भाई केशवराव धोंडगे

एखाद्याचे देहरुपी अस्तित्व संपले की श्रद्धांजलीपर चार शब्द लिहिणे हा औपचारिक भाग आहे, पण ज्यांचे वैचारिक प्रेरणा देणारे अस्तित्व कायम स्वरुपी असते त्यांच्यासाठी हा उपचाराचा भाग देखील अनावश्यक असतो. केशवराव धोंडगे हे नावच असे उर्जादायी आहे की , मनाने मृतप्राय झालेला माणूस देखील खडबडून जागा होईल ! असे चैतन्य, असे वक्तृत्व, असे कर्तुत्व आणि असे अस्तित्व फार फार दुर्मिळ असते. आम्ही खरेच भाग्यवान की ह्या जगावेगळ्या माणसाचे सानिध्य आम्हाला लाभून आमचे जीवन कृतार्थ झाले.

एका माणसात किती प्रतिभा असावी ? जीवनाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणारी ही प्रतिभा फक्त केशवराव धोंडगे यांच्यामधेच होती. एक निष्ठावान राजकारणी, एक तळमळीचा समाजकारणी, एक नावीन्य पूर्ण लिखाण करणारा लेखक, एक कुशल लोकसंग्राहक, एक लोकप्रिय जननायक, एक प्रखर स्वाभिमानी, एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक विकासदृष्टी असणारा नेता, एक अतिशय हजरजबाबी व्यक्तिमत्त्व, उपरोध आणि उपहास यांची विनोदी शैलीत मांडणी करणारा एक अत्यंत प्रभावी वक्ता, खुमासदार शैलीने सभागृहात खिल्ली उडविणारा आमदार, विचारधारा प्रवाहित ठेवणारा संपादक , निस्सीम मातृभक्त, अन्यायाविरुद्ध पेटून उठणार आक्रमक…. किती म्हणून पैलू सांगावे ?
“कंधार” असा उल्लेख बाहेरगावी झाला तर समोरचा माणूस केशवराव धोंडगेचे कंधार का ? असे हमखास विचारायचा,आणि मग वेगळी ओळख सांगायची गरज नसे. इतका अमिट ठसा त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पाडलेला होता. आपल्या मतदारसंघावर त्यांचे निरतिशय प्रेम होते, प्रत्येक गावात त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याची कुटुंबे आणि माणसे जोडली. ज्या काळात कसलीही वाहने जात नसत अशा खेडोपाडी हा झपाटलेला माणूस पायी फिरायचा. त्यामुळेच तिथल्या समस्या, वेदना आणि दुःखे यांची खोलवर जाणीव होत जनकल्याण हा त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश निश्चित झाला. उर्वरित आयुष्य त्याच कारणासाठी ते जगले, अगदी वयाचे एकशे दोन वर्ष पुर्ण होईपर्यंत ! शेवटपर्यंत निग्रहाने तत्वाशी आणि विचाराशी कधीच प्रतारणा केली नाही. शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व संपले तरी लालबावटा हातून कधीच सोडला नाही ! जगातून साम्यवादी चिन्ह असलेला वीळाकोयता लोप पावला पण मुक्ताई प्रभा ह्या घरावरील वीळा कोयत्त्याचा झेंडा कायम फडकत राहिला. इतकी अतूट पक्षनिष्ठा ही आजच्या पिढीस नवलाईची बाब वाटेल पण ते निखळ सत्य आहे.

माझ्या व्यंगचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन भाईचे शुभहस्ते झाले, त्यावेळी ते म्हणाले की याला विनोदबुद्धी आवश्यक असते ती तुमच्याकडे आहे. मी म्हणालो की ही तुमचीच देणगी आहे भाई… लहानपणापासून तुमची जाहीर भाषणे ( भाषणे कसली तुफान खिल्ली उडविणारे ते विनोदी एकपात्री प्रयोगच असत ) ऐकतच मी तयार झालो, खळाळून हसवीणारी तुमची भाषणे ऐकतच विनोदबुद्धी जागृत झाली म्हणूनच आज व्यंगचित्रकार बनलो….याचे श्रेय तूम्हाला ! आणि खरेच आजही भाईच्या भाषणातील विनोदी संदर्भ आठवतात आणि प्रसन्न हास्य चेहऱ्यावर उमटते. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, आचार्य अत्रे इत्यादी दिग्गज मंडळींना देखील तुम्ही सोडले नाही. अगदी कालपरवा शरद पवारांना भरसभेत “बिनचिपळ्याचा नारद” अशी मजेदार उपमा देऊन धमाल उडविली होती ! आपली आंदोलने देखील अनोखी आणि मजेदार असत, दमकोंडी मोर्चा काय, हागुमुतू सत्याग्रह काय, तहसील कारकुनाने शेतकऱ्याला कोंबडा पार्टी मागितली म्हणून बाटली आणि कोंबडी घेऊन तहसील कचेरीवर काढलेला धडक मोर्चा काय, आणीबाणी विरोधातील सेन्सॉरची तर तुम्ही ऐशी की तैशी उडवीत म्हशीच्या पाठीवर इंदिरा मुर्दाबाद, आणीबाणीचा निषेध अशा घोषणा लिहून त्यांना गावभर सोडले..! पोलिसांना देखील सुचेनासे झाले होते की आता म्हशींना अटक करायची की काय ?
जागरूक लोकप्रतिनिधी कसा असतो ते तुम्ही जनतेप्रती असलेल्या संवेदनांमुळे दाखवून दिले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक खेडेगावी जाणारे रस्त्याचे जाळे केवळ तुमच्यामुळे झाले. असे म्हणतात की जिल्ह्याच्या बजेटचा निम्मा हिस्सा तुम्ही ओढून आणत होतात ! ज्या काळात शाळा काढणे ही आजच्यासारखी दुभती गाय नव्हती, त्या काळात हा न परवडणारा उद्योग केलात, अगदी पदरमोड करून गावोगाव शाळा काढल्या. हजारो तरुण शिक्षणाच्या वाघिणीचे दूध पिऊन तयार झाले, लढवय्ये बनले, हक्का विषयी जागरूक झाले, निर्भयी बनले. शासकीय अधिकारी वर्ग, मुजोर नोकरशाही देखील जनतेला घाबरून असते हे तुम्हीच आम्हाला शिकविले. त्यामुळेच कुठेही गेलो तरी आमचे भयमुक्त वेगळेपण उठून दिसायचे. कितीतरी नवीन कल्पना नवीन शब्द नव्या प्रेरणा आपल्यामुळे मिळाल्या त्याची गणना नाही. मण्याड खोऱ्यातील बहाद्दर जनता ही उपमा असो की मानाची जयक्रांती हा शब्दप्रयोग असो ती केवळ तुमचीच शैली ! राजकारण, समाजकारण, आंदोलने इतक्या व्यापातून तुम्ही कंधार स्टाईल असलेले वेगळे लिखाण आपल्या जयक्रांती साप्ताहिकातून अखंडपणे केले अगदी आजतागायत केले. आगळ्या वेगळ्या धाटणीची अनेक पुस्तके लिहिली हे सगळे पाहून विस्मयचकित व्हायला होते. उपेक्षितांचे अंतरंग खऱ्या अर्थाने तुम्ही जाणले होते, सुग्या मुग्याचे राजकारण, नाही रे वाल्याचे कैवारी, अन्याय पीडितांचा त्राता, अनाथांचा नाथ, वैदू, गोसावी, मसणजोगी, वासुदेव कोल्हाटी, सफाई कामगार, नाडलेले शेतकरी, पालातून राहणाऱ्या भटक्या जातीची दुःखे चव्हाट्यावर मांडणारा असा नेता पुन्हा होणे नाही !

प्रखर राष्ट्रवाद हा तर तुमचा बाणा होता, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे वंदेमातरम गीत विधिमंडळात सुरू करण्याचे श्रेय फक्त केशवराव धोंडगे यानाच जाते. कोणता मतदार वर्ग नाराज होईल म्हणून मतासाठी कधीच तडजोड केली नाही. एवढेच नाही तर जनमानसात प्रथा कायम राहावी म्हणून लग्न सोहोळ्यात वंदेमातरम गीत म्हणण्यासाठी आग्रही राहिलात. गौरवशाली इतिहासाची जाणीव ठेवत कंधारचा “राष्ट्रकूट ” वारसा जपणारा नेता म्हणून तुमचे स्थान विशिष्ट ठरते. सर्वलोकाश्रयमंडप असे नाव देणे, जगतुंगसागर नाव प्रचलित करणे, कालप्रियनाथची आवरजून प्रतिष्टापणा करणे, पुरातन शिल्पकलेचे अवशेष जपणूक करणे … कितीतरी आठवणी आहेत.
साम्यवादी विचारधारेची लाल पताका सतत खांद्यावर असली तरी भगव्याशी वैर नव्हते. आपल्या मोर्चात तो नेहमी असायचा. नास्तिक असलेला आस्तिक माणूस, देव न मानणारा देवमाणूस म्हणून जनतेने आपणास पाहिले. तुमचे देह रुपी अस्तित्व संपले असले तरी प्रेरणा आणि नवचैतन्य देणाऱ्या अमर स्मृती कायम राहतील. आज एक धगधगते अग्निकुंड शांत झाले असले तरी आपण चेतविलेले हे यज्ञकुंड अखंड तेवत राहणार आहे !!

_ बाबू गंजेवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *