नांदेड – ज्या पद्धतीने कमी पटाच्या शाळा बंद करून सरकार समुह शाळेची संकल्पना प्रत्यक्षात आणू पहात आहे, तद्वतच तीन हजार विद्यार्थी संख्या असणारी महाविद्यालयेच आता सुरू राहणार आहेत. त्यातच बहुविद्याशाखीय महाविद्यालयांची निर्मिती करुन इतर महाविद्यालयांची विद्यापीठाशी असलेली संलग्नताही रद्द करण्याचे आणि भविष्यात शिक्षक भरती प्रक्रियाही संपुष्टात आणण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाणार आहेत. त्यातच सरकार देशातील बड्या भांडवलदारांना हाताशी धरून परदेशी विद्यापीठे भारतात आणण्यासाठी वातावरण निर्मिती करीत आहे, त्यासाठी सरकारची तयारी सुरू असल्याची माहिती पीपल्स महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रो. डॉ. डी. एन. मोरे यांनी नवीन शिक्षण धोरणावर आधारित कार्यशाळेत दिली.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङमय आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे प्रपाठक डॉ. दिलीप चव्हाण, अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश पाटील, पीपल्स काॅलेजचे प्रो. डॉ. डी. एन. मोरे, समन्वयक डॉ. हेमंत कार्ले, डॉ. अनुजा कार्ले, नियामक प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती होती.
पेअर फाउंडेशनच्या वतीने शहरातील पीपल्स काॅलेज परिसरातील नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या मल्टिमीडिया हाॅलमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी एकदिवसीय राज्यस्तरीय नवीन शिक्षण धोरण – २०२० कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पहिल्या सत्रात राष्ट्रीय शिक्षण धोरण: स्वरूप आणि उद्दिष्टे या विषयावर डॉ. दिलीप चव्हाण यांनी विचार मांडले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि आर्थिक तरतुदी’ या विषयावर डॉ. जावडेकर यांनी सविस्तर भाष्य केले. भोजन अवकाशानंतर तिसऱ्या सत्रात पीपल्स महाविद्यालयातील भाषा आणि संशोधन इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी. एन. मोरे यांनीही या कार्यशाळेत सहभाग नोंदवत ‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उच्च शिक्षण’ या विषयावरील आपले चिंतन श्रोत्यांसमोर ठेवले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. हेमंत कार्ले यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रकाश नांगरे यांनी केले. कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात डॉ. हेमंत कार्ले, प्राचार्य डॉ. रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रश्नोत्तरांचा तासही संपन्न झाला. तसेच डॉ. शिवाजी कराळे आणि सरस्वती दुर्गम यांनी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. तिन्ही सत्राचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. हेमंत कार्ले यांनी केले तर सामाजिक तथा शैक्षणिक चळवळीतील भाष्यकार बालाजी थोटवे यांनी मानलेल्या आभारानंतर कार्यशाळेची सांगता झाली.