विदेशात असो की देशात जे चांगले ते नांदेडात करण्याचा अशोकरावांचा प्रयत्न-माजी महसूलमंत्री थोरात

नांदेड ः दि. 28- राज्यभरात जनहिताची कामे करतानाच आपला जिल्हा न विसरता विदेशात असो की देशात जे चांगले ते नांदेडात करण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा राहिला आहे. यामुळे या जिल्ह्याचा कायापालट झाल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शहराच्या कुसुम सभागृहात शुक्रवार दि. 28 रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी आशीष दुवा, भारतजोडो यात्रेतील काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांचे प्रमुख सहकारी के.बी.बैजू, सुशांत मिश्रा, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, अनंतराव घारड, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ.माधवराव जवळगावकर, आ.जितेश अंतापूरकर,आ.विकास ठाकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी खा.तुकाराम रेंगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खतगावकर,शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष श्‍याम दरक, सचिव नारायण श्रीमनवारसह राज्यातील व जिल्ह्यातील नेते,पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी महसूलमंत्री थोरात म्हणाले की, देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी देशहित व सर्व सामान्यांच्या हितासाठी काम केले. हिच परंपरा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पुढे नेत आहेत. जनहिताच्या कार्यातून नांदेडसह राज्यातील जनतेचा पाठिंबा त्यांना लाभला आहे. यातूनच 2009 च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षास मोठे यश मिळाले होते. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम व नियोजनाकडे त्यांचे विशेष लक्ष असतो. यातून अनेक कार्यक्रम यशस्वी झाले आहेत. काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेस देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र येथील यात्रेस यापेक्षाही मोठा प्रतिसाद मिळवून या यात्रेची निश्‍चित इतिहासात नोंद होईल व या ऐतिहासिक घटनेचा साक्षिदार होण्याची संधी तुम्हाला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह यातून संपूर्ण देशवासियांना जागे केले होते. यातून स्वातंत्र्याचा लढा यशस्वी करताना काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेच्या माध्यमातून देशवासिय उभे राहतील. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना यातून समतेचा संदेश मिळेल असा विश्‍वासही माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक आ.अमरनाथ राजूरकर, सूत्रसंचालन काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भाजप देशात गढूळ वातावरण करतेय-नाना पटोले
देशासमोरील मूळ मुद्याला बगल देत धर्माधर्मात तेढ निर्माण करत भारतीय जनता पक्ष देशात वातावरण गढूळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
देश, सर्व सामान्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत कार्य केले आहे. याच भूमिकेतून देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी लोकहिताची कामे केली. हिच परंपरा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कायम ठेवली आहे. सध्या भाजप देशात गढूळ वातावरण निर्माण करत आहे. सर्व सामान्यांच्या हितापेक्षा भाजपा सरकार मुठभर मित्र व उद्योजक यांच्या हितासाठी प्रयत्न करीत आहे.देशातील सध्याचे वातावरण पाहता सर्वधर्मसमभावांचा संदेश देत सर्वसामान्यांचे प्रश्‍न घेवून काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे. या यात्रेस सर्वच राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. अन्य ठिकाणच्या तुलनेत या यात्रेस महाराष्ट्रात अधिक प्रतिसाद मिळेल असा विश्‍वास व्यक्त करत पटोले म्हणाले की, तत्कालीन माजी पंतप्रधान इंदिराजींच्या काळात काँग्रेस पक्ष अडचणीत असताना महाराष्ट्रवासियांनी काँग्रेस पक्ष व इंदिराजींना ताकद दिली. तिच पुनरावृत्ती यावेळी होईल. या भारतजोडो यात्रेत शहरच नाही तर गावातील बहुसंख्य नागरिक सहभागी होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
भारतजोडो यात्रेस प्रतिसाद हीच माझ्या
वाढदिवसाची भेट-माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
भारतजोडो यात्रेस महाराष्ट्रात नांदेड येथून सुरुवात होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून भारतजोडो यात्रेस निश्‍चित मोठा प्रतिसाद मिळणार असून हीच माझ्या वाढदिवसाची भेट असणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
भारतजोडो यात्रेसंदर्भात देश व राज्यातील काँग्रेस नेते नांदेडात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेला माझा आजचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दुग्धशर्करायोग आहे. भारतजोडो यात्रा यशस्वी व्हावी यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी मराठवाड्यात येत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. जनआंदोलनातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. ही यात्राही जनआंदोलन बनेल. यातून देशवासियांना नवीन ऊर्जा शक्ती मिळेल. ही यात्रा देश तोडणाऱ्यांना उत्तर असेल असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले.
शुभेच्छा देण्यासाठी जमलेला जनसमुदाय ही शंकरराव चव्हाण यांची पुण्याई आहे. त्यांचेच जनसेवेचे व्रत्त समोर ठेवून आपली वाटचाल सुरु आहे. यातूनच जनतेचे मोठे प्रेम आपल्याला मिळाले आहे. 7 नोव्हेंबर रोजी भारतजोडो यात्रा नांदेडात येणार आहे. 7 ते 11 या काळात ही यात्रा जिल्ह्यात राहणार असून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहेत.
माझा परिवार काँग्रेसवासी
राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपात जाणार या बातम्या व चर्चा निरर्थक असून धर्मनिरपेक्षता व जनसामान्यांचे कार्य यासाठी सदैवतत्पर असणारे अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्येच राहतील व त्यांच्या नेतृत्वाचा पक्षास लाभ होईल असा विश्‍वास व्यक्त केला होता. हाच धागा पकडत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जनसामान्यांचे कार्य व धर्मनिरपेक्षता यासाठी आपण कार्य केले आहे. शंकरराव चव्हाण व आपण नेहमीच काँग्रेसच्या विचारधारेशी जोडले गेलो आहोत. माझा परिवारच काँग्रेसवासी असल्याचे सांगत अन्य पक्षात जाण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्ण विराम दिला.
विनाकारण त्रास झाला
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नेहमीच काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना विनाकारण त्रास झाला असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट करत यापुढे काँग्रेसवाढीसाठी आमचा सांघिक प्रयत्न असेल यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचा पक्षाला अधिक फायदा होईल असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *