उच्च विद्याविभूषित- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

उच्च विद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाबद्दल अनेक अनमोल विचार प्रकट केले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आपण या लेखात जाणून घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाबद्दल काय म्हणतात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, “व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय.”
उच्च विद्याविभूषित, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ असलेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक आघाडीचे जागतिक विचारवंत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाला दिले आणि शिक्षणामुळेच मनुष्य उत्कर्ष करू शकतो असे त्यांनी प्रतिपादित केले.
शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही, असे शिक्षणाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत उच्चशिक्षित आणि त्यांच्या काळातील ‘सर्वात शिक्षित व्यक्ती’ होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण त्यांनी भारत, अमेरिका, लंडन येथून शिक्षण पुर्ण केले, आणि अनेक उच्च अति उच्च पदव्या ग्रहण केल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे. डॉ. बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती, ते दररोज अठरा-अठरा तास अभ्यास करत. त्यांची शैक्षणिक योग्यता, विद्वत्ता आणि प्रतिभा एवढी व्यापक आणि अतिभव्य आहे की त्यांना ‘जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती’ तसेच ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज‘ म्हणून ओळखले जाते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य, महिला यांच्यासोबत सर्वच भारतीयांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील राहिले.शिक्षणवंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले.
त्यांचे विचार आपल्या रक्ता रक्तामध्ये भिडायचे असतील तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुढील विचार आत्मसाद करणे अतिशय गरजेचे आहे.
शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे.
आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे.
तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही.
शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री त्यांनी सांगितले. कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे. आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. मुला-मुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामांत गुंतवू नका.
माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू ‘बुद्ध‘ होत. माझे दुसरे गुरु ‘कबीर‘ आणि तिसरे गुरु म्हणजे ‘ज्योतिबा फुले‘ होत… माझी तीन उपास्य दैवतेही आहेत.
पहिले दैवत ‘विद्या’, दुसरे दैवत ‘स्वाभिमान’, आणि तिसरे दैवत म्हणजे ‘शील’ होय.
प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, सर्वांगिक राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे…म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा. या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. (लक्षात ठेवा), जे झगडतात तेच पुढे येतात.
स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त रहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान व खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत, तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा, प्रगती करण्याकरिता केला पाहिजे; तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.
स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. ग्रंथ हेच गुरू.वाचाल तर वाचाल. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल. शिका! संघटीत व्हा! आणि संघर्ष करा!
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
लोकांना नैतिक आणि सामाजिक बनवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो. प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्त्वांवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. वेळ आली तर उपाशी रहा पण आपल्या मुलां-बाळांना शिक्षण द्या.
मुलांना शाळेत पाठवणे एवढेच पुरेसे नाही, तर त्यांना मूलभूत शिक्षण मिळेपर्यंत शाळेशी जोडून ठेवणेही आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे जसे झाडे लावणे एवढेच पुरेसे नाही, तर त्या झाडांना खत, पाणी देऊन सिंचन करणेही आवश्यक आहे, अन्यथा ते मरायला वेळ लागणार नाही.“शिक्षण हे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देते आणि त्याच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते.” लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. वास्तविक शिक्षण आपल्याला घाबरवण्याऐवजी तर्कशुद्ध बनवेल.
जे माणसाला लायक बनवत नाही, समता आणि नैतिकता शिकवत नाही, ते खरे शिक्षण नाही. खरे शिक्षण हे समाजातील मानवतेचे रक्षण करते, उपजीविकेचा आधार बनते, माणसाला ज्ञानाचा आणि समतेचा धडा शिकवते. खरे शिक्षण समाजात जीवन निर्माण करते.
माझे सर्व आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे अशी माझी इच्छा होती.
शिक्षण हीच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्त्वाची बाब होय. विद्यार्थी दशेत ज्ञानर्जन चालू असता त्यांनी आपल्यापुढे निरंतर ‘ज्ञानर्जन’ हे एकच ध्येय ठेवावे.
विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यांस आवश्यक आहे. शील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही.
ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत; त्या स्त्रियांसाठीही आवश्यक आहेत.
शिक्षणाशिवाय आपल्याला मोक्याच्या जागा काबीज करता येणार नाही. ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा,’ हेच माझे तरुण विद्यार्थ्यांना सांगणे आहे.
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल.शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही.
व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय.
सर्व भारतीय महिलांचे उद्धारकर्त बाबासाहेबच आहे. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा नेता बाबासाहेबच आहे. कामगार वर्गाचे उद्धारक, शेतकरी, शेतमजुरांचे उद्धारक कर्मचाऱ्यांना घटनेत त्यांनी आरक्षण दिले.
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारतीयांना घटनेच्या माध्यमातून सर्व हक्क अधिकार दिले.
भारताची अर्थव्यवस्था मजबूत व सुदृढ व्हावी म्हणून भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केली व अखंड भारत राहावा म्हणून त्यांनी सर्व भारतीयांना एक सूत्रात बांधून ठेवले.
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मिळवून दिला. मानवाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी प्राण पणाला लावले.
अश्या ह्या देशभक्त राष्ट्र निर्माण कर्त्यांचा उल्लेख हक्कासाठी, न्यायासाठी आणि फक्त भाषणांची मैदाने गाजवण्यासाठी न करता. त्यांची शिकवण अंगिकारली पाहिजे यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ ही मोहीम हाती घेतली पाहिजे. तेव्हा कुठे खर्या अर्थाने त्यांच्या कार्याला मानवंदना अर्पण होईल.
विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व प्रज्ञासूर्य महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते .

 

 सौ .रूचिरा बेटकर, नांदेड.

9970774211

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *