माजी आमदार व माजी खासदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी ०१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १:२० वाजता उपचार दरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात,दोन मुले,पाच मुली,जावई,सुना,नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत .
डॉ.भाई केशवराव धोंडगे यांनी शेकाप मध्ये आयुष्यभर कार्य केले.ते शेवट पर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले.भाई धोंडगे १९५७ ते १९९५ पर्यंत कंधार/लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.त्यांनी १९७७ ते १९८० या कालावधीत लोकसभेत खासदार म्हणून नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.महाराष्ट्र लोकलेखा समितीचे पाच वर्षे चेअरमन म्हणून काम पाहिले. १९४९ साली कंधार येथे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे स्थापना करून ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी,शेतमजूर,गोरगरिबांच्या मुलांसाठी ५७ शाळा,एक विधी महाविद्यालय,दोन महाविद्यालय स्थापन करून शिक्षणाची सोय केली.
भाई धोंडगे यांनी १९७५ साली आणीबाणीच्या विरोधात आंदोलन केले.त्या आंदोलनात त्यांनी नाशिक जेल मध्ये १४ महिने कारावास भोगला.सीमा प्रश्नविषयी १९५८ ला भालकी जेल (कर्नाटक) मध्ये दीड महिना जेल भोगली.हैद्राबाद मुक्ती संग्रामात निजाम राजवटीच्या विरुद्ध काम केल्याने शासनाच्यावतीने त्यांना स्वतंत्र सैनिक म्हणून गौरवण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव नांदेडच्या विद्यापीठाला देण्यासाठी भाई धोंडगेचा आग्रह होता.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ती मागणी मान्यही केली.भाई धोंडगे यांनी गोरगरिबांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रह केली.गुराख्याना पेन्शन मिळालेच पाहिजे हा त्यांचा नारा होता.ग्रामीण भागातील गोरगरीब, उपेक्षित,नाहिरेवाल्यांच्या मुलांन कायद्याचे शिक्षण मिळावे म्हणून कंधारमध्ये त्यांनी विधी महाविद्यालय स्थापन करून मातोश्री मुक्ताईंचे स्वप्न साकार केले.
भाई धोंडगे हे जेष्ठ पत्रकार,साहित्यिक व संपादक होते.साप्ताहिक जयक्रांतीच्या माध्यमातुन त्यांनी अनेक ज्वलंत प्रशांना वाचा फोडल्या.म्हणून २०१२ साली त्यांना जेष्ठ संपादक म्हणून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाने त्यांना डि.लीट पदवी बहाल करण्यात आली.शतकोत्सवी वर्षानिमित्त भाई धोंडगे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने,विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्यावतीने २४ ऑगस्ट २२ रोजी त्यांचा गौरव करण्यात आला.
अशा या महान १ जानेवारी २३ रोजी दुपारी १:२० वाजता औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटल येथे काळाच्या पडद्याआड गेले. २ जानेवारी रोजी सकाळी ८ ते २ वाजे पर्यंत त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड कंधार येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघणार असून दुपारी ४:१५ वाजता क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.