आता माझ्या वाचकाचा मेसेज पाहिला ,,मॅम तुम्ही सचिन सरांसाठी वडाची पुजा करता का ??..
यावरुन मला आठवलं , माझी आई चंदनाने पाटावर वडाचं झाड काढायची आणि पुजा करायची , उपवास करायची.. पण माझी पुजा ही कायमच वेगळी असते.. मी दरवर्षी अगदी लहानपणापासूनच झाडे लावते त्यांची शक्य होइल त्यापध्दतीने जतन करते.. त्यामुळे वडाच्या फांद्या तोडु नका हा मेसेज मी देइन.. त्याच्याकडे काहीही नसताना त्याला प्रपोज करुन २५ वर्षात एकदाही न भांडता न हट्ट करता त्याच्यावर प्रेम केलं हीच माझी पुजा.. त्याच्यासोबत लहान घरात रहाताना कधीही कोणाशी तुलना केली नाही हेच माझं त्याच्यावर असलेलं प्रेम त्यासाठी मला पुजा , उपवास याची गरज पडलीच नाही.. त्याच्याकडे कीती पैसे आहेत , गाडी आहे की नाही या गोष्टीने आनंदी रहाण्यात कधीही फरक पडला नाही.. नवीन पिढीने लग्न करताना काय पहावं तर ती व्यक्ती पहावी.. मीही तेच केलं..
त्याने मला एक इतकी मोठी गोष्ट दिली आणि ती म्हणजे स्वातंत्र्य .. माझ्यासारख्या हरहुन्नरी स्त्रीला फक्त स्वातंत्र्याची गरज होती बाकी मेहनत माझी होती त्यामुळे पुजा करुन देवाकडे मागायला काहीच शिल्लक नाही .. रहाता राहिला प्रश्न सौभाग्याचा , आमची दोघांची कर्म हेच याचं उत्तर त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं वागणं हेच फक्त आमच्या हातात आहे .. मी या जगात कशाला घाबरत असेन तर ते कर्माना.. त्यामुळे हातुन वाईट काही होत नाही.. कोणाबद्दल वाईट बोललं जात नाही. आज या लेखासोबत मी वाचकांना एक गोष्ट सांगणार आहे जी मी रोज सतत करते आणि ती म्हणजे हातात माळ न घेता हरीनाम..
हरे कृष्णा .. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे. .. मी कुठलही काम करत असताना पाठीमागे जप सुरु असतो.. आणि सोबत भगवतगीता जाणुन घ्यायचा प्रयत्न करा..
माझ्या वाचकानी माझ्यातील चांगलं वेचावं ही आपली पुजा..
सखीना एकच सांगेन आज पुजा करताना नव्याने नक्की विचार करा..
सोनल गोडबोले
अभिनेत्री ,लेखिका