आठ दिवसापूर्वी लग्नाची पत्रिका आली.आमचे शेजारी राहणारे हरीदास कनाके.साधासूधा माणुस .नम्रपणे वागणारा. आदिवासीचे सर्व सद्गुणाने टाचाटच भरलेलं माणुस.काळेश्वरनगरमध्ये सर्वांना परिचीत असलेलं साधा माणुस म्हणजे हरीदास कनाके . त्यांच्या मुलीचं लग्न होतं ११ .६ .२०२३ .स्थळ होतं श्री शिवाजी राजे गार्डन घोटी ता.किनवट . सकाळी सहा वाजता विष्णुपुरी नांदेड येथून निघायचे सर्वानी ठरविले. खासगी बसगाडी केलेली होती.सहाला येणारी गाडी सात वाजता आली. काळेश्वरनगरमधील लोकं जमायला साडेसात वाजले. जवळपास चाळी पन्नास माणसं गाडीत बसली.त्यात स्त्रीयांची संख्या जास्त होती. दोन चार मुली सोडल्या तर सर्व स्त्रीया चाळीशी पार केलेल्या. सोनू गाढे म्हणाला ,” उशीर होतय आले का सर्व.”
सोनुचे शब्द ऐकूण गाडीचा चालक म्हणाला, ” कोणत्या मार्गे जायचं ?” गाडीतील एक जाणकार म्हणाला ,” जाऊ की भोकर हिमायतनगर मार्गे.” दुसरा एकजण म्हणाला ,” माहूर मार्गे कसं असेल?” गाडीतील जाणकार म्हणाला,” अबब लई दूर पडते माहूरहून . हिमायतनगर मार्ग धोपट आहे. नॅशनल हायवे आहे.” मध्येच कोणीतरी बाई म्हणाली, ” किती वेळ लागते की माय . उन तर लईच पडालय. “जाणकार म्हणाला,” इ हे बगा इतून तीन साडेतीन तास लागतात.” मध्येच कोणीतरी बोललं ,” जवळ नाही , जवळ नाही किनवट दिडशे किलोमीटर हाय म्हणलं.” गाडीतील जवळपास सर्वच उदगारले,”निगा निगा चला उशीर होऊलालय बगा.”
गाडी एकदाची सुरू झाली. चालक म्हणाला,” निगायचं का ? ” ” हो हो काढा गाडी. ” सर्वजण एका सुरात म्हणाले . गाडी सुरु झाली व शिबू म्हणाली ,” चला चला पटकण तिकीटं काढा.” मध्येच एक पोटा म्हणाला,” गाडी चेक होणार हाय सर्वानी तिकीटं घ्या.” गाडी धोपट रोडला लागली. मग बायांची कुजबूज सुरु झाली. मागच्या सीटवर बसलेल्या बायाचं बोलणं सुरु झालं ,” अग बय्या उगीच मागं बसलाव आता कंबर नाचू लागल्या की .” समोरच्या सिटवर बसलेल्या बाया ,” लवकर येवून समोरची सिट धरायला पाहिजे होती की.आता कंबर नाचणारच हाय.”
गाडी एकदाची नांदेड शहर ओलांडली. दुखनं आल्यासारखी चालणारी गाडी आता जोरात पळायला लागली.एक एक गाव ओलांडत भोकर तालुक्यात गाडीनं प्रवेश केला. घाटाची सुरवात झाली व रस्त्याच्या दोन्ही बाजूनं हिरवीगार वनराई पाहून सगळे आनंदीत झाले. श्रावण महिण्यात हिरवंकच्च दिसतय तसंच जंगल दिसत होतं.
गाडी वेगात पळत होती तशी गाडीत बसलेल्या बायांच्या बोलण्यात गती आली होती. त्याचं हसणं, बोलणं छानपैकी चालू होतं. गाडीने भन्नाट वेग धरलं होतं. नेते भाषाणात म्हणतात ना फलाण्या बाईच्या गालावाणी रस्ता गुळगुळीत आहे ;पण हा रस्ता तेवढा गुळगुळीत नव्हता.तो रस्ता फलाण्याच्या तोंडावर देवीचं वण असतात की नाही तसा ओडधोबड होता.आता गाडी हिमायतनगर गाठली व पुढेही निघाली.थोडं पुढं गेल्यानंतर गाडी थांबली.एक बाई म्हणाली , ”म्या मुरमुऱ्याचा चिवडा करुन आणलया. थोडं थोडं खाऊन पाणी प्या.” गाडीत थंड पाण्याचा कॅन होता. सर्वांनी मुरमुऱ्याचा चिवडा खाऊन पाणी पिले व म्हणाले, ” पोटाला आधार झालं. उन्हाळा दिवस हाय. “
गाडी निघाली. सुसाट पळत होती. इस्लापूर कधी गेलं हे कळालच नाही. बोधडी आली. बोधडीच्या चोहोबाजूने टेकडया. त्यावर घटनदाट जंगल.नयनमनोहर दृष्य. गाडी पळत होती. झाडे मागे पडत होती. गाडी दम न घेता आली किनवटला. किनवटपासून दोन आडीच किलोमीटरवर घोटी हे गाव . त्या गावाच्या शिवारात मंगल कार्यालय.आगदी रस्त्याला चिटकूनच. आमची गाडी थांबली.” आलं आलं मंगल कार्यालय आलं .उतरा उतरा ” असं बोलत बोलत आम्ही सर्वजण उतरलो.
मंगल कार्यालय साधचं दिसत होतं .बसण्यासाठी खुर्च्या टाकलेल्या होत्या. लग्नाच्या स्टेजवर एकदोन माणसं फिरत होती .पाच पन्नास बाया मंगल कार्यालयात बसलेल्या होत्या व आठ दहा पुरुष मंडळी होते. मंगल कार्यालय सुनं सुनं वाटत होतं . मंगल कार्यालयासमोर कमान काढलेली होती. तेथे वाजंत्री वाजवत थांबले होते. सुरवातीला थोडी शंकाच आली की लग्नाला फारशी गर्दी होणार नाही. तसं लग्न लागायला अनुन वेळ बाकी होतं .
हळूहळू स्त्री पुरुष जमू लागले व मंगल कार्यालय खचाखच भरले. या लग्नात एक छान गोष्ट मला जाणवली. येथे कोणी लहान नव्हतं. येथे कोणी मोठं नव्हतं. येथे अधिकारी, पुढारी आलेले होते ;पण अधिकाऱ्याचा व पुढारीपणाचा थाटमाट दिसून आला नाही. बाकी लग्नाच्या वेळी लग्नात माईकमध्ये बोलणारा शेकडो वेळा बोलत राहतो ‘फलाना पुढारी, बिस्ताना अधिकारी यांचे नाव घेतले जाते . त्यांचा सत्कार केला जातो. जणूकाही तेच लोकं लग्नासाठी उपस्थित झालेले आहेत असा अभास निर्माण केला जातो. येथे सामान्य माणुस कोणाचाही खासगिणतीत नसतो. तसं इथं या लग्नात अजिबात घडले नाही. लग्नाला आलेले सर्व समान या तत्त्वाने सर्वांचंच शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. ना शाल, ना श्रीफळ .सर्व थोतांड गोष्टीना तिलांजली दिल्याचे दिसून आले .
सर्वसामान्याच्या लग्नातही हजारो रुपये खर्च करून वाजंत्रीवाल्यांना आणले जाते.डीजे आणलं जाते ;पण येथे असा प्रकारच दिसून आला नाही .येथे वाजंत्रीवाले होते ;पण त्याच्यांकडे चार ढोल होते .ढोलचा आकार घरात पाण्याची स्टीलची टाकी असते का त्या आकाराचे किंवा त्याहून थोडे मोठे होते . दोन ढोलला चार जण वाजवत होते. एकजणाकडे एका हातात लाकडी टीपरी होती. ढोल गळ्यात आडकवून एकाबाजूने टिपरीने बडवत होता . तर वरच्याबाजूने डाव्या हाताचे बोटं पडत होती. दुस-या माणसाच्या हातात पातळ लांब दोन तुराटीच्या काडया होत्या व तो ढोलवर आपटीत होता. तडमताशावर जसं काडया तुटून पडतात तशा ढोलवर पडत होत्या.
ढोलाच्या तालावर तरुणाई डोलत होती. ढोलचं संगित सुरई व सनईला सुंदर साथ देत होतं. त्याचं मेथकुट येवढं जमलेलं होतं की, सर्वजमलेल्याचं लक्ष ते वाजंत्रीवाले वेधून घेत होते .ढोलच्या तालावर नाचनारी मुलं बेभान होऊन नाचत होती.एकाने तर नवरदेवाला खांदयावर उचलून घेतलं व बराच वेळ नाचत राहिला.
हळूहळू लोकं जमू लागली .रिकामं दिसणारं मंगल कार्यालय गलबलू लागलं. तसं वाजंत्रीवाल्यांना चेव येत होतं .बेफाम व बेभान होऊन वाजवत होते. स्टेजवरुन कोणीतरी सांगितलं ,” वाजवायचं थांबवा.” थोडया वेळाकरिता वाजवणं थांबविले. मी त्यांच्याकडं गेलो .दोन्ही हात जोडून नमस्कार करत विचारलो, ” मामा तुम्ही जे वाजवत आहात यांची नावं सांगताव का ? ” कृश शरीराचा,गळ्यात हळदी रंगाचा गमचा गुंडाळलेला होता. तो रंगाने काळा . त्याचे बारीक डोळे होते . बारीक बसकं नाक असलेलं तो वाजंत्री म्हणाला ,” हे चार ढोल हाईत. आमच्याकडं सहा ढोल हाईत ;पण आमी इथं चारच आणलाव.” मी म्हणालो, “हे वाजवायच तुम्हाला कोणी शिकवलं ? “सनई वाजवणारा म्हणाला,” आमला कोणी शिकवलं नायी.” तुम्ही जे वाजवत आहात त्यास काय म्हणतात ? ” तो म्हणाला, ” याला सनई मणत्यात .” व दुसऱ्या माणसाकडं बोट दाखवत म्हणाला, ” त्यास सुर मणत्यात.”
मी म्हणालो , ” मामा तुम्ही कोणतं गाणं सनईतून वाजवालात ? ” तो हसला व न बोलता तसाच थांबला .मी म्हणालो , ” सांगताव का ?” तो
गाण्याची एक ओळ गावून दाखवला . ती ओळ आशी होती ” बाई सो सो हा माडसोना, रोन आडचर सडमिने मनमा. ” आता थोडावेळ माझी बोलती मी बंद केलो. विचार करु लागलो याचा अर्थ काय ? पण मला अर्थ कळालं नाही .मी म्हणालो,” मामा अर्थ सांगताव का ? “हसत हसत त्यांने अर्थ सांगितलं , ” बाई जा जा ग आपल्या घरा . उगीच लडत ( रडत ) मायेरी ( माहेरी )रावू नको.”
पुन्हा ढोलचा आवाज डिंगचिक , डिंगचिक असा येवू लागला.मी दुसऱ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणालो,” हे वाजंत्री वाजवणारे तुमच्यापैकीच आहेत का ? “तो म्हणाला, ” हो ते आदीवासीच हाईत.आदिवासीत पुंगी वाजवणाऱ्याला थोटी मणतात. ” मी म्हणालो , ” तुमच्यातही वरची जात , खालची जात असतय का ? “तो म्हणाला, ” होय येथे गोंड वरची जात हाय . येथे कोलाम , नायकाफोड, प्रधान व थोटी या जाती हाईत .”
मी म्हणालो,” तुमचं देव कोणतं? तुम्ही कोणत्या देवाची पूजा करताव ? ” तो म्हणाला, आमाचा देव ‘मोठा देव ‘ .” मी विचारलो, ” मोठा देव म्हणजे कोणता देव. देवाचं नाव काय ? तो हसला व उत्तर दिलं , ” मोठा देव मणजे मोठा देव.” मी विचारलो , ” नाव सांगा की. ” तो चेहऱ्यावर तिरस्कार भाव उमटवत व मला ढ समजत म्हणाला , प्रत्येकाच्या घरात मोठा देव असते. त्यालाच मोठा देव मणतात. आमी भीमदेवाचीबी पूजा करतोत. आमचे देव देवी जंगलात असत्यात. आमी जंगलातच त्यांची पूजा करता. आमच्या देवाला बकरं चालतय.आमी आकाडी पासून दिवाळीपर्यंत नाचत राहतो. गोंड देवा देवीची पूजा करताना त्याच्याजवळ प्रधान जातीचं माणुस पाईजेच.”
मी विचारलो,” आदिवासीत लग्न कोण लावतय ? ” तो म्हणाला, आदीवासीच असतो लगीन लावणारा. बामणाला आमी बोलवत नायी. आमच्यातीलच पाटील ,महाजन,यापैकी कोणीबी एकजण लगीन लावत्यात. आदिवासी वसतीत पाटील,महाजन,घटीया व देवारी हे पद हाईत. पाटील , महाजन ,घटीया हे गावातील प्रमुख हाईत . ते आदेस देत्यात . गावात न्यायदान करण्याचे कामबी तेच करीत्यात. देवारी गावात कार्यकरमाच्या वेळी माणसं बोलावतो.” तो सांगत होता. माझे कान मी त्याला देवून टाकलो होतो.
मी म्हणालो,” मामा शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला कंठाळा आला नाही ना .” तो हसत म्हणाला, ” नायी नायी इच्यारा.” मी विचारलो , ” तुमची देवी कोणती ?तुम्ही त्या देवीला नैवद्य कशाचा दाखवता?” तो उत्तरला,” आमची देवी जंगोबाई. जंगोबाईची पूजा आमी करताव . देवदेवी कोणतंबी असो, कोणताबी कार्यकरम असू द्या. आमी बकरंच कापताव.” मी शेवटी त्याला म्हणालो मामा नाव सांगा की. ” तो म्हणाला , ” माजं नाव शेषेराव नेताम. मी गोंड हाय.”
लग्नाची घटिका जवळ आली होती. वेळेवर लग्न लावले. येथे अधुनिकेच्या नावाखाली ना प्रीवेडींगचं खेळ होतं ना नखरे , ना बडेजाव होतं . लग्नानंतर सुरुची भोजनाचा आनंद घेवून नांदेडला निघालोत. आदिवासी बांधव साधे राहतात पण त्यांच्याकडे आदरातिथ्य कणाकणात भरलेलं आहे. थोडेसे लाजाळू ;पण तेवढेच शानदारपणे ते पाहुणचार करतात हे दिसून आले . निघताना आम्हाला थोडं लाजत लाजतच त्यांनी निरोप दिला. गेलेल्या मार्गानेच परत नांदेडला आलो. परत येता वेळी परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथे जवळपास सर्वांनी दर्शन घेतलं. तेथून घरी आलो ;पण तेथील आदरातिथ्य भाव , ढोलांचा आवाज , सुर सनईचा आवाज व फणसाची भाजी माझ्या कायम लक्षात राहील हे निश्चित.
राठोड मोतीराम रूपसिंग
विष्णुपूरी , नांदेड -६
९९२२६५२४०७ .