सहजसुंदर अभिनय, आई-वहिणी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्षेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे दिनांक 4 में 2023 रोजी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सुलोचना दीदी म्हणजे मूर्तिमंत सोज्वळता, वात्सल्य, खानदानीपणा, सोशिकता आणि त्याग मूर्ती!
१९४३ पासून १९९५ पर्यंत प्रदीर्घ काळ मराठी – हिंदी सिने सृष्टीत आपल्या अभिनयानंच नव्हे, तर वागण्या – बोलण्यानंही निर्माण केलेला आपल्या नावाचा दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरलेली आपली अभिनेत्री.
बेळगांव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट नावाच्या खेड्यात फौजदार शंकरराव दिवाण आणि तानी बाई यांच्या पोटी नवसानी 30 जुलै 1929 रोजी नागपंचमीच्या दिवशी जन्माला आली, म्हणून कोणी तिला नागू म्हणत. पण तिचं नाव ठेवलं होतं “रंगू”.
उघड्या रानमाळावर मनसोक्त हुंदडणारी, सायकल चालवणारी रंगू जेमतेम चौथीपर्यंत शिकली. लहानपणी रंगू चुलतभाबरोबर गावभर फिरताना बारा वर्षांची होईपर्यंत विजार शर्ट घालून सायकलवर उंडारायची हे कुणाला सांगूनही पटायचं नाही, पण खरं आहे ते.
बालपणापासूनच तिला सिनेमाचं मोठं वेड. फौजदाराची लाडाची लेक! तिला तिकीट कोण विचारतोय? गैबीसाहेबाच्या दर्ग्याच्या उरूसात सिनेमाची हौस रंगू मनसोक्त पुरवून घ्यायची. पडद्याच्या जास्तीत जास्त जवळ बसून सिनेमा पहाण्याची आवड तिला.
पडद्यामागे काय आणि कोण असतंय याची उत्सुकता असे. मावशी बनूअक्का यांना वाटे, पोरगी सिनेमात जाणार. त्यांनीच रंगूच्या सिनेमा वेडाला खतपाणी घातलं वाटतं.
जवळच्या चिक्कोडी या तालुक्याच्या गावचे प्रसिध्द वकील श्री. पुरुषोत्तम बेनाडीकर हे वडीलांचे मित्र. त्यांच्याकडे नेहमी जाणं येणं असे. मावशीनी एकदा बेनाडीकर वहिनींकडे तक्रार केली, “नुसती भटकते, कामधाम करत नाही. शंकररावांनी लाडावून ठेवलंय अगदी”. त्यावर बेनाडीकर वकील म्हणाले, “आपण हिला सिनेमात पाठवू. मोठी कलाकार होईल ही “.
बेनाडीकर वकीलांच्या तोंडून नियतीच बोलत असावी बहुतेक. मास्टर विनायक हे बेनाडीकरांचे विद्यार्थी. मा.विनायक एकदा गुरुंना भेटायला चिक्कोडीला आले असतांनाच वकील साहेबांनी त्यांच्याकडं म्हणणं मांडलं. विनायकांनी संमती देऊन प्रफुल्ल चित्र मध्ये पाठवायला सांगितलं.
गुरुंना कबुल केल्याप्रमाणे विनायकरावांनी रंगूला महिना 30 रुपये पगारावर ठेवून आपल्याकडं कामावर घेतलं. रोज सकाळी 11 ते 6 जावं लागे स्टुडिओत हजेरी लावायला. लवकरच नव्या सिनेमाचं काम सुरू झालं. 1943 साली “चिमुकला संसार” या सिनेमातून रंगूचा अभिनय संसारही सुरू झाला.
प्रफुल्ल चित्र मधली सारी मंडळी सुशिक्षित, बरेचजण पदवीधर. शहरी, बरेचदा इंग्रजी, एरवी शुद्ध शुद्ध मराठी बोलणारी ती माणसं. रंगू गावंढळ , खेडवळ भाषा बोलणारी. काही जण तिची टिंगल करत. खोचक टिका ऐकून रंगूला जीव नकोसा झाला अगदी, पण वडीलांनी समजूत काढली.
अशा अपमानास्पद परिस्थितीत तिच्याच वयाची एक चुणचुणीत मुलगी तिच्या मदतीला धावून आली. ही लहानपणीची मैत्री आजवर (अगदी नव्वदी नंतरही) टिकवून ठेवणारी मैत्रिण म्हणजे भारतरत्न लता दीदी. रंगूला दिलासा मिळाला. ती रमायला लागली, तोच प्रफुल्ल चित्र कोल्हापूरातून मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला विनायक रावांनी. त्यांना हिंदी सिनेमा सुध्दा बनवायचे होते. आग्रह झाला तरी रंगू काही मुंबईला जायला धजावली नाही.
इथंच तिच्या जीवनात नवी कथा घडली. श्री आबासाहेब चव्हाण यांच्याशी तिचा विवाह झाला. आबासाहेबांची भालजी पेंढारकर यांच्याशी मैत्री होती. पत्नीनं सिनेमात काम करावं अशी त्यांचीही इच्छा होती. रंगूला सहज भालजींच्या प्रभाकर स्टुडीओत प्रवेश मिळाला. भालजींनी तिची पारख केली होती. तिचं सोज्वळ रुप नजरेत भरावं असंच होतं.
सुलोचना दीदी यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. फक्त बाॅलिवूडच नाही तर मराठी चित्रपटांमध्येही सुलोचना दीदी यांनी धमाकेदार भूमिका केल्या.
सुलोचना दीदी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार हा सातत्याने बघायला मिळत होता.
सुलोचना दीदी यांनी बाॅलिवूड चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मराठा तितुका मेळावा, मोलकरीण, बाळा जो र, सांगते ऐका, सासुरवास अशा चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत.
विशेष म्हणजे सुलोचना दीदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका केली आहे. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही सुलोचना दीदी यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुलोचना दीदी यांनी कारर्किद अत्यंत मोठी असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 250 हिंदी चित्रपटांमध्ये आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय, 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सुलोचना दीदी म्हटलं की नजरेसमोर त्यांच्या एकापेक्षा एक सरस भूमिकांचा एक “कोलाज” तयार होतो.
सुलोचना दीदींचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट विश्वात देखील त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. त्यांचा सदैव हसरा चेहरा आणि त्या सात्विक चेहऱ्यावरील तेज चाहत्यांसाठी मोठी समाधानाची बाब होती. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सुलोचना दीदींच्या आत्म्यास शांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना!”
रूचिरा बेटकर, नांदेड.