पंगत जेवणाची गंमत – भाग ३

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची
लग्नातली पंगत
गावातल्या लग्नातल्या पंगतीत जेवणाची मजा तर काही औरच असते.ते ही लगीन चिठ्ठी आणि आमंत्रण नसतांना पोरसवदा वयात जाणं म्हणजे धमाल असायची. घरासमोर मांडव घातलेला असायचा.त्याच्याच एका बाजूला सावलीत नाहीतर जवळच्या छप्परात आचाऱ्याने जेवणासाठी भट्टी पेटवलेली असते.बॅरलमध्ये पाणी भरून ठेवललं असतं.दोस्तांबरोबर लग्नाला गेल्यावर लगीन लागण्याची वाट सगळी बघत असतात.लग्न लागल्यावरच पंगती बसणार असतात.आम्ही पोरं त्याचीच वाट बघत असतो.’तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव’ । असं कानी पडताच बॅण्डवाले वाजवतात आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू झालेली असते. याच गलबल्यात माणसं जेवायसाठी पंगतीला घाईगडबडीत बसतात.तरुण मंडळाची पोरं वाढपी असतात. माईकवरुन एक जाणकार बाप्पा मोठ्या आवाजात आरडत सूचना देत असतो.त्यापरमाणे सगळे वाढपी ऐकत असतात.गोंधळात जागा मिळवायला धावपळ करावी लागते.
मंडपातच पंगत बसलेली असते. वाऱ्याच्या झुळकीबरोबर मातीही व चगाळ चोथाही उडत असतो. स्पिकरवर उडत्या चालीची गाणी वाजत असतात.
पत्रावळी वाढणारी पोरं एकेक करत पळतच पत्रावळी टाकत टाकत जायची.त्याच्यामागे द्रोणवाला तर उभ्यानेच द्रोण टाकत सुटायचा. पत्रावळी मिळाल्यावर पाणीवाला एका हाताने चरवी धरुन दुसऱ्या हाताने पात्रावर पाणी शिंपडत जायचा.मग सगळी पंगतकरी पात्रावरील पाणी निथळायचे.एका ताटलीत मीठ घेऊन पोरसवदा वाढपी यायचा.तो हातानेच पत्रावळीवर त्याला वाटेल तिथे रिकाम्या जाग्याव चिमुटभर मीठ चिमटीने सोडायचा.भात आणि आमटी वाढणारा तर गडबडीत असायचा.घमेल्यातला भात तो हाताने मुटके केल्यासारखे बचाक भरुन वाढायचा.त्यामागे आमटीचा पन्हाळ घेऊन आमटीवाला पहिली द्रोणात ओतायचा अन् मागितली तरच भातावर धार सोडायचा. आमटी भातावर पडली की काहींची भात कालवायला सुरुवात व्हायची. अन् श्लोक कधी म्हणायचा याची वाट बघायला लागायची.तोवर द्रोणात नाहीतर वाटीत गंध घेऊन गंध लावणारा यायचा.तो अंगठा गंधात बुडवून कपाळावर नाम ओढायचा. एकदा गंधात बुडवलेल्या बोटाने चारपाच जणांची कपाळं भागायची.त्यातल्या पहिल्याच्या कपाळवरुन नाकावर गंधाचा ओघळ यायचा.काहींच्या तर ताटात एकदोन थेंब टिपकायचे.तोवर भाजीऽऽऽ भाजीऽऽ करत भाजीवाला बादलीची भाजी अन् वाढायला चमचा घेऊन यायचा.तो एकेक चमच्या भाजी वाढायचा.तवा भाजीचा चमचा पत्रावळीवर पालथा करायचा. त्यात बटाटा,हरभरे आणि वांग्याच्या फोडी असायच्या.त्यातला रस्सा कालवलेल्या भाताजवळ साठायचा. मग यायची कळी(बुंदी).ती वाढणारा वाढपी जाणकार.जेवणाराची शरीरयष्टी बघूनच ओंजळीने कळी ताटात वाढायचा.काहींना कमीजास्त करायचा.कमी वाढलं की आम्ही,’ओ दादा, जरा जास्त घाला की.’ असं म्हणायचो.मग तो त्वांड बघुन थोडीशीच पत्रावळीवर कळी सोडायचा.ती नेमकी भाजीच्या कुशीत शिरायची.तोवर द्रोणातली आमटी पात्रातून पाझरत उतार असेल तिकडे ओघळायची.खमंग वास दरवळायचा, जिन्नस बघून कधी एकदा ताव मारतोय असं व्हायचं पण पंगतीत सगळ्यांना वाढप झाल्याशिवाय व श्लोक म्हणल्या शिवाय उदरभरण करायला परवानगी नसायची.हळूच आपल्याकडे कोण बघत तर नाही ना?यांचा अंदाज घेऊन चार कळ्या तोंडात टाकून गुपचूप चघळायचो. तेवढ्यात एखाद्याने बघितलं की ते जोरानं खेकसायचे.अन् अचानक माईकवरुन श्लोक म्हणला जायचा..अन् पंगतकऱ्यांचे जेवण सुरू व्हायचे.पदार्थ घेऊन वाढपी ओळीने फिरायचे. काही जण हाक मारुन पाहिजे तो पदार्थ मागून घेऊन जेवणावर आडवा हात मारायचे.द्रोण तोंडाला लावून आमटी वरपायची. भातआमटी दणकून खायची.अन् ग्वॉड ग्वॉड शिरा नाहीतर कळ्या पोटास तडस लागे पर्यंत हादडायचा. आम्ही पोरं गप्पा मारत जेवणाचा भरभरून आस्वाद घ्यायचो. त्यावेळी कळ्या किंवा शिरा माणसं हमखास खायची.गावातल्या बागायतदार नाहीतर गाव कारभाऱ्याच्या घरातल्या लग्नात बुंदीच्या लाडूचा बेत असायचा.
पाचदहा मिनीटे झाली की प्लॅस्टिकच्या ग्लासातून पाणी मिळायचे.ते वरनं प्यावे लागायचे. चुकून तोंड लावून पाणी पिलं तर ग्लासात थोडं पाणी टाकून, तो खंगळायचा.अन् पुढं पाणी त्याच ग्लासाने वाढायचा.कारण दोनतीन ग्लासाने त्याला पंगतीत पाणी वाढायला लागायचे.पंगतीत घाई गडबडीत जेवण उरकावं लागायचं. सगळ्यांचीच धांदल उडायची.नेमकी लाईटही अधूनमधून ये-जा करायची. त्यामुळे वाढप्यांची तारांबळ व्हायची.तशाही वातावरणात आम्ही आमचं जेवण करत असायचो. पोट भरल्यावर पत्रावळीत खरकटे दिसू नये म्हणून ते द्रोणात भरुन द्रोण पत्रावळीत उलटा ठेवायचा. जेणेकरुन इतरांनी बोलू नये म्हणून असं करायचो.पण त्यावेळी बुंदी कळी माणसं आवडीने खायची.
अवीट गोडी साध्यासुध्या जेवणाची असायची.. हल्ली लग्न मंगल कार्यालय आणि बॅक्वेन्ट हॉल मध्ये आयोजित केली जातात. आपण फक्त रोखड द्यायची. सगळा इंतजाम केला जातो.लग्न मंगल कार्या ऐवजी इव्हेंट म्हणून साजरा करण्याकडे कल वाढत आहे.

 

क्रमशः भाग-३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *