शिक्षणगप्पा ; ज्योतीताई बेलवले

उपक्रमशील शिक्षिका ज्योतीताई बेलवले आणि उपक्रमशील शाळा तो-याचा पाडा ज्ञान पंढरी..● 

         ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील “तोऱ्याचा पाडा” या आदिवासी पाड्यावर अत्यंत निष्ठेने विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या प्रज्ञा आणि प्रतिभेला ओळखून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या देशपातळीवरील आणि  शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने राष्ट्रीय, राष्ट्रपती पुरस्काराने  सन्मानित केलेल्या ज्योतीताई बेलवले या उपक्रमशील शिक्षक भगिनींचा व्हिडिओ “शिक्षणगप्पा” या उपक्रमाच्या माध्यमातून ऐकण्याचा योग आला. 

      खरंतर महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्राला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न करणारे शिक्षणतज्ज्ञ  आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांनी सुरू केलेला “शिक्षणगप्पा” हा उपक्रम निश्चितच महाराष्ट्रातील माझ्यासह हजारो शिक्षकांना प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे असे मला वाटते.. 

     शिक्षकांनी एका विषया पुरते मर्यादित न राहता सर्व विषयांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना शिकवत आदिवासी पाड्यातील लेकरांच्या गुणवत्तेसाठी अहोरात्र परिश्रमित राहून ज्योतीताई बेलवले यांनी शंभर टक्के आदिवासी असणारा हा पाडा शिक्षणाची ज्ञान पंढरी करावी याच्यापेक्षा मोठं भाग्य शिक्षण क्षेत्रात असेल असे मला वाटत नाही.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेत सर्वच शिक्षिका  कार्यरत असलेला हा पाडा या पाड्यावरील सर्व शिक्षिका आपलेपणाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन विद्यार्थ्यांना परवडेल त्यांना आवडतील असे वेगवेगळे उपक्रम राबवून ज्योतीताई बेलवले यांनी जी अध्यापन पद्धती अवलंबिली ही पद्धती निश्चितच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला नवी प्रेरणा देणारी आहे असे मला वाटते. म्हणूनच “शिक्षक कमी सन्मान्य नही होता ! सृजन उसकी गोद मे पडती है !!हे आर्य चाणक्याचे विधान याठिकाणी सार्थक झाल्यासारखे वाटते.

इंग्रजी विषयासारखा अवघड विषय वेगवेगळे उपक्रम राबवून ज्योतीताई बेलवले यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांना गोडी लावत इंग्रजी विषयाचे अध्यापन सुद्धा आनंददायी शिक्षण पद्धतीने करता येते हे दाखवून दिले आहे.   

   शिक्षकांनी अध्यापन करत असताना एका विषयाची सांगड दुसऱ्या विषयाशी खाल्लात अध्यापन केले तर ते अधिक प्रभावी आणि सोयीचे होते हे ज्योतीताई बेलवले यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मातीचा स्तर, हाडाचे प्रकार हे वर्गात आणून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून कृतीयुक्त शिक्षण देण्याची ही अध्यापन क्रिया मला अधिक महत्त्वाची आणि प्रेरक वाटते.

सागरी प्रवाह हा पाठ शिकवीत असताना  ज्योतीताई बेलवले  यांनी जे विद्यार्थ्यांना अनुभव देताना उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह या कृतीतून अध्यापनाची क्रिया घडवून आणली ती अत्यंत प्रेरणादायी आहे असे मला वाटते. शिक्षकांनी पाठ्य कृतीसह इतरही अध्यापन कृती  विद्यार्थ्यांसोबत द्याव्यात हा त्यांचा उपक्रम अधिक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे.  एखादा शिक्षक आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्योतीताई  बेलवले ह्या होत.

          आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांनी त्यांना विचारलेला प्रश्न मला अधिक महत्त्वाचा आणि आणि विचार करायला लावणारा आहे. सर म्हणतात की तुमचा आवडता विषय कोणता? मला वाटते ज्योतीताई  त्यांचे सगळेच विषय मराठी ,हिंदी, इंग्रजी, विज्ञान, भूगोल, इतिहास, गणित आणि संगीत सगळेच विषय एका शिक्षकाला आवडतात हीच अत्यंत महत्वाची आणि प्रेरणादायी बाब आहे.आवड असली की आपोआप सवड मिळते.

मन तयार असले की कृती आपोआप घडत असते.हे ज्योतीताई यांचे विधान मला शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचे वाटते.शिक्षकांनी  मुलांना व्यवस्थित अध्यापन द्यावे,मुले आपोआप अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत गुंतून जातात हा महत्वाचा विचार आहे.खरंतर धावत पळत अध्यापन करणारे आम्ही गुरुजी परंतु जीव उतून त्या विषयात समरस होऊन आपलेपणाच्या भावनेने जेव्हा अध्यापनाची क्रिया घडत असते तेव्हा शंभर टक्के आदिवासी असणारा “तोऱ्याचा पाडा” अधिक ज्ञानसंवर्धित होतो.हे तेथील शिक्षिका ज्योतीताई बेलवले आणि त्याच्या सहकारी शिक्षिका भगिनींनी दाखवून दिले आहे.     

   शिक्षकांनी वेळेचे नियोजन आणि परिस्थितीचा विचार केला की आदिवासी भागातील मुले असोत की एखाद्या शहरातील मुले असोत ती निश्चितच गुणवत्तापूर्ण होऊ शकतात. हा ज्योतीताई चा आत्मविश्वास माझ्यासह महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना प्रेरणेचा स्त्रोत वाटतो.

ज्योतीताई बेलवले यांची प्रत्येक कृती मग ती शाळा रंगवणे असो, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तया करणे असो की शाळेतील झाडे लावताना भौमितिक आकाराचा वापर करणे असो या सगळ्या कृती अध्यापनाच्या दृष्टीने अधिक महत्वाच्या आणि प्रेरणादायी आहेत. खरंतर पुरस्कारासाठी आणि पुरस्कार मिळेपर्यंत अनेक शिक्षक मंडळी झपाटल्यागत काम करतात. रात्रीचा दिवस करून अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चालू ठेवतात.

परंतु एकदा पुरस्कार मिळाले की मग आपल्या वर्तनात शिथिलता येते. हे आपण अनेकदा जवळून पाहत असतो. ज्योतीताई बेलवले यांनी मात्र पुरस्कारासाठी कधीच विचार न करता विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे एकेकाचे रूप मनोहर घडविण्या मी सज्ज असे…. 

या न्यायाने ज्योतीताई कार्यतत्पर आहेत.शिक्षक म्हणून मला त्यांचा विशेष अभिमान वाटतो. राष्ट्रीय स्तरावरचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राष्ट्रीय, राष्ट्रपती पुरस्कार ज्योतीताई बेलवले यांना मिळूनही त्या शिक्षण आणि शिक्षण प्रक्रिया, अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांशी असलेली त्यांची आपलेपणाची ,स्नेह भावाची आणि बांधिलकीची भावना मला अधिक महत्त्वाची आणि प्रेरणादायी वाटते. जिद्द ,परिश्रम ,पराकोटीची कल्पकता यातून विद्यार्थ्यांप्रति बांधिलकीचा भाव मनात घेऊन काम करणारे अनेक शिक्षक आज समाजात वावरत आहेत. ज्योतीताई या दृष्टीने तुमचे काम मला अधिक महत्त्वाचे आणि आणि प्रेरक वाटले. शंभर टक्के आदिवासी असणाऱ्या पाड्यावर आपण करत असलेले हे अध्यापनाचे काम मला खूप मोलाचे वाटते.

तुमचा व्हिडिओ पहात, ऐकत असताना मी तुमच्या वर्गात बसून शिकतो आहे याची जाणीव मला होत होती.खरंतर हे शिक्षक म्हणून तुमचे कौतुकच आहे. तुमच्या धडपडीला आणि प्रज्ञा- प्रतिभेला मी ज्ञानाचा सलाम करतो..     

आदरणीय हेरंब हेरंब कुलकर्णी सरांनी जे प्रज्ञावंत आणि खरे विद्यार्थ्यांसाठी धडपडणा-या उपक्रमशील शिक्षकांसाठी “शिक्षणगप्पा” हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे खऱ्या अर्थाने सार्थक होत आहे असे मला निश्चितपणे वाटते.आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांच्या ज्ञानसाधनेला आणि प्रज्ञा- प्रतिभेला ज्ञानाचा सलाम करतो.     

पुन्हा एकदा आदरणीय ज्योतीताई बेलवले यांचे मनापासून कौतुक करून त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो..   

त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा देऊन थांबतो…. धन्यवाद…   

         *** शुभेच्छुक ***

     

  ● शिवा कांबळे,नांदेड ●   

 (राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक)

• भ्रमणध्वनी:९४२२८७२७२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *