नांदेडच्या विमानसेवेसाठी स्वतः लक्ष घालणार…! ज्योतिरादित्य शिंदे यांचा अशोकराव चव्हाणांना शब्द

 

नांदेड, दि. १४ डिसेंबर २०२२:

देशाच्या नकाशावर नांदेड शहराचे स्थान महत्वपूर्ण असल्याची मला जाणीव असून, येथील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन, असा शब्द नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिला आहे.

बुधवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत त्यांनी ही सकारात्मक भूमिका घेतली. चव्हाण यांनी यावेळी नांदेडची विमानसेवा खंडीत झाल्याने प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबाबत शिंदे यांना अवगत केले. ट्रुजेट या विमान कंपनीला नांदेड- मुंबई- कोल्हापूर विमानसेवेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या अक्षमतेमुळे ही विमानसेवा नियमित स्वरूपात सुरू नव्हती. नियोजित उड्डाणे अचानक रद्द करण्याचे प्रसंग वारंवार घडत असल्याने प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत होता, असे ते म्हणाले.

नांदेड व कोल्हापूर ही दोन्ही शहरे देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा आणि कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन्ही शहरांची विमानसेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र, यापूर्वीच्या विमान कंपनीची सेवा अत्यंत असमाधानकारक होती, असे अशोकराव चव्हाण यांनी नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

प्रवाशांची असुविधा दूर करण्यासाठी शिंदे यांनी स्वतः लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे विषद करून चव्हाण यांनी नांदेड ते मुंबई व मुंबई ते कोल्हापूर ही विमानसेवा ट्रुजेटऐवजी इंडिगो किंवा एअर इंडियासारख्या कंपनीकडे सोपवण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे नांदेडवरून मुंबईसह, हैद्राबाद, नवी दिल्ली, अमृतसर, चंदिगड, पुणे, शिर्डी, नागपूर व कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरू करावी, अशीही मागणी मांडली. या विमानसेवा सुरू झाल्यास परिसरातील प्रवासी, भाविक तसेच उद्योजक व व्यावसायिकांची गैरसोय दूर होईल, असे त्यांनी शिंदे यांना सांगितले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेत त्याकडे स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शिंदे यांनी नांदेड शहराला अनेकदा भेटी दिल्या असून, या चर्चेत त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *