देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून राज्यभर धरणे, मोर्चा, उपोषण आदी आंदोलने करण्यात आली होती.

माजी होमगार्ड यांनी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली होती.
अ. भा. होलार समाज महासंघाचे नेते अँड.माणिकराव भडंगे व मुंबईचे मानसेवी अधिकारी दीपक कांबळे यांनी पुढाकार घेऊन पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन होमगार्डच्या मागण्यांवर त्यांचे लक्ष वेधून घेतले होते व वारंवार त्याचा पाठपुरावा सुरु आहे. जुलै 2015 पासून सेवा समाप्त झालेल्या माजी होमगार्ड यांना काही अटीच्या अधीन राहून पुनश्च सेवेत घेण्याचे आदेश मार्च 2022 मध्ये पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले होते. त्यानंतर राज्यभरात हजारो होमगार्डच्या समायोजनाची प्रक्रिया पार पडली होती.

जुलै 2015 ऐवजी जानेवारी 2010 नंतर सेवा समाप्त झालेल्या माजी होमगार्ड यांना पुनश्च सेवेत घेण्यात यावे अशी मागणी माणिकराव भडंगे व दीपक कांबळे यांनी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली होती. तसेच नुकतीच त्यांनी उपाध्याय यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा देखील केली होती. त्यानंतर दि. ऑक्टोबर 2022 रोजी होमगार्ड मुख्यालयाने आदेश जारी केला असून त्यात जानेवारी 2010 पासून सेवा समाप्त झालेल्या होमगार्ड यांना काही अटीच्या अधीन राहून संघटनेत सामावून घेण्याबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही करण्यात यावी असे म्हटले आहे.

ज्या माजी होमगार्डच्या गंभीर स्वरूपाचे बेशिस्त वर्तन किंवा गुन्हा याकरिता सेवा समाप्त केल्या असल्यास त्यांच्या विनंती अर्जाचा विचार करू नये. सदरील कार्यवाही करताना जिल्हा कार्यालयांनी त्यांच्या पटावरील होमगार्डचा अनुशेष शिल्लक असल्याची खात्री करून सेवा जेष्ठतेनुसार माजी होमगार्ड यांना संघटनेत सामावून घेण्याबाबतची कार्यवाही करावी, असे पोलीस महासंचालक तथा होमगार्ड महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आदेशात नमूद केले आहे.

*नांदेडमध्ये मिठाई वाटून स्वागत*

या निर्णयाची माहिती समजताच अनेक माजी होमगार्ड यांनी मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा केला. ऐन दिवाळीत मिळालेली बंपर दिवाळी भेट असल्याची प्रतिक्रिया होमगार्ड मधून व्यक्त होत आहे.
माजी वरिष्ठ पलटन नायक एम. आर. मल्लेवार, शेख अब्दुल अकबर, प्रकाश सुर्यवंशी, रामदत्त चंदेल, विखायतउल्ला अखिलउल्ला, सखाराम अटकोरे, सुरेखा मल्लेवार यांनी या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा करणारे ऍड. माणिकराव भडंगे , दीपक कांबळे यांचे आभार मानले आहेत.

____________

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *