पंगत जेवणाची गंमत मेजवानीची
पुरणपोळी
विविधांगी पंगतीत जेवण्याची मजाच काही और असते.धार्मिक कार्य, लग्न,बारसं, वाढदिवस,मेळावे, कंदुरी,ऊरुस,उद्घाटने, यात्राजत्रा, आणि सुखदुःखाच्या प्रसंगी निमंत्रक स्नेहभोजनासाठी आमंत्रित करत असतात.पैपाहुणे मित्रपरिवारा सोबतीने गप्पा मारत आस्वाद घेणं म्हणजे सुखाचे घास मुखात घेणं होय.
असाच एकदा एकदीडचा सुमार असेल ओढ्या पलीकडच्या वस्तीवर चालत निघालो असताना ओळखीच्या गृहस्थाने समोरून येताना,’गुरुजी ऊन्हातान्हात एकटंच कुठं निघालाय.’ “अहो जरा पलीकडील वस्तीवरुन जाऊन येतो. तिथली दोनतीन मुलं शाळेत येत नाहीत.अन् तुम्ही कुठं गेला होता.अंगावर नवी कापडं अन् कपाळाला गंध दिसतोय.” माझं त्यांना पुसणं.असं म्हणल्याव त्यांनी हुकार दिला.त्यांचा होकार आल्यावर पुढे मी म्हणालो की,” काय सत्कार्य बित्कार झाला काय तुमचा?” त्यांच्या गळ्यात अडकवलेल्या शाल पाहून चौकशी स्वरुपात विचारले.
लगेच ते म्हणाले की,”आवं, गुरुजी गेलो हुतं सोयऱ्याकडं.आमच्या एका लांबच्या नात्यातल्या सोयऱ्याच्या घरी बऱ्याच वर्षांनी पाळणा हालला होता.म्हणून त्यानं समद्या गावाला बारशाचं आवातनं दिलं होतं. पाचीपक्वन्नाचा बेत केला होता मांदियाळं पैपाव्हणं गोळा झालं हुतं .”
“मग काय पोटाला तडस लागेपर्यंत जेवाण रेटावलं असणार.”माझं त्यांना विचारणं.मग काय त्यांनी त्या जेवणाच्या पंगतीचा समाचार आपल्या अस्सल गावरान शैलीत ऐकण्यासाठी रस्त्यालगतच्या फणसाच्या झाडाखाली दोघांनीही बुडं टेकविली.अन् त्यांचा पाहुणचार ऐकत बसलो.
” गुरुजी,जेवायला पुरणपोळीचा बेत आखला होता.बाळाचं नावं ठेवल्यावर पयली बायामाणसांची पंगत उठल्यावर दुसऱ्या पंगतीला बसायची संधी मिळाली. लांब मोठ्या बारदानाच्या किलतानावर लांबलचक पंगत बसली होती.पुढं भी पंगत आणि आमच्या माग भी पाठीलापाठ लावून दोन पंगती आण् त्याच्या पल्याड एक अशा सहा वळी हुत्या. फणसाच्या पानाची नुकतीच बनवल्याली इस्तारी (पत्रावळी) आणि द्रोण,तांब्याच्या तपेल्यात शिजवलेला भात,डाळीच्या पिठाची तर्रीबाज आमटी,लुसलुशीत पोळी आणि त्यावर तुपाची धार सोडलेली. आणि पुरणपोळ्या आणि गुळाचं लालकाळसर गुळवणी असा नामी बेत होता.मी ही अधुनमधून त्यांच्या सांगण्याला हुंकार देवून प्रतिसाद देत होतो.पुढं ते म्हणाले की,”पाचुंद्यावर (पुरणाच्या पाच पोळ्या) ताव मारल्या बिगर उठलो न्हाय. पातळसर आमटीचा फुरका मारत, पोळी गुळवणीत बुडवत खाल्ली. मऊशार आन गोडशार पोळीचा गोडवा काय सांगावा.एकदम मस्ताड बेत होता.सटकून चाटून पुसून खाल्लं बघा.लई दिसांनी असा बेत चाखायला मिळाला.जेवाण झाल्यावर पानविडा चघळत वळखीच्या पाहुण्यांशी गप्पा झोडल्या.आणि जशी जशी जेवणं उरकत होती.तशी तशी आलेल्या पाव्हण्यांचा, गावातल्या माणसांचा यजमान शाल शिरफळ देवून सत्कार करीत होते. मानंला गुंडाळलेली शाल दाखवत,हीच ती शाल, बघा गुरुजी”असं त्यांनी मला ठामपणे सांगितले. क्रमशः१