विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे पराक्रमी घराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला. आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांच नाव लखुजीराव जाधव होते. म्हाळसाबाईंनी आपल्या चार मुलांप्रमाणेच जिजाबाईंना शिक्षण देऊन संस्कारक्षम बनविले. जिजाबाईंना मराठी, फारसी, संस्कृत, कन्नड, तेलुगु, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषा येत होत्या.
जिजाबाई यांचा विवाह सन 1610 मध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला. जिजाबाईंच्या पोटी दिनांक 19 फेब्रुवारी 16 30 रोजी शिवाजीचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाई देवी वरून किल्ल्याचे नाव शिवनेरी व त्यावरून सुपुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्यांच्यावर संस्कार करण्याची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ साहेबांवर होती. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे बाळकडू शिवरायांना जिजाऊ साहेबाकडून मिळाले होते. छत्रपती शिवरायांचे तेजस्वी चरित्र घडविणारी राजमाता जितकी प्रेमळ तितकीच कठोरही होती. स्वराज्याची स्वप्न बघितले आणि बघितलेच नाही तर ते सत्यातही उतरवले. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे हे सिद्ध केले. मुस्लिम सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होते तेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा माॅ.साहेबांनी दिली. जिजाऊ मुळे महाराष्ट्राला शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज, संस्कारी राजा लाभले.
जिजामातेने बाळ शिवाजीच्या अंतकरणावर, धर्मनिष्ठा, स्वातंत्र्य लालसा, चरित्रनिष्ठा, स्वाभिमान याचे संस्कार अलौकिक मातेकडून हृदयावर कोरले आहेत. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा व धार्मिक दहशतवाद गाडला आहे. राजमाता जिजाऊ मुत्सद्दी राजनीतिज्ञ होत्या. माॅ.जिजाऊ चे राजकारण म्हणजे स्वराज्य निर्मिती. जुलमी ,अन्यायी अत्याचारापासून रयतेला मुक्त करून स्वराज्य स्थापनेचे उदात्त ध्येय ठेवून त्या सतत कार्यरत राहिल्या. स्वराज्य प्रेरिका राजमाता उत्तम प्रशासक होत्या. शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत प्रशासन व्यवस्था चोख ठेवणारी त्या उत्तम प्रशासक होत्या. न्यायप्रिय जिजाबाई अन्याय, अत्याचाराने पीडित जनतेला त्यातून मुक्त करून न्यायाचे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिली.
पुरोगामी राजमाता जिजाऊ इतिहास हा नवयुग निर्मितीचा इतिहास आहे. पती निधनानंतर सती न जाण्याचा निर्णय, सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता, शिवराज्याभिषेकाचा निर्णय, यामध्ये जिजामातेच्या कणखर पुरोगामी विचाराचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. जिजाऊ साहेब आदर्श ध्येयवाद, स्वराज्याबद्दल निष्ठा, पतीनिष्ठ, पुत्रनिष्ठ, मायाळू व सर्व जनतेला प्रेम देणाऱ्या रयतेच्या अडचणीच्या प्रसंगात धावून जाणाऱ्या स्वभावाच्या होत्या. हिंदवी स्वराज्याची संकल्पना, उभारणी, जडणघडण या सर्वांमध्ये प्रमुख वाटा होता. राष्ट्रमाता, राजमाता, वीर मातेने रायगडाच्या पायथ्याशी पाचड येथे 17 जून1674 रोजी निधन झाले. माॅ. जिजाऊ साहेबांना शतशः नमन….