शिकण्यासाठी इच्छा लागते वय नाही

“शिक्षण ही सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे “शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, जो व्यक्ती ते प्राशन करील, तेव्हा तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, शिक्षणामुळे बुद्धी सशक्त होते, सशक्त झालेले मस्तक कोणाच्याही पुढे नतमस्तक होत नसते, म्हणून शिक्षण शिकावे लागते, शिक्षणामुळे सर्व व्याधी दूर पळून जातात ,शिक्षण शिकते वेळी फक्त इच्छा असावी लागते,वयाची तिथे काही आवश्यकता नाही त्यासाठीच हा लेखन प्रपंच. ….

परकीय सत्ता डच, फ्रेंच,पोर्तुगीज, इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले आणि ते राज्यकर्ते बनले,
कारण येथील लोक जास्तीत जास्त
अशिक्षित होते,बाहेरून आलेले सर्व सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी सांगितलेली सर्व कामे आपल्याला करण्याची वेळ आली, आपल्या लोकांनी फक्त कागदावर अंगठा लावण्याचे काम केले,त्यामुळे दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले,

त्यावेळी आपली बुद्धी गहाण ठेवून जीवन जगण्याची आपल्याला वेळ आली,आपले काही लोक एकत्रित आले,आता कशाला शिकायचं ?असे म्हणून शिक्षण घेतले नाही,आज सुद्धा आपल्या देशाचे ३२% लोक निरक्षर आहेत ,निरक्षर माणसाची कोणीही फसवणूक करू शकते, त्यामुळे शिक्षण शिकून स्वाभिमानाने जगावे, असे आपल्या ब-याच लोकांना वाटले नाही, कारण भारतीय समाजामध्ये अंधश्रद्धा, रुढी, अनिष्ट परंपरा या गोष्टीचा जास्त प्रभाव लोकांच्या मनावर बिंबवला गेला आहे.

त्यामुळे लोक अज्ञानी राहिले आहेत,
आजही भारतात म्हणावा तेवढा शिक्षणावर खर्च केला जात नाही,
नातू आणि आजोबा दहावीची परीक्षा एकाच वेळेस देतात, अशी उदाहरणे आपण अनेक पाहिले आहेत, कारण मन तरुण असावं, शिक्षण शिकायची इच्छा असावी, त्यापुढे वय काहीही करू शकत नाही. १८५७ च्या राष्ट्रीय उठावामध्ये बादशहा बहादूरशाहाचे वय ८० वर्षे होते, तरी ही स्वातंत्र्यासाठी त्यांनी तरुणांना लाजवेल असा पराक्रम केला, हा इतिहास सांगतो, माणूस मनाने तरुण असावा, वय त्यापुढे फिके पडते,
माणूस हा आजीवन विद्यार्थी असतो, नवी नवीन उपक्रम त्याने शिकावे, नोकरी करत असते वेळेस सुद्धा अनेक लोक वेगवेगळ्या पदव्या घेतात.

,शिक्षण शिकतात, वय वाढत जाते, फक्त शिकण्याची इच्छा असावी लागते, इच्छा असेल तर मार्ग आपो
आप निघतो,
एखाद्या गोष्टीची आवड लागली की सवड लगेच मिळते,म्हणून इच्छेने आपण अनेक मार्ग सापडू शकतो, त्यासाठी वयाची काही आवश्यकता नाही,भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावरून सेवा निवृत्त झाल्यानंतर परत अध्यापन करण्यासाठी कॉलेजमध्ये जात होते, म्हणजे अध्ययन करून अध्यापन करत होते,यासाठी मला सांगावे वाटते की वय शिक्षणाच्या आड येता कामा नये.

तेव्हाच गुणवान माणसे मोठी होतात, राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी सुद्धा शिक्षणाबद्दल अनमोल अशी माहिती दिलेली आहे,सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण शिकून लहान -मोठे उद्योग करावेत, शिक्षण शिकावेत, असा त्यांचा अट्टाहास होता, वयाने मोठे विद्यार्थी झाले असले तरी आश्रम शाळेत बसून त्यांना शिक्षण द्यावे असे त्यांना नेहमी वाटत असे,
भारत सरकारने काही वर्षांपूर्वी प्रौढ शिक्षण ही योजना काढली होती, त्यामुळे अनेक ज्येष्ठ लोकांना आपले नाव ,गावाचे नाव थोडं लिहायला, वाचायला आले ,त्यामुळे त्यांचे मन आनंदी झाले. राजकारणामध्ये काही दिग्गज मंडळी मोठे मोठी पदे पादाक्रांत केलेली आहेत, वय झालं असलं तरी शरीर थकले तरी मन आणखी थकलेले नाही यावरून कळते ,भर पावसात भर उन्हात वादळ वाऱ्यात मोठमोठ्या सभा त्यांनी गाजवल्या हे तरुणांनी लक्षात घ्यावं. चित्रपटसृष्टीमध्ये काही अभिनेते एवढे मोठे झालेले आहेत की आणखी ते पाठीमागे फिरवून पाहत नाहीत ,सारखे कामात व्यस्त असतात,

जेणेकरून येथे वयाचा विचार न होता, मनाची तयारी मनाचा भक्कमपणा जिद्द ,चिकाटी, श्रम करण्याची तयारी या गोष्टीमुळे आपण पुढे जाऊ शकतो म्हणून शिकण्यासाठी मनाची तयारी लागते,
दक्षिण आफ्रिकेचे सर्वेसर्वा नेल्सन मंडेला यांनी जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर चांगल्या चांगल्या पदावर कार्य केले, तुरुंगात राहून सुद्धा मानवता वादी विचार त्यांनी सर्वांना शिकवले, वय झालेले असले तरी मन तरूण ठेवून कार्य केलेले महत्त्वाची व्यक्ती होते.
सध्या मोबाईलच्या नादामुळे अनेक जण शिक्षण व्यवस्थित शिकत नाहीत,मुक्त विद्यापीठाकडे प्रवेश घेऊन कसे तरी पदविका पूर्ण करतात. जीव लावून शिकत नाहीत ,त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही.

परत ते बेरोजगार म्हणून समाजाच्या नजरेसमोर येतात असं न करता सर्वांनी तन-मन ठेवून अभ्यास करावा, तेव्हाच आपल्याला यश मिळेल त्यासाठी मनाची पूर्ण तयारी असावी लागते,मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण।। असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात ‘मन प्रसन्न असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही, मन हे फार चंचल आहे ते कधी, कुठे, कसं भरकट जाईल सांगता येत नाही म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात ‘मन वढाय वढाय’ मनाला काबूत ठेवून शिक्षण शिकण्यासाठी इच्छा लागते वयाची काहीही आवश्यकता नाही, काही व्यक्ती वयाच्या ७० व्या वर्षी पी,एच,डी करून दाखवली आहे, “जिद्दी माणसं नेहमी सिद्धी मिळवतात” हे खरोखरच यावरून कळते.त्यांना शिक्षणात रस होता त्यामुळे ते वय विसरून गेले बऱ्याच वेळेस वय कधी संपून गेलं हे कळत ही नाही, सुखाचे दिवस निघून जातात दुःख पदरी पडते, तरी सुद्धा निराश होऊ नये ,त्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो म्हणून जिद्दीने शिक्षण शिकावे, जोपर्यंत नोकरी मिळत नाही, तोपर्यंत सतत अभ्यास करावा, चिंतन करावं ,मनन करावे,आज ज्येष्ठ समाजसेवक मा, अण्णा हजारे साहेब वयाची ८० वर्ष ओलांडून सुद्धा तरुणांसारखे कार्य करत आहेत नसबंदी, कुऱ्हाडबंदी चराईबंदी, दारूबंदी या विषयावर ते नेहमी कार्यक्रम घेत असतात ,

त्यांना कसल्याही प्रकारचा आळस नाही, मनाची तयारी झाली की बऱ्याच अशक्य गोष्टी शक्य करून दाखविता येतात असे अनेक उदाहरणा वरून सांगता येते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे खालील ओळीतून दाखवून दिलेले आहे,

विद्याविना मती गेली । मतीविना नीती गेली।।नितीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून कोणतीही वयाची अट न बाळगता विद्या शिका, तेव्हा तुम्ही गुलामगिरीतून मुक्त व्हाल, असे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणून म्हणतो “तरुणांना आपला अमूल्य वेळ मोबाईलवर वाया न घालवता जे चांगला आहे ते घ्या वाईटा च्या नादी लागू नका, हा जन्म पुन्हा नाही, मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा व शिकण्याच्या वयामध्ये शिक्षण जरूर घ्या.आज अपयश आले तरी उद्या यश येईल या जिद्दीने सातत्यपूर्ण शिक्षण शिकून मोठे मोठ्या पदव्या हस्तगत करा, तेव्हाच आपला देश बौद्धिक दृष्ट्या प्रगत होईल, आणि कोणीही आपल्या देशाकडे शिक्षित देश आहे म्हणून वाकड्या नजरेने पाहु शकणार नाही ‘जिथे ज्ञान आहे तेथे खरोखरच मान आहे ‘वय बाजूला ठेवून शिक्षणाची कास धरा, आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा पासून वय झालेल्या व्यक्ती सुध्दा नवीन आयुष्याची सुरुवात करा.

शब्दांकन
विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी,
संस्थापक अध्यक्ष: प्रा.विठ्ठल बरसमवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *