नांदेड ; प्रतिनिधी
भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात नांदेडकरांचे योगदान असावे या उद्देशाने २९ महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या कायापालट उपक्रमांतर्गत आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त भ्रमिष्टांच्या राहणीमानात अमुलाग्र बदल करण्यात आला असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने जून महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात आलेल्या उपक्रमात ४० भ्रमिष्ठांचा कायापालट करण्यात आला.सकाळी ६ वाजल्यापासून शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा, महेश शिंदे,संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकीवर बसवून आणले. स्वयंसेवक बालाजी खोडके यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. बालाजी मंदिराचे महंत कैलासमहाराज वैष्णव यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या आभागी नागरिकांना साबण लावून स्वच्छ पाण्याने मनसोक्त स्नान घालण्यात आले. त्यानंतर सविता काबरा यांच्या हस्ते सर्वांना अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले.
ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावी म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःलाच नवल वाटत होते.कै.अनुराधा व कै. डाॅ.नीलकंठराव मजगे लातूर यांच्या स्मरणार्थ मोदी व मजगे परिवारातर्फे नवीन चपला देऊन चरणसेवा करण्यात आली. हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम बालाजी मंदिर परिसरात राबविण्यात येतो, पण जुलै महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रेत असल्यामुळे सोमवार दि.२६ जुन रोजी कायापालटचा तिसावा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती स्वयंसेवकांना द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
एकही महिना खंड न पडता कायापालट सारखा जगावेगळा उपक्रम निःस्वार्थ भावनेने सुरू ठेवल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
(छाया : संजयकुमार गायकवाड )