बुद्ध विहारे ज्ञानाची केंद्र व्हावीत -भदंत पंय्याबोधी महाथेरो यांनी व्यक्त केली अपेक्षा

 

नांदेड दि.- बुद्ध विहारात धम्म आचरण, धम्माची शिकवण आदींची माहिती मिळते. पण याच बरोबर नविन पिढीच्या सर्वांगिण विकासासाठी विहारे ही ज्ञानाची केंद्र बनली पाहिजेत, असे प्रतिपादन अ. भा. भिक्खू संघ परिषदेचे जिल्हाध्यक्ष भदंत पंय्याबोधी महाथेरो यांनी सांगवी येथे बोलताना केले.

शहरालगत असलेल्या सांगवी (बु.) येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात ज्येष्ठ उपासिका श्रीमती चांगुणाबाई संभाजी बुक्तरे यांनी दान केलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अडीच फुटाची पितळी मूर्ती स्थापित करण्यात आली. त्या वेळी पंचशिल महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात धम्मदेसना देताना ते बोलत होते. यावेळी होमगार्डचे समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भदंत पंय्याबोधी आपल्या धम्मदेसनेत पुढे म्हणाले की, बौद्ध धम्म हा मानवी कल्याण व उत्कर्षाचा खरा मार्ग आहे. सामजिक समता, न्याय, बंधुत्वता याची त्रिसुत्री बुद्ध धम्मात आहे. बौद्ध धम्म जगात सर्वश्रेष्ठ धम्म आहे.

ज्ञानाचा महासूर्य असलेल्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भूतलावर असलेल्या सर्व धर्मांचा सखोल अभ्यास करून विज्ञाननिष्ठ, मानवतावादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर धर्मांतराचा मुलमंत्र देऊन तमाम उपेक्षित, वंचित लोकांच्या जीवनाचे सोने केले.

इतकेच नव्हे तर देशातील सर्व लोकांना मुक्त श्र्वास घेऊन जगण्याचा मार्ग दाखवून त्यासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संरक्षण दिले, असे सांगून भदंत पंय्याबोधी पुढे म्हणाले की,बुद्ध विहारांमध्ये धम्माचरण, धम्म महती, धम्मा संदर्भात इत्यंभूत विधी व संस्कार या बाबीची जाणीव, जागृती सतत विहारांमध्ये होत असली तरी केवळ या बाबी पुरते मर्यादित न राहता जागतिक स्तरावर होत असलेल्या स्पर्धेचा विचार करता नव्या पिढीसाठी सर्व बुद्ध विहारे ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ज्ञानाची केंद्र बनली पाहिजेत. त्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

यावेळी होमगार्ड समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, सौ. श्यामल कांबळे यांची समयोचित भाषणे झाली. ज्येष्ठ उपासिका श्रीमती चांगुणाबाई संभाजी बुक्तरे यांनी या पुर्वी तथागत गौतम बुद्ध यांची पितळी मूर्ती देखील दान दिली होती. त्यांच्या या दान दातृत्वाबद्दल त्यांचा व त्यांच्या परिवाराचा भदंत पंय्याबोधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची पुष्पवृष्टी सह गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्रिसरण पंचशिल ग्रहणासह मुर्ती स्थापित करण्यात आली.या वेळी पंचशिल महिला मंडळाच्या सर्व सदस्या, नागरिक, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी खिरदान देखील करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *