कंधार ; शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंतच्या मुख्यरस्त्याचे काम गत दहा वर्षा पासून रखडून पडले आहे. रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .
कंधार तालुका मराठी पत्रकार संघाने पालिकेचे प्रशासक कंधारचे तहसीलदार यांना निवेदन देवून रस्त्याचे काम त्वरित सुरु करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
कंधार शहरातील मुख्यरस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागो जागी खड्डे पडलेले असल्याने रस्त्यात खड्डा आहे कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था रस्त्याची आहे, गत दहा वर्षा पासून या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. वेळो वेळी मात्र मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम पालिके कडून करण्यात येत असते. त्यामुळे पावसाळ्यात चिखल होतो. यात अनेक वाहनांचे लहान सहान अपघात होत असतात शिवाय दररोजच्या धुरळ्या मुळे देखील रस्त्यावरून जाणाऱ्यांचे तसेच रस्त्याच्या कडेला पाली टाकून उपजीविका भागविणाऱ्या दुकानदारांचे, हात गाडेवाल्यांचे, भाजी विक्रेत्याचे आरोग्य बिगडत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालये याच रस्त्यावर असल्याने तालुक्यातील नागरिकांना देखील या खराब रस्त्यानेच ये-जा करावी लागते. त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.
प्रशासक असेल्या तहसीलदार यांनी त्वरित मुख्यरस्त्याचा प्रश्नं मार्गी लावावा अन्यथा पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनादवरे देण्यात आला आहे. निवेदनावर पत्रकारसंघाचे तालुका अध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर, सचिव हाफिज घडीवाला, कार्यध्यक्ष एन.डी.जांभाडे, कोषाध्यक्ष महंमद अन्सारोद्दीन, सहसचिव गंगाप्रसाद यन्नावार, प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल कतरे, संभाजी कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.