हा शब्द अनेकदा पु लं च्या तोंडी ऐकला असेल.. बुटकी थोडा जाडसर बांधा , गोल चेहरा , नवुवारी साडी , गजरा ,नथ हातात पाटल्या ,तोडे ,बिल्वर .. हाताला असलेली गोलाई त्यावर शोभणाऱ्या बांगड्या..
काळानुसार सौंदर्याची व्याख्या पण बदलत गेली..
अलीकडील करीनाची झिरो फिगर आली होती..
स्लीम फीट शरीर , लांब हात पाय मॉडेल टाइप हेही आवडु लागलं.. स्त्रीचे सौंदर्य आणि त्यावर साहित्यिकाने लिहीलेल्या रचना प्रत्येकवेळी नव्या भासतात..
प्रत्येक स्त्री इतकी भाग्यवान आहे कि तिच्यासाठी शब्द फेर धरतात..
तिच्या सौंदर्यामुळे चाफा अबोला धरतो.. मोगरा लाजुन फिक्कट गुलाबी होतो.. गुलाब तर काट्यातही नाचायला लागतो आणि रातराणी न झोपता रात्री फुलायला लागते..
तिच्या बटा , गालावरील खळी , सावळी कांती , सुंदर उरोज ,नितळ त्वचा प्रत्येक अवयावर पारायणं झाली तरिही नवीन लेखक शब्द रुपी कोंदणात त्या सुबक ठेंगणीला असा काही बसवतो की नव्याने स्त्रीचा हेवा वाटतो..
लक्ष्मी , सरस्वती , दुर्गा , चंडीका अशा अनेक रुपात सुबक ठेंगणी ताल धरते आणि संपूर्ण घरदार तिच्या तालावर नाचायला लागते.
कोणाला कोनाड्यात ठेवलेली हिंदमाता दिसते तर कोणाला कैकेयी , गजगामिनी , सीता असेल किवा राधा अनेक तिची रुपे पण खरं रुप त्या इंद्रदेवालाही कळलं नसेल..
मग ती मेनका का असेना.. किवा धनगराची बानु असेल
शंकराची पार्वती असो कि सर्वसामान्य रुपात वावरणारी आई असो ..
किती वर्णु तुझी रुपे
शब्द शब्द होती मुके
सुकलेल्या बकुळ फुला
आता बस कौतुक इतुके
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री