बहुजनांचे उद्धारकर्ते,समाजक्रांतीकारक विश्वरत्न, डाॅ बाबासाहेब आंबेडकर!

शेकडो वर्षापासून मानवी अधिकार नाकारलेल्या समस्त बहुजन समाजाला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक गुलामगिरीची साखळदंड तोडून माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे शोषित, वंचितांचे उद्धारकर्ते विश्वरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे.
सुभेदार रामजी आंबेडकर आणि भीमाबाई आंबेडकर यांच्यासारख्या सुसंस्कृत, कर्तृत्ववान माता-पित्याच्या पोटी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी लष्करी छावणीत झाला.भीमाबाईचा मुलगा म्हणून त्यांचे नाव ‘भीम’ ठेवलेले होते. लहानपणी त्यांना भिवा नावानेच ओळखले जात असे भिवाचाच पुढे भीमराव झाला. भिवाच्या आधी भीमाबाईंना तेरा अपत्ये होती. भिवा हे त्यांचे चौदावे अपत्ये एका अर्थाने त्यांच्या उदरी १४ वे रत्नच जन्माला आले होते.भीमराव जेमतेम तीन वर्षांचे असताना रामजी लष्कराच्या नोकरीतून निवृत्त झाले.त्यावेळी लष्करातील बरीच निवृत्त मंडळी दापोलीच्या कॅम्पात राहत होती मुलांच्या शिक्षणाची देखील तिथे चांगली सोय होती.
लहानग्या भीमरावांना दापोलीच्या प्राथमिक शाळेत रामजींनी घातले.थोरला भाऊ आनंदराव हा देखील तेथेच शिकत होता. परंतु रामजींना फार दिवस दापोलीत राहता आले नाही. लष्करातील निवृत्तीनंतर त्यांना सातारा येथील सरकारी खात्यात नोकरी मिळाली होती रामजींनी आपले बिर्हाड मग दापोलीहुन सातरयास हलविले. आनंदराव आणि भीमराव सातरयातील लष्कराच्या छावणीतील शाळेत जाऊ लागले.रामजी सुभेदारांच्या जीवनात सगळं कसं चांगलं चालत असताना काळाने त्यांच्या सुखी संसारावर झडप घातली त्यांची पत्नी भीमाबाई यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे भीमरावांचे ‘मातृछत्र’ हरपले. पत्नीच्या अशा अकस्मात निधनाने रामजीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला,त्यांचा संसार विस्कटला मुलांकडे कोण पाहणार याची त्यांना काळजी लागली.भीमरावांची आत्या मीराबाई एकट्याच होत्या त्यांनी आपल्या भावचा उघडा संसार सावरला होता. त्यांच्या शिस्तीत आणि धाकात मुलांची वाढ झाली. त्यांचा भिमावर फार-फार जीव होता.
आनंदराव आणि भीमराव सातारच्या शाळेत शिकत असताना त्यांना अस्पृश्यतेची झळ पोचलीच होती खरं तर अगदी लहानपणापासूनच भीमाच्या मनावर चटके बसलेले होतेच.एकदा आईबरोबर तो बाजारात गेला होता. कापडाच्या दुकानात आई कापड घेण्यासाठी भिमाला घेऊन गेली होती. त्यावेळी त्यांनी पाहीले की कापडवाला दुकानदार आई पुढे कापड लांबुनच टाकत होता. तिचा विटाळ होणार नाही याची काळजी घेत होता. दुसरया गिर्हाईकाशी मात्र तो तसा वागत नव्हता. छोट्या भिमाला ही गोष्ट मात्र त्याचवेळी खटकलेली होती. या बद्दल तो आपल्या आईला विचारत होता दुकानदार असं का करतोय परंतु आईच्या उत्तराने काही त्याचे समाधान झाले नाही.शाळेतही त्यांना इतर मुलांपासून वेगळे बसावे लागत होते. गुरूजी वह्या पुस्तके देता-घेताना त्यांच्यापुढे दुरूनच टाकत असत,तहान लागली तर हाताची ओंजळ करूनच पाणी प्यावे लागत असे. त्याचा शिंतोडा देखील उडता कामा नये,नाहीतर विटाळ व्हायचा!
असे अस्पृश्यतेचे चटके भीमाच्या बालमनावर होत असताना कुठतरी मायेचा, जिव्हाळाचा, हळुवार स्पर्शही अनुभवायला मिळायचा अशी माया केली आंबेडकर आणि पेंडसे गुरूजींनी एकदा भीमा पावसात भिजला असताना आंघोळीला घरी गरम पाणी देवून कोरडी लंगोटी दिली. आंबेडकर गुरूजींनी तर एकदा आपल्या डब्यातील भाजी-भाकरी त्याला खायला दिली भीमाचे नाव आंबावडेकर बदलवून ‘आंबेडकर’ केले.पेंडसे व आंबेडकर गुरूजींचे प्रेम भीमराव कधीही विसरला नाही.अशा प्रकारे त्यांचे नाव ‘भीमराव रामजी आंबेडकर ‘ झाले.
रामजी सुभेदार रोज भीमाकडुन अभ्यास करून घेत.तर्खडकरांची भाषांतर-पाठमाला सारी अभ्यासून झाली होती. प्रत्येक परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळायचे.भीमराव शाळेच्या अभ्यासाव्यतिरीक्त इतरही पुस्तके वाचायचे भीमराव १४ वर्षांचे असताना त्यांचा विवाह दापोलीचे श्री.वलंगकर यांची ९ वर्षाची कन्या रमाबाई यांच्या सोबत झाला.बाबासाहेब सन १९०७ साली मॅट्रीक उत्तीर्ण झाले.मुंबई एल्फिन्स्टन महाविद्यालयात भीमरावांना १९०८ साली प्रवेश मिळाला. येतपर्यंत रामजी सुभेदारांनी खर्चाच्या बाबतीत मजल मारली होती. पण यापुढे भीमरावाच्या शिक्षणाचा खर्च पेलण्याची ताकद नव्हती. तशात त्यांचं लग्न झालेलं सर नारायणराव चंदावरकर यांच्या मदतीने शिक्षणाप्रती तळमळ असणारे बडोद्या संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची भेट झाली. त्यांच्याकडून दरमहा २५ रूपये शिष्यवृती मंजूर झाली आणि पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.सन १९१२ साली भीमराव बी.ए.ची परीक्षा पास झाले.भीमराव जुलै महिन्याच्या १९१३ साली न्यूयॉर्कला पोहचले. तेथे कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला.पुढे त्यांनी सन १९१५ साली एम.ए.ची पदवी पटकावली .कोलंबिया विद्यापीठाने ‘डाॅक्टर आॅफ फिलाॅसाफी ‘पदवी दिली.
३१ जानेवारी १९२० रोजी राजर्षी शाहु महाराज यांच्या अर्थ सहाय्याने ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू केले. त्यातुन हिंदुस्थान हा देश विषमतेचे माहेर घर आहे.बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी आकाश पाताळ एक केले पाहिजे. त्यांच्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालुन त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून दिली पाहीजे अशी भुमिका मांडली.सन १९२४ साली लंडन विद्यापीठात ‘द फ्राॅब्लम आॅफ द रूपी’ हा व्यासंगपूर्ण प्रबंध सादर करून बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली.
मागासलेल्या वर्गाच्या अडीअडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ नावाची संस्था स्थापन केली. मागासलेल्या समाजात शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांच्यासाठी वाचनालय,शिक्षणवर्ग उघडणे, उद्योगधंद्याच्या शेतकी शाळा उघडणे हे या सभेचे ध्येय होते. बाबासाहेबांनी शहरात व खेड्यात या संस्थेच्या वतीने सभा घेऊन अस्पृश्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला.बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ साली महाड येथील अस्पृश्याना पाणी पिण्यासाठी मज्जाव असलेल्या चवदार तळ्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह करून सामाजिक क्रांती केली.
भारतीय राज्य घटनेच्या निर्मितीमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा असुन ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू हिरयासमान तेजस्वी होते.भारत देशाच्या इतिहासात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव शिक्षणतज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,ग्रंथकार,प्राध्यापक,कायदेपंडीत,देशभक्त,बहुजनांचा उद्धारकर्ता,दलितांचाकैवारी,समाजक्रांतीकारक असे सर्वविख्यात आहे.
अशा या महान विश्वरत्न महामानवास कोटी कोटी विनम्र अभिवादन

रमेश पवार
(लेखक,व्याख्याते)
बहीशाल शिक्षण केंद्र- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.
(मो. ७५८८४२६५२१)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *