नांदेड :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापाठोपाठ आपण मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वाटचालीत नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्याचे मोल, मराठवाडा मुक्तीच्या इतिहासातील पाऊल खुणा, वस्तुस्थिती पोहचली पाहिजे. यासाठी तालुकापातळीवर व्यापक जनजागरणाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय म.रा.मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या विद्यमाने ‘नांदेड ग्रंथोत्सव 2022’ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडीयम परिसरातील जिल्हा ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाटय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटने, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव शामल पत्की, मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रभाकर कानडखेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी व ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यातील मोजकेच स्वातंत्र्य सैनिक आपल्यात आहेत. त्यांना सर्वदूर पोहचता येणार नाही. अशा स्थितीत ग्रंथाच्या माध्यमातून साकारलेला इतिहास हा गावोगावी पोहचविण्यासाठी सर्वांनीच पर्यंत करण्याची गरज असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. मराठवाडा मुक्ती अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यापक प्रमाणात उपक्रम हाती घ्यावयाचे आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार अधिकाधिक लोकसहभागाच्या दृष्टीने नियोजन केले जाईल. माजी आमदार गंगाधर पटने, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत यांच्या सारखी अनेक मान्यवर मंडळी यांचे यात योगदान व मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्याची सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री गुरूगोबिंदसिंघजी यांनी ग्रंथाला गुरूच्या स्थानी मानले आहे. यादृष्टिने नांदेड येथे होणारा हा ग्रंथोत्सव केवळ या उपक्रमापुरता मर्यादीत नसून वर्षेभर सातत्याने जिल्हा ग्रंथालयामार्फत वाचन प्रेरणा सारखे उपक्रम सुरू राहतील. याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून यात अधिकाधिक लोकसहभागातून हे उपक्रम राबवू, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. आभासी जगात स्वताला हरवत चाललेल्या समाजाला सावरण्यासाठी ग्रंथासारखे दुसरे माध्यम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माणसाच्या जीवनाला आकार देण्याची ताकद ही ग्रंथात असते. अनेक राष्ट्र पुरूष यांचे प्रेरणास्थान हे ग्रंथ होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला ग्रंथामुळे कलाटनी मिळाली. ग्रंथ केवळ लहान मुलावरच नाही तर मोठ्या माणसांवरही संस्कार करतात, या शब्दात अखिल भारतीय मराठी नाटय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दत्ता भगत यांनी ग्रंथाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत केले. शासकिय कार्यक्रमांसह अन्य इतर सार्वजनिक कार्यक्रमात ग्रंथासारखी भेट देणे आवश्यक असून यातून वाचन संस्कृतीला बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पुस्तका एवढा चांगला मित्र कुठे सापडणार नाही. वाचन संस्कृती लोप पावत आहे, अशी ओरड होत असतांना दुसऱ्या बाजुला माध्यम बदलत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सोशल मीडिया व इतर कितीही माध्यमे आली तरी पुस्तकाचे महत्व भविष्यातही तेवढेच राहिल, असे शामल पत्की यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार गंगाधर पटने यांनी मनोगत व्यक्त केले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शालेय मुलांबरोबर शिक्षकांमध्येही वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तालुकानिहाय उपक्रम हाती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रताप सुर्यवंशी तर आभार गोविंदराव सिंधीकर यांनी मानले.
*दुपारच्या सत्रात झाला परिसंवाद*
“वाचन संस्कृती संवर्धनार्थ उपाययोजना” या विषयावर ॲड. गंगाधर पटने यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादात रणजीत धर्मापुरीकर अब्राम लिंकचे पत्राचे वाचन केले. वाचन संस्कृती प्रगल्भ होण्यासाठी उपाय योजनांमध्ये ग्रंथपालाची भूमिका महत्वाची असते. याचबरोबर ग्रंथप्रदर्शन, जयंती, पुण्यतिथी साजरी करून वाचकांच्या मनात गोडी निर्माण होऊ शकते, असे धर्मापुरीकर यांनी सांगितले. डॉ. कैलास वडजे यांनी, प्रा. दीपा बियाणी, डॉ. जगदीश कुलकर्णी यांनीही परिसंवादात मनोगत व्यक्त केले.
कविता आणि कथा अभिवाचनामध्ये प्रा. स्वाती कान्हेगावकर यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेचे वाचन केले. प्रा. महेश मोरे यांनी वसंत बापट यांची कविता, प्रा. आशा पैठणे यांनी शांता शेळके यांच्या कवितेचे तर प्रा. शिवा कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रायश्चित्त कथेचे वाचन केले.
दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात नांदेडसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रकाशकाची दालने आहेत. औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराचे व बालभारतीचे विशेष दालन या ग्रंथप्रदर्शनात आहे. याचबरोबर शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.
*रविवार 20 नोव्हेंबर रोजी असे आहेत कार्यक्रम*
सकाळी 11 ते 1 या कालावधीत “मराठवाडा मुक्ती संग्रामातील संवेदनांचे काठ”या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. या परिसंवाद मध्ये प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.पृथ्वीराज तौर व प्रा.डॉ. महेश जोशी, प्रतीक्षा तालंगकर सहभाग नोंदवणार आहेत. दुपारी 2 ते 4 वाजता “आजची समाज माध्यमे व वाचन संस्कृती” या विषयावर माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे नीलकंठ पाचंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सायं 4 ते 6 यावेळेत नांदेड ग्रंथोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम धर्मादाय उपायुक्त किशोर मसने यांच्या अध्यतेखाली संपन्न होणार आहे. या कार्याक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, साहित्यिक देवीदास फुलारी, बी.जी.देशमुख, एम.जी.एम कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.गोंविद हंबर्डे उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.