नांदेड :- राज्यातील गोरगरिबांच्या घरीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “आनंदाचा शिधा” ही विशेष योजना राज्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पोहचविण्यात यश मिळविले आहे. स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयात 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल असे किट शासनाने उपलब्ध करून दिले. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचविले जात आहे.
जिल्ह्यातील या “आनंदाचा शिधा” वाटपाचा प्रातिनिधीक शुभारंभ करतांना आत्मिक समाधान व आनंद आहे. गोरगरीबांच्या घरातही महाराष्ट्र सरकारने दिवाळीची दिलेली ही गोड भेट असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
नांदेड येथील आनंदनगर परिसरातील रास्त भाव दुकान क्र. 89 येथे यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना सारख्या आव्हानात्मक काळातही केंद्र सरकारने गोरगरीबांच्या घरी धान्य पोहचेल याची काळजी घेतली. सर्व खासदारांचा निधी हा लोककल्याणासाठी आणि विशेषत: जनतेच्या आरोग्याच्या सुविधेवरच प्राधान्याने खर्च करण्यात आल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. या विस्तारात वाड्या-पाड्यांपर्यंत ही आनंदाची शिधा वेळेत पोहचविण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या सर्व बांधवांच्या घरी ही गोड दिवाळी भेट पोहचविली जात आहे. वाहतुकीच्या अडचणीमुळे जर कुठे अडथळा झाला तर प्रशासनाने त्यावर तात्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
आनंदाचा शिधा हा अत्यंत महत्वाकांक्षी व लोककल्याणाच्या दृष्टिने आवश्यक असा निर्णय शासनाने घेतला. ऑनलाईन नोंदणीसाठी यात असलेला अडसर लक्षात घेता शासनाने तो दूर केला असून आनंदाचा शिधाचे वाटप आता युद्धपातळीवर पूर्ण होईल यात शंका नाही. अनेक तालुक्यांसाठी सद्यस्थितीत चारही वस्तु प्राप्त असून काही तालुक्यांसाठी एखादी राहिलेली वस्तू तीही तात्काळ पोहचविली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
साखर, रवा, चणाडाळ, पामतेल या वस्तु असलेले आनंदाचा शिधाचे किट खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात द्रोपदाबाई शिवाजी पिंगलवाड, संतोष चांदू साबळे, जयश्री गंगाधर मोकनपिल्ले, पारुबाई गायकवाड, चंद्रकलाबाई सोनसळे यांना देण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे 2 हजार रेशन दुकानांद्वारे 5 लाख 97 हजार 812 शिधापत्रिकाधारकांना ही आनंदाची शिधा वाटप केली जात आहे.