डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनच एक वैचारिक परिवर्तनवादी विचारधारा आहे. कधीही न मरणारी कधी न कुजणारी अनंत काळापर्यंत टिकणारी जोपर्यंत या जगात माणसे जिवंत आहेत आणि शोषक आणि शोषित आहेत तो पर्यंत मानवी समूहाला मानवी मूल्य प्रदान करणारी विचारधारा म्हणजे डॉ. बाबासाहेब.
खरेतर, माणूस म्हणजे काय? तर पृथ्वीतलावरील अंतिम आणि वास्तव सत्य म्हणजे माणूस. ज्यांच्यामध्ये निर्मितीची प्रक्रिया सारखी असते. तो निर्मितीक्षम असतो आणि मुळातच जगाची जडण-घडण माणूसच करतो. त्या माणसांच्या निर्मितीचा इतिहास हा निसर्गदत्त आहे. माणसांचे किंबहुना मानवी समूहाचे निसर्गाने कधीच विभाजन केलेले नाही. नव्हे तर मानवी समूह कधीच नैसर्गिक विभागला गेलेला नाही. माणसाच्या निर्मितीपासूनच तो अविभाज्य असा होता. असे असतानाही मात्र, भारतात बुद्धाच्या 400 वर्षाच्या नंतर मनुस्मृतीच्या कालखंडात अख्खा माणूसच विभागला गेलेला आहे. वैज्ञानिक दृष्ट्या मानवी समूह निसर्गनिर्मित जन्मता सारखेच आहेत. हे जीवशास्त्रीय वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केलेले आहे. म्हणून
1, माणसांचे वंशज एकचं ( Human beings ( We) borne by same anchester)
2, माणसांचे गुणसूत्र एकचं ( We borne by same gene.)
3, माणसांचे रंगू सुत्र सारखेचं ( We are borne by same Chromosome.)
4, माणसांच्या रंग सूत्राची संख्या सारखीचं. ( We are borne by same number of chromosomes.)
5, माणसांच्या अवयवाचे नावे , ठिकाण, संख्या आणि उपयोग सारखाचं ( Organs of human beings and their structure, place, number and function are similars.)
6, मानवी रक्ताचा रंग आणि गट हे ही सारखेचं (Colour number of blood groups are similar whith group “A”, group “B”, group “AB” and group “O” only ) ते अनुवंशिक असतात.
7, आमची जन्मभूमी ही सारखीच.
8, मानवाच्या जन्मावर नि जातीवर, रक्तगट, गुणसूत्र आणि रंगसूत्र अधिष्ठित नाहीत. ते अनुवंशिक असतात.
9, आमचे जन्मस्थळही सारखेच.
10, आमच्या जन्म प्रक्रियाही सारखीच.
11, आमची जन्मदात्री आईच.
हा मानवातील सारखेपणा निसर्गाने निर्माण केलेला असतानाही, भारतात मात्र जातीचे मानवी कप्पे कोणी निर्माण केले? निसर्गदत्त मानवांचे विभाजन कोणी केले? का केले? असे अनेक प्रश्न पारंपारिक व्यवस्थेशी अर्थात मनुवादी व्यवस्थेशी किंबहुना भट- ब्राह्मण, पुरोहितांच्या व्यवस्थेशी एकत्रितपणे संदर्भित होतात. अधीनकालापासून मानवाच्या अपरिपक्व बुद्धीवर प्रिंट झालेली कातडी सारखी जात, आम्ही कातडी पेक्षाही अधिक स्वतःला चिटकून घेतलेली आहे. जातीला आम्ही सर्व मानवी समूह गोंजारीतच जगतो आहोत. माणूस भेदाचे मूळ असणारी जात आम्ही सर्वस्वाने नाकारत नाही नव्हेतर इतर मानवी समूहांना जातीय, धर्मीय आणि पंथिय अभिनिवेशातून पाहतो मात्र माणूस म्हणून त्या माणसांच्याकडे पाहत नाही. परिणामी जात प्रवर्गाचे दृढीकरण होत जाते. त्यातूनच माणूस अधिक गर्विष्ठ, अधिक संकुचित, अंकुचित नि जातीय आवर्तात कायमस्वरूपी अडकलेला राहातो परिणामी निसर्गदत्त एकसंघ असणाऱ्या माणसांच्यात मनुस्मृति, देव -धर्म, कर्मकांड आणि जात-पंथाच्या अभिनिवेशातून जात -वर्ग, जातप्रवृत्ती, जात अभिमान परिणामी माणूस विभिन्न जातीच्या तुकड्या-तुकड्यात विभागला गेलेला असतो. हे सर्व नैसर्गिक नसताना मात्र जात, धर्म, देव नि इतर कर्मकांड ही मानवकृत असताना मात्र देवकृत असल्याचे खोटे, मानवी मेंदूवर एकदा नव्हे तर अनेकदा जात- वर्गीय व्यवस्थेने प्रिंट केलेले आहे. म्हणूनच नैसर्गिक एकसंघ असणारा माणूस जाती-जातीमध्ये विभागलेला आहे आणि हीचं माणूस भेदाची नीती आणि प्रवृत्ती अखंड मानवी समूहाला जातीय भिंतीच्या विभाजनामुळेचं जाती प्रबळ झाल्या. माणसात वीसंवाद निर्माण झाला. खरे तर, निसर्गदत्त माणसांच्या जाती नसतातच, त्यांच्यात लिंग भेद असतो. जाती ह्या जनावरांच्या मध्ये असतात, वनस्पतींच्या झाडा -झुडपांच्यामध्ये असतात. म्हणून मानवकृत निर्माण झालेल्या माणूस भेदाच्या कूटनीतीतुन नैसर्गिक अखंड माणूस, एकजिनसी माणूस सुटा- सुटा झालेला आपण रोजच पाहतो म्हणून डॉ. बाबासाहेब आणि त्यांच्या चळवळीच्या मुळा ह्या जातीय उच्चाटनाच्या कृती कार्यक्रमात रुजलेल्या आहेत. माणसांना एकसंघ नि एकजींशी करणे यासाठीच बाबासाहेबांची समग्र आयुष्यातील कृती क्रांतिकारी ठरते.
डॉ. बाबासाहेबांची प्रत्येक हालचाल, श्वास नि प्रत्येक कृती ही जाती-अंतासाठी होती. ज्यातून जातीच्या भिंती उध्वस्त होऊन एक सर्वमान्य समाज निर्माण होणे अर्थात एकजिनसी समाज निर्मिती करण्याच्यासाठीच बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या माणसासाठी कष्ट उपसले आहेत. त्यासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा कृती आणि वैचारिक तत्त्वज्ञानाचा कार्यक्रम आखलेला होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या अखंडत्वासाठी, निकोप लोकशाहीसाठी, भयमुक्त समाज निर्माणीसाठी आणि दर्जाची आणि संधीची समानता प्रदान करण्यासाठी त्यातून निकोप एकसंघ भारताच्या निर्मितीसाठी सामान्य, उपेक्षित, बहिष्कृत माणूस केंद्री चळवळी मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या चिरंतन तत्त्वज्ञानातून निर्माण केल्या . भारतात जात-धर्म-पंथ विरहित एकजिनशी समाज निर्माणसाठी अभूतपूर्व केलेले कार्य….
1. 1917 ला भारतातील लहान शेतकरी आणि त्यावरती उपाय योजना अर्थात Small holdings in India and their remedies )
2. 1919 ला South Bureau Commission समोर साक्ष.
3. 1920 ला आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक मुंबई येथे सुरू करून, मुक्या अस्पृश्य समाजाला बोलते केले.
4. 1920 ला माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद संपन्न. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज हे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शन.
5. 1920 ला छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय बहिष्कृत वर्गाची परिषद संपन्न. त्यात बाबासाहेबांचे मार्गदर्शन.
6. 1923 ला भारतीय रुपयाचा प्रश्न ( प्रॉब्लेम ऑफ रुपी ) या ग्रंथाचे प्रकाशन आणि अर्थशास्त्रीय विवेचन.
7. 1923 ला जागृतीसाठी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरु केले नि मानवी अस्तित्वाची ओळख करून दिली.
8. 1926 ला रॉयल कमिशनसमोर साक्ष.
9. 1927 ला महाडचा सत्याग्रह नि मार्गदर्शन.
10. 1927 ला कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे आयोजन आणि मार्गदर्शन.
11. 1828 ला मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि मानव मुक्तीच्या चळवळीला दिशा.
12. साली चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष नि मार्गदर्शन.
13. 1929 साली पातुर्डा वऱ्हाड येथे सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधकी विवाहास उपस्थित आणि मार्गदर्शन.
14. 1930 ला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि स्पृश्य- अस्पृश्य यांना मार्गदर्शन
15. 1930 साली पुणे जिल्हा अस्पृश्य परिषदेचे नारायणगाव येथे आयोजन आणि बाबासाहेबांचे मार्गदर्शन.
16. 1931 ला गोलमेज परिषदेला मार्गदर्शन.
17. 1932 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग आणि अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढा
18. 1933 ला तिसऱ्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहभाग आणि अस्पृश्यांच्या हक्कासाठीचा लढा
19. 1936 ला मुंबई येथे देवदाशी, वाघ्या- मुरळी इत्यादीच्या मेळाव्यात मार्गदर्शन.
20. 1936 ला मुंबई येथील महार परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वाचे भाषण.
21. 1936 ला कल्याण येथे महार -मांग -चांभार परिषदेला मार्गदर्शन.
22. 1936 साली (Annihilation of cast ) या ग्रंथाचे प्रकाशन. जात विरहित समाज निर्मितीचे स्वप्न.
23. 1938 ला सातारा नाशिक जिल्ह्यातील आणि कोकणातील शेतकर्यांचा असेम्ब्ली हॉलवर मोर्चा. त्या मोर्चास मार्गदर्शन.
24. 1938 चिपळूण येथे शेतकरी परिषदेत मार्गदर्शन.
25. 1939 साली, फलटण येथे अस्पृश्यांच्या सभेत मार्गदर्शन.
26. 1938 ला शेतकरी व कामगार मेळाव्याला मार्गदर्शन.
27. 1939 ला समता सैनिक दलाच्या मेळाव्यात मार्गदर्शन.
28. 1939 ला Federation verus freedom. हा ग्रंथ प्रकाशित आणि विवेचन.
29. 1940 ला Thoughts on पाकिस्तान ( दुसरी आवृत्ती ) प्रकाशित केली.
30. 1941 ला कसबे तडवळे (ढोकी) येथे महार -मांग वतनदार परिषदेत मार्गदर्शन.
31. 1943 ला रानडे -गांधी आणि जीना हे ग्रंथ प्रकाशित. वास्तववादी मांडणी.
32. 1945 ला पर्टिशन ऑफ इंडिया. या ग्रंथाचे प्रकाशन आणि तंत्रशुद्ध विवेचन.
33. 1945 ला कानपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाला बाबासाहेबांचे मार्गदर्शन.
34. 1945 ला What Congress and Gandhi have done to the unteachables हा ग्रंथ प्रकाशित. आणि मूलगामी विवेचन
35. 1945 ला मुंबई येथे Peoples Education Society ची स्थापना. शिक्षणच हे मुक्तीचा मार्ग.
36. 1945 ला बॉम्बे मुन्सिपल कामगार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेबांची निवड. आणि मार्गदर्शन
37. 1948 ला The untouchables . या ग्रंथाचे प्रकाशन. आणि सैदांतिक विवेचन
38. 1949 ला महाड येथे शेतकरी परिषद आणि मार्गदर्शन
39. 1936 ला चौथ्या मातंग समाज परिषदेला दिशादर्शन.
40. 2938 ला स्वतंत्र मातंग परिषदेला मार्गदर्शन.
41. स्वतंत्र महार परिषदेला दिशादर्शन
42. 43, संयुक्त महार-मांग परिषदेला मार्गदर्शन.
43. संयुक्त मांग -महार -चांभार परिषदेला मार्गदर्शन.
वरील संदर्भीय ऐतिहासिकृतीचा चिंतनात्मक विचार करता, डॉ.बाबासाहेबाची चळवळ ही एक जाती नव्हतीस तर ती सर्वभौम मानवी स्वतंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ होती म्हणूनच त्यांनी शेतकरी- कामगार हा देशाचा पोशिंदा. त्या शेतकरी- कामगाराच्या मूळ प्रश्नांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी सोडवणूक केली. इतकेच नव्हे तर भारतीय देव-धर्म – पुरोहिताने निर्माण केलेली कर्मकांड नि त्यातून समाजात निर्माण झालेली उच्चनीचता, अंधश्रद्धा व पारंपारिक अनिष्ठप्रस्थाच्या उच्चाटनासाठी ही बाबासाहेब मागे राहिले नाहीत. सर्वांगीण परिवर्तन म्हणजे जातिअंत हेच अंतिम सत्य मानून त्यांनी आयुष्यभर भारतीय माणसासाठी पारंपारिक व्यवस्थेच्या विरोधात तर कधी इंग्रजा विरोधात संघर्ष केला. याची साक्षी म्हणजे 1919 सालच्या South buro Commission समोरील साक्ष होय.
अशा अनेक कृती कार्यक्रमातून आणि अस्पृश्या अंतर्गत विविध जातीच्या वेगवेगळ्या परिषदेतून बाबासाहेबांनी जाती-अंताचा लढा उभारलेला होता. सर्वसामान्य माणूसासहित सर्वहारा माणसांना De cast करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यातील प्रत्येक चळवळीच्या महामार्गावर अस्पृश्य समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्याला जनजागरण नि मार्गदर्शन करून लढविला. हे इतिहास मान्य आहेच.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला महाडचा सत्याग्रह हा ऐतिहासिक निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यासाठी जगातील अभूतपूर्व सत्याग्रह. निसर्गदत्त निर्मितीवर हक्क सांगण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला . मुळातच महाडच्या चवदार तळ्यातील पाणी स्वतः पिऊन आणि अस्पृश्य माणसांना पाजून जन्मोजन्माची तहान बाबासाहेबांना भागवायची नव्हती. तर अस्पृश्य माणसांना त्यांच्या स्वत्वाची आणि आत्मसन्मानाची ओळख करून द्यायची होती. म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह. पशु -पक्षी, जीवजंतू, कीटकांना मुक्त संचारासाठी चवदार तळे खुले होते पण हाडामासाच्या जिवंत अस्पृश्य माणसांना कायमची बंदी हा पारंपारिक मानव मुक्तीचा लढा हा महाडच्या सत्याग्रहाचा मूळ गाभा होता. त्या पाठीमागची मूळ भूमिका समजून घेणे आवश्यक वाटते. या सत्याग्रहाच्या पूर्वतयारीसाठी बाबासाहेबांनी अनेक मीटिंग, सभा-संमेलने, चर्चा घडवून आणलेल्या आहेत. त्याही शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत अनेक जाती- पंथाचे शेकडो कार्यकर्ते होते. परिवर्तनवादी कार्यकर्ते होते त्यांच्यासमवेत बाबासाहेबांच्या विचारधारेला मनोमन स्वीकारणारे काही ब्राह्मणही कार्यकर्ते होते. त्याच बरोबर आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेले कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर कॉम्रेड बी. आर. मोरे, हे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेले सत्याग्रहमध्ये सहभागी झालेले होते. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या निमित्ताने नैसर्गिक साधन संपत्ती, त्या साधनसंपत्तीच्या उपभोगाचा नैसर्गिक हक्क मानवी समूहाला निसर्गदत्त प्रधान झालेला असतानाही , मनुवादी समाज रचनेनी आणि त्यांच्या बटीकानी, मानवी समूहाचे निसर्गदत्त हक्क हिरावून घेतले. हे पारंपरिक, हजारो वर्षापासून अर्थात बुद्ध कालखंडाच्या चारशे वर्षानंतर निर्माण झालेल्या मनुस्मृतीच्या शासन व्यवस्थेपासून ते आजतागायत, तीच मनुस्मृतीची मानसिक उतरंड कायम आहे. या अनुषंगाने बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या लढ्याचा अन्वयार्थ नीट समजून घेणे हे आज तरी नक्कीच आवश्यक आहे. महाडचा सत्याग्रह हा क्रांती लढ्याचा पाया हा, ज्यांचे ज्यांचे माणूसपण या व्यवस्थेने हिरावून घेतलेले आहेत. त्या त्या माणसांना त्यांचे माणूसपण बहाल करणे होय. माणूसपण नाकारले गेलेल्या आणि पशूपेक्षाही हीन समजल्या गेलेल्या मानवी समूहाला तुम्ही माणसे आहात, तुम्ही इतर माणसासारखेच माणसे आहात, तुमचे इंद्रिये आणि इतरांची इंद्रिये आणि शरीरातील प्रक्रिया ह्या सारख्याच असतानाही माणूसपण नाकारल्याच्या मानसिकतेत जगणाऱ्या ह्या अस्पृश्य मानवी समूहाला तुमच्या स्पर्शाने पृथ्वीतलावरील कोणतेही जैविक अथवा अजैविक घटक, नासत नाहीत, त्यांचे विघटन होत नाही, त्या नष्ट पावत नाहीत, त्या विंटाळल्या जात नाहीत. तुम्ही स्पर्शलेल्या पृथ्वीतलावरील कुठल्याही वस्तुत कुठलाच नैसर्गिक बदल घडून येत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांना महाडच्या सत्याग्रहाच्या अंतर्गत वास्तव नि वस्तुनिष्ठ उघडे-नागडे सत्य अस्पृश्य मानवी समाजाला सूर्या इतके स्पष्ट दाखवायचे होते आणि तुम्ही माणसं आहात हे त्यांच्याप्रती प्रात्यक्षिकातून सिद्ध करायचे होते. उलटपक्षी येथील प्रस्थापित परंपरावाद्यांना या सत्याग्रहाच्या माध्यमातून अवगतही करायचे होते की, जो मानवी समूह आहे त्या माणसांना तुम्ही विषमतावादी व्यवस्थेचे वाहक सुवर्ण मंडळी, अस्पृश्य म्हणून त्यांना पशूपेक्षाही हीन वागणूक देता. ती हाडामासाची जिवंत माणसे आहेत. त्या माणसांनाही तुमच्यासारखेचं मन, इच्छा – आकांक्षा, भाव-भावना आहेत आणि त्यांना माणूस म्हणून माणूसपणाची वागणूक प्रधान करणे, तुम्ही माणूस म्हणून तुमचे कर्तव्य आहे. त्यांच्या स्पर्शाने आणि सहवासातून कुठलीच नैसर्गिक प्रक्रिया कधीच खंडित -अखंडित होत नाही. नव्हेतर, विटाळ किंवा बाट हा भाग तुमच्या पारंपारिक मनोवृत्तीचा आहे. अस्पृश्यांनी जर निसर्गदत्त निर्माण झालेल्या पाण्याला स्पर्श केला तर ते पाणी काळे, निळे, पिवळे किंबहुना लाल, हिरवे होत नाही. त्यांचा रंगही बदलत नाही नव्हे तर पाणी दूषितही होत नाही, नासत नाही, कुजत नाही, सडत नाही. हे या प्रात्यक्षिकातून, बाबासाहेबांना येथील पारंपरिकवाद्यांना निक्सून सांगायचे होते आणि ते वस्तुनिष्ठ – वास्तव होते, प्रत्यक्षपणे येथील पारंपरिक सुवर्ण हिंदू आणि अस्पृश्य या दोन्ही मानवी समूहाला, अस्पृश्याच्या स्पर्शाने निसर्गाने निर्माण केलेली कोणत्याही निसर्गदत वस्तू दूषित होत नसतात, अगदी त्याच पद्धतीने पाणीसुद्धा अस्पृश्यांच्या स्पर्शाने दूषित होत नाही नि कधीच होणार नाही. हे स्पष्ट विज्ञाननिष्ठतेतुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी महाडचा सत्याग्रह या क्रांती आंदोलनाच्या लढ्यातून सिद्ध केलेले आहे. आणि येथील दलीत- अस्पृश्य माणसांना तुम्हाला, निसर्गानं दिलेल्या पाण्याला सुद्धा स्पर्श करता येत नाही, तुम्ही माणूस आहात. तुम्ही माणूस म्हणून सिद्ध करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. वेळप्रसंगी रक्तलंछित व्हावं लागेल. तुम्ही माणूस म्हणून इतर माणसासारखेच जन्माला आलेले आहात, तेव्हा तुम्ही स्वाभिमान- आत्मसन्मानाने जगा. येथील प्रस्थापित परंपरावादी व्यवस्था तुम्हाला माणूस म्हणून जगू देणार नाही, म्हणून तुम्हाला संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय माणूस म्हणून तुमचा आत्मसन्मान परत मिळणार नाही. हे वस्तुनिष्ठपणे आणि प्रत्यक्षातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण स्पृश्य आणि अस्पृश्य यांनाही या लढाईच्या माध्यमातून उघड केले होते. उलटपक्षी येथील सुवर्ण हिंदुनाही या लढ्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सूचित केले की, बाबांनो ही अस्पृश्य माणसं आहेत, ते अगदी तुमच्यासारखेच , त्यांच्या स्पर्शाने आणि सहवासाने निसर्गातील कुठलाही घटक दूषित होत नाही, नष्ट होत नाही , सडतही नाही, नासत नाही, कुजत नाही आणि मरतही नाही. म्हणून त्या हजारो वर्षापासून पशूपेक्षाही हीन म्हणून जगणाऱ्या मानवी समूहाला तुमच्यासारखीच मानवी भाव -भावना, इच्छा असणारा तो मानवी समूह म्हणून बंधू -भावा सारखे वागावे. ती माणस आहेत. त्यांना माणूस समजून घ्यावे नि त्यांच्याशी माणसासारखा व्यवहार करावा. आणि त्यांना माणूस म्हणून समाजाने स्वीकारावे. हा अंतरीचा आणि माणुसकीचा सल्ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांती संदेशातून दिलेला आहे. हेही विसरून चालणार नाही.
महाडचा सत्याग्रह हा क्रांतिकारी लढा हा फक्त अस्पृश्यांच्या हक्क- अधिकाराचा नि सहभागाचाही लढा नव्हता तर समग्र माणूस नि यांचे स्वातंत्र्य, हक्क- अधिकार नि आत्मसन्मानाचा सर्वव्यापी लढा होता नव्हे तर माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करून घेण्यासाठीचा क्रांतिकारक लढा होता. या अन्वयार्थीने हा लढा समजून घेण्याची नितांत गरज आहे.
अगदी त्याच वैज्ञानिक दृष्टीतून आयोजित नियोजित केलेला 1930 चा नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. या सत्याग्रहाच्या पाठीमागची मूळ भूमीकाही समजून घेण्याची आवश्यकता वाटते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कळ्या रामाचे दर्शन घेऊन कोणते नवस बोलायचे नव्हते किंवा पुण्य पदरात टाकून घ्यायचे नव्हते. मुळातच बाबासाहेब कर्मकांडाच्या नव्हे तर भारतीय धर्मनिर्मितीच्याच विरोधात होते. काळाराम मंदिराच्या दर्शनाने अस्पृश्य समाज स्पृश्य होणार नव्हता. त्यांचा जन्मोजन्माचा उद्धारही होणार नव्हता पण या काळाराम मंदिर प्रेवेशाने अस्पृश्य हा माणूस आहे, ही ओळख ओळख जगाला होणार होती इतकेच नव्हेतर अस्पृश्यांना त्यांची माणूस पण बहाल करायचे होते, आम्हीही माणसेच हे आहोत हे सिद्ध करायची होते, म्हणूनच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
खरेतर, भारत देश हा जाती, देव-धर्म, पंथाने पोखरलेला भारत देश हा देव- धर्माचा वेडा देश म्हणून जगभरात भारत देशाची ओळख आहे. भारतात स्पृश्य-अस्पृश्य या मानवी समूहात देव-धर्म आणि जाती संबंधात भारतीय माणूस अधिक संवेदनक्षमआहे. म्हणून इंग्रजांनी या देशात आल्यानंतर या भारत देशावर राज्य करायचा असेल तर येथील देव – धर्मावर, स्त्री आणि त्यांच्यातील जाती-पंथ यावर टीकाटिप्पणी करायची नाही. हे ठरवूनच, इंग्रजांनी भारत देशात शेकडो वर्षे राज्य केले म्हणून जात- देव -धर्मा- कर्मकांडाच्या अतिसंवेदनशील आणि स्फोटक बाबीतुन अंधश्रद्धा, अविज्ञानवादी मानसिकतेचे गुलाम झालेल्या समाजाला, विज्ञाननिष्ठतेतून, प्रात्यक्षिके आणि संशोधनातून येथील भोळ्या-भाबड्या दलित-अस्पृश्य, कष्टकरी, कामगार- शेतकरी या सर्वहारा मानवी समाजाला जागृत केल्याशिवाय भारतीय समाज जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय निर्माण होणार नाही. माणसांना निसर्गदत्त दिलेले मानवी हक्क- अधिकार आणि स्वातंत्र्य, भारतीय समाज जीवनात पेरल्या, रुजविल्या आणि उगवणी केल्याशिवाय भारतीय माणसांना माणूस म्हणून बंधु-भावाने जगता येणार नाही. जाती, देव-धर्म -पंथामध्ये बंदिस्त असणाऱ्या, मानवी समूहाला त्या-त्या अवर्तातून बाहेर काढल्याशिवाय भारतीय माणूस सुखी -संपन्न होणार नाही. माणसात माणूसपण निर्माण होणार नाही. माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी अशा अनेक सर्वसमावेशक कृती लढ्यातून भारताला शहाणपण शिकवीण्याचे कर्तव्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. हे त्यांच्या अभ्यासा नि चिंतनांती निर्माण केलेल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहेच म्हणूनच अशा विभक्त मानवी समूहांना माणूस म्हणून एकत्र जोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे अमुलाग्रह बदलासाठीचे अनेक प्रयोग त्यांच्या जीवनात आणि चळवळीच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत.
त्यातीलच जाती-अंतक आणि एकजिनसी समाज निर्माणीचा एक भाग म्हणून महाडचा सत्याग्रह नि काळाराम मंदिर प्रवेश हा जातीअंताच्या आणि एकजिनसी समाज निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी प्रयोग होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला क्रांतिकारी जय भिम-जय क्रांती – सत्य की जय हो.
प्रा. डॉ. भगवान वाघमारे,
निलंगा
( लेखक वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि परिवर्तनवादी चळवळीतील सत्यशोधक कार्यकर्ते आहेत.)