साहित्यीक,समाजसुधारक संत कबीरदास…

 

कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय।
आप ठग्या सुख उपजै और ठग्या दु:ख होय।।

चोरी, लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की, दुस-याला लुटण्यापेक्षा स्वत: लुटले गेलेले बरे. कारण दुस-याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दु:खात होणार।
संत कबीर हे हिंदी साहित्यातील कवीच नव्हते तर ते एक विचारवंत देखिल होते. त्यांची मुख्य भाषा साधुक्कडी होती, परंतु त्यांच्या दोहे आणि श्लोकांमध्ये हिंदी भाषेतील सर्व मुख्य बोलीभाषा पाहायला मिळते. त्यांच्या रचनांमध्ये ब्रज, राजस्थानी, पंजाबी, अवधी हरियाणवी आणि हिंदी खादीबोली भरपूर होती.संत कबीरांच्या शिकवणुकीचे मूळ अद्वैत वेदांताच्या तत्त्वज्ञानात होते, जे सर्व सृष्टीच्या एकतेवर आणि परम चेतनेसह वैयक्तिक आत्म्याच्या एकतेवर जोर देते.
ज्येष्ठ पौर्णिमेस काशी क्षेत्रात राहणाऱ्या एका मुस्लीम जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीरदास.सर्वत्र ज्येष्टपौर्णिमेला त्यांची जयंती साजरी केली जाते.विज्ञानवादी आणि अंधश्रध्देला विरोध करणारे असल्यामूळे त्या काळी कबीर हे बहिष्कृत संत होते. कारण, हिंदू त्यांना आपला मानत नव्हते आणि मुस्लिम त्याला नाकारत होते. परंतु, कबीरांनी जे दोहे लिहिले, ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत.अंधश्रद्धा निर्मूलनानेच समाज पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, समताधिष्ठित होऊ शकेल याबद्दल प्राचीन संतांच्या मनात दृढविश्वास होता. त्यामुळेच संत कबीर देखिल अंधश्रद्धेवर प्रचंड प्रहार करण्यास मागे पुढे पाहात नसत.हिंदी साहित्याचे विद्वान संत म्हणून कबीरदास यांची ख्याती सर्वत्र आहे.आपल्या दोह्याच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात केला. निरक्षर असलेल्या संत कबीर यांच्या मुखातून निघालेले उपदेश आणि दोहे शिष्यांनी जसेच्या तसे लिहून घेतले.संत कबीर यांना अनेक भाषेचे ज्ञान होते.तसेच त्यांनी ईश्वरापेक्षा गुरूला उच्च दर्जा दिला.अवतार,मूर्तीपुजा,रोजा,ईद,मंदिर,मस्जिद यावर त्यांचा विश्वास नव्हता.
तुम्ही जसजसा कबीर यांना वाचत जाता तसतसे त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहाणार नाही.संत कबीरांच्या विचारांना शिख धर्मग्रंथ “गुरु ग्रंथ साहीब”मध्ये मानाचे स्थान आहे.
संत कबीर यांच्या वाणीचा संग्रह’बिजक’या नावाने प्रसिध्द आहे.ते साधे विणकर होते.विणकाम हाच त्यांचा पिढिजात व्यवसाय होता.सुंदर शाली विणता विणता त्यांनी जीवनाविषयीचे तत्वज्ञान तितक्याच सहजतेने शब्दात विणले.आणि त्यातून मार्गदर्शक तत्वाची माला गुंफल्या गेली.त्यांच्या प्रत्येक दोह्यातून आपल्याला याचा अनुभव येतो.स्वता:हा अशिक्षित असूनही कबीरांना ज्ञानाविषयी भरपूर ज्ञान होते हे त्यांचे वैशिष्ट्ये. संत आणि ऋषींच्या सहवासात बसून त्यांनी वेदांत, उपनिषद आणि योगाचे पुरेसे ज्ञान प्राप्त केले होते. सुफी फकीरांच्या सहवासात बसून त्यांनी इस्लामची तत्त्वेही जाणून घेतली होती.कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत.संत कबीर दास हे भक्ती चळवळीचे पुरस्कर्ते होते. कबीर दासांचा वारसा अजूनही कबीराचा पंथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका पंथाद्वारे कायम आहे, जो त्यांना संस्थापक मानतो.कबीर यांनी धार्मिक सहिष्णुतेवर भर दिला.कबीरांनी सती प्रथा आणि बालविवाह या दोन अनिष्ठ प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता.
त्यांचे काही प्रसिध्द दोहे.आजही भक्तीभावाने म्हणल्या जातात-

कहे कबीर देय तू, जब लग ‘तेरी देह।
देह खेय हो जायेगी, कौन कहेगा देह।।

किती सुंदर दोहा आहे हा, हे माणसा जोपर्यंत जिवंत आहेस, तोपर्यंत दान देत राहा. एकदा मातीत गेल्यावर तुला मागायला कोण येणार आहे?

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय…

कबीर काळाच्या पुढे असलेले कवी संत होते. धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढत हजारो ग्रंथांचे पाण्डीत्य खुजे करणार्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारा पुरोगामी संत म्हणजे कबीर होय.ते आपल्या दोह्यात म्हणतात.पोथी पुरण वाचून सगळेच काही विद्वान, ज्ञानी होत नाहीत पण जर प्रेमाचे फक्त अडीच (ढाई) शब्द समजून घेतले म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्ही नक्कीच ज्ञानी व्हाल.

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान ।
जातीपातीच्या पल्याड विचार करणारा हा संत,या दोह्यातून उपदेश करतांना म्हणतात, ज्ञानी माणसाच्या जाती पेक्षा त्याचं ज्ञान महत्वाच आहे. तलवारीची किंमत करा त्याच्या म्यानाची नाही.आणि ते तितकच खर आहे.त्यांच्या प्रत्येक दोह्यातून ज्ञानाचा साठा ओतपोत भरलेला जाणवतो.
संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे हे विज्ञानवादी बुद्ध धम्माच्या प्रेरणेने प्रभावीत झालेले दिसतात. म्हणूनच ते सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यावर रोखठोक पणे आपले मत मांडून त्यावर शेवटपर्यंत ठाम राहीले.म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना आपल्या गुरू स्थानी मानले. ‘कबीर के दोहे’ युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, यात शंकाच नाही.
संत कबीरदास यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातुन समाजात पसरेल्या कुप्रथांना चुकीच्या चालिरितींना मूळासहित नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या शिवाय सामाजिक भेदभाव आणि आर्थिक शोषणाचा विरोध केला.अश्या या महान संताच्या पावन स्मृतिस त्रिवार अभिवादन….!!

बुरा न देखन मै चला बुरा न मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसा बुरा न कोई
-संत कबीर

 

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *