नांदेड ; प्रतिनिधी
शासकीय कारागृह नांदेड येथे कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने अमरनाथ यात्री संघ तर्फे कै. चंद्रभागाबाई व कै. केरबा गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत केरबा गंजेवार यांच्या तर्फे वॉटर कुलर धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे,ॲड. प्रवीण आयाचीत, वैभव धोंडे, जी. आर. भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी बंद आहेत. त्यांना भेटण्यासाठी दररोज अनेक नातेवाईक येत असतात. या भेटीसाठी नातेवाईकांना बऱ्याच वेळेस वाट पहावी लागते.
त्यांच्यासाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिलीप ठाकूर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. वर्षभरातून तब्बल ८२ जगावेगळे उपक्रम चालवणाऱ्या दिलीप ठाकूर यांचा दांडगा जनसंपर्क आहे.त्यांच्या विनंतीवरून चंद्रकांत केरबा गंजेवार यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ वॉटर कुलर दिले. ही व्यवस्था केल्यामुळे कैद्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
( छाया: पुरुषोत्तम जोशी )