नक्की वाचावं असं….

 

तिनं आधी तिकिटं काढली. सगळ्यांचे तिकिटाचे व्यवहार चोख केले. गाडी सुरू झाली. नि ती ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर स्थिरावली. पर्समधून फुलं बाहेर काढली. दोन तीन फुलं केसात माळली. दोन तीन फुलं ड्रायव्हर शेजारी ठेवली. पुन्हा पर्समधून सुई दोरा काढला. आणि ती तल्लीन होऊन फुलं गुंफू लागली. माळ तयार झाली. ती तिनं ओंजळीत धरली. ओंजळ नाकाशेजारी नेत दीर्घ श्वास घेतला. तेव्हा तिचा चेहरा त्या सुगंधाशी स्पर्धा करत होता. पुढच्या थांब्यावर गाडी थांबली, तशी ती उठली आणि तिने ती माळ ड्रायव्हरच्या केबिनमध्ये लटकावली. तेवढ्यात शेजारी शिवशाही येऊन थांबली. शिवशाहीच्या ड्रायव्हरलाही तिच्या माळेचा मोह झाला. तो म्हणाला,’आम्हालाही द्या की मॅडम’ पण तिची फुलं संपली होती.
पहाटे साडे पाचची ही गाडी. नुसतं आवरून गाडी गाठायची तरी चार साडेचारला उठण्याला पर्याय नाही. तेवढ्यात आपल्यासोबतच्या लोकांचा प्रवास सुखकर करण्याचा विचार करून ही पहाटे उठून फुलं तोडून माळेची तयारी करून कामावर हजर झालेली. कामं सगळेच जण करतात. पण त्यातल्या अनिवार्यतेला वैतागलेले असतात. पण थोडयाशा प्रयत्नाने ती अनिवार्यता एखादया सुखद अनुभवात रुपांतरीत करता येते.
काही माणसं ‘हो सके तो इसमे जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला हैं’ च्या तत्वानं जगत असतात.
अशी माणसं मला सहधर्मा वाटतात.

साभार /लेखन – राकेश जगताप ❤️🙏Rakesh Jagtap

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *