सिद्धार्थ जाधव निमित्त ‘बालभारती’ या मराठी चित्रपट

 

 

‘लहानपणीच मुलांचे लहानपण हेरावून घेऊ नका’ – सिद्धार्थ जाधव निमित्त ‘बालभारती’ या मराठी चित्रपटाचा प्रमोशनल इव्हेंट.
१. तुमच्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये ‘जर्नी’ ह्या शब्दाचा उच्चार चुकीचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलेला दाखवलाय. त्यामुळे मुलगा गोंधळतो. शिक्षकांची एक पद्धत, बाबांची एक पद्धत त्यामुळे सगळ्यांनाच शिकण्या शिकवण्याचा तणाव आलाय. मराठी माध्यमातली सगळीच मुलं शुद्ध मराठी बोलतात का? आपल्या देशात दर बारा मैलावर भाषा बदलते असे असताना अधिक आव्हानात्मक (चॅलेंजिंग) तुम्हाला काय वाटते? भाषा? उच्चार? शब्द? की संवाद? की आकलन प्रक्रिया? अशा प्रश्नांवर दिग्दर्शक नितीन नंदन व अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी दिलेली उत्तरे….

भाषा, माध्यम, शब्द, उच्चार या पलिकडे खरे शिक्षण आहे. शिक्षणात संवाद महत्वाचा आहे. माध्यम कुठले आहे या पेक्षा विद्यार्थात गुण कोणते आहे ते हेरून त्या प्रमाणे त्याला शिक्षण मिळतंय का? पालक, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांसाठी हा सिनेमा आहे. मनोरंजनातून महत्वाचा अत्यावश्यक विषय हाताळण्यात आला आहे. मुलांना उद्योगी बनू द्या, त्यांच्या उद्योगातून स्वयंस्फूर्त अध्ययनाची गोडी निर्माण होते त्यासाठी त्यांच्या सोबत रहा असा संदेश देणारा हा चित्रपट येत्या दोन डिसेंबर रोजी रिलीज होत आहे.

विशेष हे की आपल्या नाशिकच्या नितीन नंदन या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. झिंग चिक झिंग या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, सुरभी या दूरदर्शन वरील अत्यंत गाजलेल्या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. या निमित्त त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून चित्रपटाविषयी अधिक खुलासा झाला. नितीन नंदन यांनी स्वतःचे बालपणीचे काही वैयक्तिक अनुभव सांगितले. ज्यात त्यांना इंग्लिश शिकताना कसे अडथळे आले मग आयुष्याच्या एका वळणावर इंग्लिश का यायला हवे याचे महत्त्व पटल्यावर त्यांनी स्वतःच इंग्लिश शिकण्याचे मार्ग कसे शोधले वगैरे.

२. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे या तत्वास अनुसरून किंवा मराठी भाषा वाचविणे किंवा मराठी माध्यमाच्या शाळा वाचविणे असा तुमचा चित्रपटाचा विषय आहे का? कारण आता २०२० च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे अशी सुचना आली आहे परंतु मातृभाषा, राज्यभाषा, बोलीभाषा असे अनेक फाटे त्यास फुटतात. आपल्याकडे विविध प्रांतीय संस्कृतीचे बाळकडू मिळते, विविध भाषिक लोक एकत्र राहतात प्रत्येकाची मातृभाषा वेगळी, बोली भाषा वेगळी, कार्यालयीन भाषा वेगळी! वैश्विक एकात्मतेवर भर देणारी नवपीढी उदयास येत असताना मराठी भाषेतच शिक्षण द्यावे हा हट्ट कितपत योग्य आहे? अशा प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरे सिद्धार्थ व नितीन ने दिली.

सिद्धार्थ जाधव या अभिनेत्याने चित्रपटाबद्दल तसेच विद्यार्थांच्या शालेय जीवनातील जडण घडणीबद्दल दिलखुलास मते मांडली. वर वर विनोदी दिसणारा सिद्धार्थ यातून नव्याने उलगडला. सिद्धार्थ स्वतः दोन मुलींचा बाप म्हणून अतिशय संवेदनशील वाटला. मुलांना लहानपणी लहानच राहू द्या. लहानपणी उगीच मोठे करू नका. बालपण एकदा संपले की पुन्हा मिळत नाही हे तळमळीने सांगतानाचा सिद्धार्थ गंभीर होता. तळमळीतून तो ते पालकांना सांगत होता.

आजकाल थोडे नृत्य यायला लागले की चित्रपट मिळण्यासाठी धडपडणारे पालक, थोडे गाता यायला लागले की प्रसिद्धीसाठी हपापलेले पालक पहायला मिळतात. त्या मुलांना त्या कलेचा सखोल अभ्यास आधी करू द्या. वेळ एकदा गेली की पुन्हा येत नाही.
शिकणं महत्वाचं आहे. शिक्षण चालू राहिले पाहिजे. अभ्यास फार महत्वाचा आहे आणि त्याबरोबरच अभ्यासोत्तर उपक्रमही तितकेच महत्वाचे आहेत. त्यात मुलं खऱ्या अर्थाने खुलतात. संस्कारक्षम पिढीची नितांत गरज आहे. वैश्विक एकात्मतेवर भर देवून क्षितिजापलिकडचे शिक्षण देता आले पाहिजे यासाठी शिक्षण अभ्यासक, पालक, समाज हितचिंतक सगळ्यांनीच सजग राहिले पाहिजे. हे सगळे बोलताना विनोदातून गंभीर विषय हाताळणारा सिद्धार्थ दिसला.

बालभारती या चित्रपटा विषयीचा मुक्त संवाद घेण्याचे उद्दिष्ट हेच होते की हा चित्रपट सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, समाजातील प्रत्येक व्यक्तीने थिएटर मध्ये पहावा. मराठी चित्रपटांना न्याय मिळावा. थिएटर हाऊसफुल्ल करावे. आणि त्यातून आदर्श शिक्षणाबद्दल ची संकल्पना स्पष्ट व्हावी.

सोबत सहसंंवादक लेखिका , कवी तन्वी अमित, आर्किटेक्ट जयेश आपटे होते त्यामुळे संवाद विशेष रंगला. ग्रंथ तुमचे द्वारी चे प्रणेते, कुसुमाग्रजचे विश्वस्त विनायक रानडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान ने आयोजित केला होता.

 

विजयालक्ष्मी मणेरीकर, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *