पंगत जेवणाची गंमत मेजवानीची
सवाष्णीची पंगत
त्यांचं बारशाच्या पंगतीतल्या जेवणाचे वर्णन ऐकताना माझं मन बहुविध पंगतीतल्या मेजवानीची खासियत कशी चवदार व स्वादिष्ट असते.त्या पंचपक्वन्नाच्या थाळीकडे आशाळभूतपणे डोकावत होते. खरोखरीच सुखदुःखाच्या अनेक धार्मिक,सार्वजनिक आणि सामाजिक कार्यांत कारणपरत्वे अनेक पंगती उठत असतात. यजमान(अन्नदाते) बल्लवाचार्याकडून खास पदार्थ व्यंजने बनवून घेतात.आणि आदरातिथ्याने वाढतात.आग्रह करून खिलावतात.जिभेवर रेंगाळलेल्या पंगतीतल्या खास पदार्थांची शाब्दिक मेजवानीची बरसात आपल्या साठी खास..
देवदेवतांच्या सवाष्णी घालण्याची गावच्या यात्रेनिमित्त,मुलामुलींच्या लग्नाच्या प्रित्यर्थ किंवा धार्मिकविधी प्रसंगी प्रथा आहे.खास सुग्रास पुरण पोळीचा बेत केलेला असतो. घरातील महिला मंडळ (आई,पत्नी,बहीण, आजी, काकी) सकाळी पहाटे उठून जेवण रांधत असतात.एकमेकिंना मदत करत सगळे पदार्थ मनापासुन बनवतात. त्याच पदार्थांची ही काव्यरचना..
तेलची पुरणपोळी कटाची आमटी
काळसर गुळवणी बटाट्याची भाजी
खमंग कांदाभजी,लिंबाची फोड ताटी
खरावडं कुरडई पापड मेथीची भाजी||
भाताची मुद त्यावर घट्टसर वरण
ते आग्रहाच्या अगत्याने वाढणं
पोळीवर लोणकढी तूपाची धार
गुळवणी संग मनसोक्त खाणं ||
आईच्या हातच्या चवीचं
कवतिक सारी करती
कटाची पिवळी आमटी
तोंडाने फुकून फुरकती ||
सवाष्णीची बसली पंगत
गरम पोळी येता ताटी
गुळवणीला पोळीचा घास
गोड वाणी करत खाती||
देवादिकांना नैवद्यम समर्पयामि करून पहिली निमंत्रित सवाष्णी स्त्रियांची पंगत सुरू होते. अगरबत्तीचा घमघमाट सुटलेला असतो.
पुरणपोळीच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद सवाष्णीच्या दिवशी घरच्या पंगतीत घेतला जातो.तदनंतर घरीच पानाच्या तबकातून पानविडा आपणच तयार करुन खायचा.त्यात पाहिजे तेवढी सुपारी,काय,बडीशेप टाकून पान चघळायचं.रम्य ते बालपण
क्रमशः भाग-२